चकवा

चकवा
उन्हाळ्याचे दिवस.सकाळपासूनच ऊन रगेल बनायचा. सकाळी सकाळी पक्षांच्या किलबिलाट ऐकू यायचा ;पण उन्हाचा पारा चढाय लागला की पक्षी एखाद्या दाट झाडामध्ये फांदीवर बसुन आराम करायाचे.विशेष करून बाभळीच्या खोडावर बसलेले विशिष्ट किडे मात्र किर्र किर्र असा आवाज करुन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याराला भंडावून सोडायचे.
आमच्या घरची अतिशय गरीब परिस्थिती.दोन दोन तीन तीन दिवस जेवायला मिळू नये .माझ्या दादाला त्या काळी किती रुपये दिले होते हे मला माहित नाही ;पण आमचे बा वर्षभरासाठी बोली करुन बाबशेटवाडी या गावात एका सावकाराकडे गायी म्हशी राखण्यासाठी माझ्यापेक्षा मोठया भावाला नोकर म्हणून ठेवला होता. त्यावेळी माझ्या दादाच वय असेल जेमतेम आठ नऊ वर्षाचं.मी दादापेक्षा तीन वर्षानी लहान. दादा गावात रहात असल्यामुळे त्याला मराठी भाषा बोलता यायची ;पण मला मराठी भाषा समजत नव्हती व बोलताही येत नव्हती.
एकदा दादा त्याच्या मालकाची जनावरं इतर पोरांच्या हवाली करून घरी आला होता. तो थोडावेळ थांबला. त्याने चारवायला आणलेली जनावरं ही आमच्या तांडयाजवळच होती.गाव व तांड्यात दोन एक किमीच अंतर.त्याकाळी गरीब लोकांना काम मिळत नसे.कामाच्या शोधार्थ शेजारच्या खेड्यात फिरावं लागे. काम द्या म्हणून श्रीमंताकडे विनंती करावी लागे.
हिरानगर तर गावापासून दूर वसलेलं तांडा .उन्हाळ्यात सर्व रान ओसाड दिसायचं. भक्कास माळरानावर एकही पशुपक्षी उन्हात दिसायचे नाही.तांड्यातील बाया उन्हाळ्यात धावडयाचं डिंक वेचायला जात.तेंदूची पाने तोडत व शंभर पानांचा एक गट्टा तयार करुन विकत. कधीकधी पावसाळ्यात पेरलेल्या भूईमूगाच्या शेतात चकून राहिलेल्या शेंगासाठी ऊकरी घेवून माती उकरीत बसत. दिवसभर माती उकरल्यानंतर शेर अधेलीभर शेंगा गावत.
दादा मायीला म्हणाला ,”माय माय मी नन्हग्याला माज्यासोबत घेवून जाऊ का ?दुपारी मालकाला इच्यारुन म्या याला घरी घेवून येतो.” माय म्हणाली ,” नग नग ऊन हाय.उन्हात नको नेऊ.” मी हट्ट धरलो.मी दादासोबत जातो म्हणून. माय नको म्हणत होती. मी रडायला सुरवात केलो.तशी माय म्हणली,” हे बग घेवून जा ;पण ऊन होण्याचा आगोदर त्याला परत आण.”दादा खूष झाला.तो म्हणाला ,” याला मी की नायी लई संबाळून आणतो .”
माय म्हणाली ,” बापू हे बग म्या आज घरी नायी .कुटं रोजगार करण्यासाठी कामबी मिळालं नायी.म्या आज टेंबुर्णे पाटलाच्या शेतात भुईमूगाच्या शेंगा सापडत्यात का ते पातो. दिवसभर म्या त्या शेतातच रातो बग तितं दोगं भाऊ या.ननग्याला सांबळून घेवून ये.”दादा हां म्हणाला व माझं हात धरून मला म्हणाला ,” चल रं पटपट. लवकर जावू बाबशेटवाडीला.जनावराला पाणी पाजवूत व आपल्या मायीकडं जावूत.”
हिरानगरहून बाबशेटवाडीचा रस्ता म्हणजे पाऊलवाट दगडगोटयाची काटयाकूट्याची,चढउताराची वाट.दादा त्या रस्त्याने जोरात चालत होता ;पण मी मात्र चालताना आडखळत होतो.ठेसाळत होतो.दादा भरभर चालायचा मागे वळून पहायचा व म्हणायचा,” हळू चाल हं पडशील बग.समोर बगून चल.” मी म्हणायचो,”हो हो हळू चालतो.” अडखळत रड्त पडत एकदाचं गावात पोहचलो . दादांनी जनावराला विहिरीवर पाणी पाजवलं . कोंडवाडयात कोंडलं व मला म्हणाला चल आता. झाडाखाली सावकार बसलेला.दादा त्याला म्हणाला ,” सावकार हा की नायी माजा ननगं भाऊ हाय.याला घरी सोडून उद्या सकाळी रामपाऱ्यात म्या परत येताव .” सावकार मान हालवून होकार दिला.
दादा वयाने लहान होता ;पण त्याला भीती काय असते हे माहित नसावं. तो मला म्हणाला ,” चल पटपट ऊन होवूलालय. मला टेंबुर्णे पाटलचं शेत माईत हाय. आता हिरानगरला जायचं नायी. इतून मदून जाऊता.” मला रस्ता माहितच नव्हता. दादा म्हणेल ती पूर्व दिशा.मी त्याच्या मागे मागे चालू लागलो. ऊन तापत होतं. दोघंही अनवाणी पायाने चालत होतो.दादा पुढे मी मागे.तो चार पावलं चालला की मागे वळून पहायाचा व म्हणायचा,”पाय पोळालेत व्हय. आता पाटलाचं शेत जवळच हाय.”
बाबशेटवाडीच्या वरलाकडंच्या दिशेने तो चालत होता. त्या गावाच्या वरलाकडं पांडवचं मंदिर आहे .दादाने मला ते मंदिर दाखवलं.तेथील मूर्तीसमोर त्याने हात जोडले.मग पुढे निघालो. मंदिरापासून जवळच चिंचाचे मोठमोठे पाच सहा झाडं होती.त्या झाडावर रग्गड चिंच लागलेली होती.चिंचाच्या झाडाखाली दोघं भाऊ थांबलोत. दादा डोळे बारीक करून लागलेल्या चिंचाचा बुटक्याकडं पाहू लागला.दादाच्या मनात चिंचं तोडायच्या होत्या.तो म्हणाला,”म्या झाडावर चढतो चिचं तोडून खाली फेकतो.तू पटापट जमा कर .” मी म्हणालो,”दादा या झाडाचं मालक आपल्याला मारल की.”दादा रुबाबत म्हणाला,”त्यानं मारल्यावर म्या त्याला सोडणार हाव की काय म्याबी ठेवून देतो त्याच्या थोबाडात.”
दादा झाडावर चढला.चिंचा तोडून खाली फेकू लागला.फेकत फेकत तो मला म्हणत होता, “पटपट वेच रं .ढीग कर ढीग.” मी चिंचां वेचत होतो.जमा करत होतो ;पण माझं सगळं ध्यान दुसरीकडंच होतं. झाडाचं मालक आलं तर मार देईल ही भीती होती.दादा मात्र बेफिकीर होता. तेवढयात दादाच्या वयाची तीन चार पोरं तेथे आली.त्यात एक चौदा पंधरा वर्षाचा होता.तो त्या झाडाचा मालक होता.झाडाखाली येवून तो रुबाबात थांबला.दादाला तो नावानिशी ओळखत होता.त्याने आल्या आल्या उभाटया शिव्या द्यायला सुरवात केली.तो म्हणाला,”ये तुज्या मायीला खाली उतर लमाणी. चोर कुटला . तुज्या बापाचं झाड हाय व्हय रं.”
मी घाबरून गेलो होतो.हातपाय थरथरत होते.काळजात पाणी पाणी झालं होतं.मी जमा केलेले चिंचां मालकांनं घेतल्या.दादाच्या गालावर दोन तीन चापटी हाणल्या.तसा मी जोरात रडायला लागलो तसा तो माझ्यावर डाफरत म्हणाला,” चुप्प बे लमाणाच्या तुला हातबी लावलो नाही अण तू रडालास का?”दादानं मार खालं ;पण त्याला म्हणाला,”तूला म्या सोडणार नायी म्हणजे नायी फक्त चार दिवस थांब.”
मी रडत होतो.दादाच्या डोळ्यात पाणी नव्हतं.चेहऱ्यावर भीती नव्हती.तो माझे डोळे पुसत म्हणाला,”त्याला म्या सोडणार नायी.”दादा पुढे मी मागे चालत राहिलो,चालत राहिलो. वडाचा तांडा,कृष्णवाडीतांडाच्या बाजूनं पुढे निघालो. ऊन तापतेलं होतं.पाण्याच्या लाटा दिसतात तसं ऊनाच्या लाटा दिसत होत्या.बराच वेळ चालत राहीलो ; पण टेंबुर्णे पाटलाचं शेत काही आलं नाही.आता मी थकलो होतो. चालताना पाय आडखळत होते.मी दादाला म्हणालो,”दादा आपुण रस्ता चुकलाव.”माझं बोलणं ऐकून दादा एक इरसाल शिवी हासडायची व म्हणायचा , ” गुपचूप माज्या मागं मागं ये.आपुण बराबर जावूलालाव.” थोडा वेळ चाललो की मी म्हणायचो,”दादा आपुण हरवलो.”दादा ती एकच इरसाल शिवी द्यायचा व म्हणायचा ,” गुपचूप पाज्या मागं मागं ये .”
असं किती वेळ चालत राहीलो हे कळालं नाही ;पण पाटलचं शेत काही आमाला गावलचं नाही.दादा दुरवर नजर फिरवायचा व म्हणायचा , ” ती बग काळीभोर पट्टी त्या पट्टीतच आपली माय शेंगा उकरीत असल .”मला शेतही माहीत नव्हतं. पुन्हा थोडयावेळानं तो म्हणायचा , “अहं ती पट्टी नायी.तशीच वाटली मला .”आता मला तहान लागली होती .मी म्हणालो ,”दादा मला पाणी पाईजे.तान लागलीया.” असं म्हणल्याबरोबर दादाच्या चेहरा कासावीस झाला .तो म्हणाला ,” हे बग आता जवळ आलाव.” मी सारखं म्हणत होतो दादा आपुण चुकलाव ;पण दादा माझं ऐकत नव्हतं.आता आम्ही एका काळ्याभोर शेतात आलो.त्यात शेतात झाडाखाली कोणतातरी देव बसविलेला होता.त्या देवाकडे पाहून दादाने हात जोडले व मला म्हणाला , ” ही की नायी ही मशाई आहे .चोराची देवी हाय. लई घाग राते. येथे भूतबीत कायबी येत नायीत व रातबी नायीत. आपुण कोणालाबी भ्यायचं नायी.”
मी पुन्हा म्हणालो ,”दादा आपुण हारवलोत.”दादाची तीच इरसाल शिवीे देवून तो म्हणाला ,”गुपचूप माज्या मागं मागं ये.” दिवस मावळतीला गेला होता.दिवस कासरा दोन कासराभराचं खाली उतरायचं राहिलं होतं .टेकडीच्या आड लपायची सूर्य तयारी करत होता.मला तहान लागली होती.दादाची नजर पाण्यावरही होती.त्याला एका ठिकाणी दगडांची रास दिसली.दादा आनंदाने ओरडला , ”ते बग तितं हीर हाय बग.चल तितं जाऊत .”
दोघं भाऊ विहिरीजवळ गेलो ;पण दादाने मला विहिरीपासून दूर उभं केलं व म्हणाला , ” इतचं थांब हं पुढं येवू नगस.तू पाण्यात पडशील. म्या माज्या हातात पसाभर पाणी आणतो व तूला पाजवतो.” मला दादानी विहिरीजवळ येवूच दिलं नाही. त्याने विहिरीतून पसाभर पाणी आणायचं ;पण माझ्याजवळ यईपर्यंत त्यात उलूसच पाणी राहायाचं.चिमणीला पाणी पाजविल्यासारखं दादानी मला पाणी पाजवलं . त्यासाठी त्याने दहा चक्करा मारले असतील, पण मला विहिर पाहू दिली नाही व जवळही जाऊ दिलं नाही.
पाणी पिवून निघालो.कुठं चाललो याचा पत्ता नाही.दादाला शेत,रस्ता माहित असुनही सापडत नव्हता.माझं एकच पालपूद चालू होतं ” दादा आपुण हारवलोत.” दादाचंही एकच चालू होतं.”गुपचूप मागं मागं ये.” .आता आम्ही आशा ठिकाणी आलो की ते ठिकाण कोणतं होतं हे दादालाही माहीत नव्हत. ते गाव होतं अतनूर . घनदाट जंगलातून चालत होतो. माझं वाक्य मी उच्चारत होतो. दादा त्याचं वाक्य बोलत होता .
शेवटी आम्हाला एक टेकडी दिसली . ती टेकडी बोडकी होती. उघडी होती.टेकडीचा रंग पांढरा राखोडी होता. त्यावर झाडं नव्हतीच. पायथ्याशी पांढऱ्या कातडीची चार पाच झाडं दिसली.झांड कशाची होती हे आम्हाला कळालं नाही. पण त्या टेकडीला लागून असलेल्या शेतात लिंबाची झाडं होती.त्या ठिकाणी किमान दहा ते पंधरा मोठे प्राणी लिंबाचा पाला खाताना मला दिसले. त्या प्राण्यांला मी प्रथमच पहात होतो. दादा त्या प्राण्याकडे पाहून म्हणाला ,”आरे बापरे आपुण हरवलोय की. ते ऊंठ हाईत ऊंठ. ते आता आपल्याला चावून मारत्यात मारूनबी टाकत्यात. तू बोलू नगस.नायी तर ऊंठचा मालक आपल्याला धरून उदगीरात नेवून विकून टाकतोय .”
आता तेथून आम्ही घाईने परत निघालो. आतापर्यंत मी दादाच्या मागे मागे चालत होतो ;पण दादा मला म्हणाला , ” तू माज्या पुंड हो.मागं रावू नगस तूला ऊंठ खाऊन जाते.” आता मी आजीबात बोलत नव्हतो.उंट ऐकलं तर इकडे येईल अशी भीती वाटत होती.दादाही माझ्या मागे मागे चालत होता.रस्ता चुकल्याची आपण चकव्यात सापडल्याची आता दादाला खात्री पटली होती.आम्ही दिवसभर भुलभुलयात सापडलो होतो. घराजवळूनच चकव्यात सापडून दिवसभर भटकत राहीलो .
तो म्हणाला ,”आता आपुण हारवलाव. घाबरू नगस मी काय करतोय एका उंच झाडावर चढतो.झाडाच्या शेंड्यावरून दूर दूर पातो.पुंडा पाटलच्या शेतातलं मोठं वडाचं झाड दिसलं की आपुण तिकडं जाऊ .हाय का नायी?”मग दादानी एका उंच्च लिंबाच्या झाडावर सरसर वर चढला. झाडाच्या शेंड्यावर गेला.आता त्याला जिंकल्याचा आनंद झालां.दादाला वडाचं झाड दिसलं होतं. तो आनंदाने ओरडला ,” सापडलं सापडलं.” तो आनंदाने झाडावरुन झरझर खाली उतरला. व दोघं भाऊ निघालो.आताही मी पुढे होतो दादा माझ्या पाठीमागून चालत होता.माय दिवसभर तिच्या पिल्ल्यांची वाट पहात होती.जसजसा दिवस खाली सरकत होता तसतसं मायीचं काळीज काळजीने फाटत होतं. काळजाला पीळ पडत होतं.वाट पाहून पाहून ती आता घरी आली होती. घरी माय परेशान होती.सोबत नेलेलं शिळा तुकडाही तिनं खाल्लं नव्हतं.तो तुकडा तिच्या पिल्ल्यांसाठी तिनं जपून ठेवला होता.स्वतःच्या आतडीला पीळ देवून तिच्या पिल्ल्यांना ती भरवणार होती.
माय घराच्या अंगणात कपाळाला हात लावून बसली होती.बा आम्हाला शोधायला बाहेर गेला होता.तो विहिरीजवळ थांबला होता. पाण्यात डोकावून पहात होता.आम्हाला पाहून मायीने बा ला आवाज दिला.मी पळत जावून आईच्या कुशीत शिरलो. दिवसभर काय काय घडलं ते सर्व सांगितलो.मी जे काही सांगत होतो ते ऐकून माय , बा व दादा हसत होते.

राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपूरी , नांदेड -६
९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *