ढग दाटुनी येतात..
मन वाहुनी नेतात.. ऋतु पावसाळी सोळा..
थेंब होवून गातात..
आज सकाळीच ढग दाटुन आले आणि टीव्हीवर एक रोमॅन्टिक सीन सुरु होता.. रोमॅन्टिक काहीही म्हटलं की मी त्यात रमते.. मला माहीत होतं ती ॲक्टींग होती पण त्या शब्दानी , कलाकारानी त्यावर मात केली होती.. चिंब पावसात भिजलेल्या प्रेयसीला जेव्हा तो उचलुन घेतो आणि अचानक वीज चमकते आणि त्याचसोबत माझ्याही मनात विजा कडाडल्या.. त्या खास कोणासाठी नव्हत्या पण मला त्या भावना शब्दात उतरवता येतील इतकीच मी शुध्दीत होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही..
सहज विचार करत होते , प्रेम व्यक्त करायचे कीती पैलु असतात ना .. तिला खुश करायला कंबर कसुन त्याने तिला उचललं होतं.. आणि त्याचक्षणी मी पेन उचलला होता कारण दृश्य लिहायचा अट्टाहास होता.. पेन घेतल्यावर वाटलं आधी पूर्ण एपीसोड पाहु आणि मगच माझ्या शब्दात ढगाना पेपरवर उतरवु.. तितक्यात सचिन D mart मधुन आला त्याने पिशवी माझ्या हातात दिली .. मी म्हटलं , मी तर याला काहीच आणायला सांगितलं नव्हतं मग हा काय घेउन आला ??.. उत्सुकतेने पिशवी उघडली तर त्यात सॅनीटरी नॅपकीन होते.. ओटा पुसायला गालाचे वाईप्स होते.. इथे मात्र माझ्या डोळ्यातील ढग दाटुन आले होते कारण प्रेमासाठी पावसात भिजायची गरज असतेच असं नाही किवा त्याने आपल्याला उचलल्यावरच प्रेम व्यक्त होतं असही नाही पण बायकोला घरात हव्या असलेल्या गोष्टी न सांगता त्याला कळतात आणि नकळत नेहमीप्रमाणे तोंडातुन वाक्य आलं.. खुप पुण्य केलय म्हणुन तु भेटलास..
आनंद किती छोट्या गोष्टीत असतो ना आणि तो घरातच असतो .. आपण तो बाहेर शोधतो..मुंबईहुन येताना वॉशरुमसाठी फुडमॉलला थांबले .. वॉशरुम स्वच्छ करणारी ताई तिथेच एका पुठ्यावर गाढ झोपली होती .. सावळी तुकतुकीत कांती आणि आनंदी चेहरा पाहिला आणि मनातच म्हटलं , तिच्या कामातही तिने आनंद शोधला होता आणि त्यात ती खुश होती.. आनंद प्रत्येक गोष्टीत आहे , योग्य वेळी तो वेचता यायलाच हवा
आता पावसाळा सुरु होइल . मनसोक्त भिजा आणि भरभरुन जगा..
सोनल गोडबोले
.