नांदेड ; डॉ. देविदास तारू यांच्या ‘आता मव्ह काय’ या आत्मकथनाचा भव्य प्रकाशन सोहळा आज नांदेड येथे पार पडला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे सर, पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे सर, राज्य महिला उद्योजक परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी सर, आमचे मित्र आणि नदीष्ट या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक मनोज बोरगांवकर, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड टेक्स्टाईल (निजाम काळात उस्मानशाही मिल या नावाने ओळखली जाणारी ) मिल मजुराच्या पोटी जन्माला आलेले आई, सावत्र आई आणि सावत्र भाऊ असलेल्या अतिशय गरीब व शिक्षणाची अजिबातच पार्श्वभूमी नसलेल्या दलित कुटुंबात वाढलेल्या देविदास तारू यांच्या संघर्षाची “आता मव्ह काय ? ” ही प्रांजळ आत्मकथनात्मक कहाणी. आयुष्यातील विविध महत्त्वपूर्ण आठवणी, प्रसंग यांची गुंफण करत अतिशय प्रभावी व ओघवत्या शैलीत त्यांनी आपला कष्टमय व प्रेरक प्रवास उलगडला आहे. पुस्तकात विविध प्रसंगातून विषयाचा गाभा, आशय नेमकेपणाने व्यक्त केला आहे. त्यातील दृश्यमयता इतकी प्रभावी आहे की, हे प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर उभे राहतात.
नांदेड शहरात भीमघाट या मजूरवस्तीतील हंगामी बांबू, दोनचार बाभळीची लाकडे, पाचट, तुराट्या आणि ते बांधण्यासाठी सुतळी किंवा नारळाची दोरी हे म्हणजे घर असे ते आपल्या घराचे वर्णन करतात. दारिद्र्यामुळे बऱ्याचदा तारू यांच्या कुटुंबाला जवळच असलेल्या गुरुद्वाराच्या लंगरमधील जेवणावर गुजराण करावी लागे. वडिलांची सर्व भिस्त मिलच्या कामावर. काम मिळाले नाही तर घरी झोपून राहत. निरक्षर असल्याने मूल होत नाही म्हणून दुसरे लग्न करणारे, मिलमधून घरी येताना दारू पिणारे व्यसनी वडील आणि आपल्याला मूल होत नाही या दुखःपोटी घालमेल सहन करणारी आई, तिची सवतीशी आणि नवऱ्याशी सतत होणारी भांडणे, गरिबी, उपासमार यामुळे घरात सतत असणाऱ्या ताणतणावाच्या परिस्थितीतच लेखकाचा जन्म झाला. जातिव्यवस्थेचे भेदक चटके त्यांना बालवयापासून सहन करावे लागले. नांदेड शहराच्या तुलनेत मामाच्या गावी, ग्रामीण भागात विषमतेची व अन्यायायाची वागणूक तोंड दाबून बुक्क्यांचा मार या स्वरूपात सहन करावी लागत असे. याच काळात सततच्या भांडणामुळे लेखकाची आई कुटुंबाबापासून वेगळे राहू लागली. लेखक आणि तिला जुन्या झोपडीशेजारीच वेगळी झोपडी बांधून देण्यात आली. लक्ष देणारे कोणी नसल्याने त्यांचे शिक्षणापेक्षा पैसे लावून खेळणे, सिनेमा पाहणे, भांडणे करणे, पत्त्याच्या अड्ड्यावर पोऱ्या म्हणून काम करणे यात ते कसे भरकटले यांचे अतिशय प्रामाणिक वर्णन त्यांनी केले आहे. परिस्थिमुळे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करताना आलेले तसेच मंदिराबाहेरील चप्पल बूट आणि वेगवेगळ्या चोरीच्या कामाचे, रॉकेलची विक्री करण्याचे अनुभव व होरपळले बालपण अतिशय प्रत्ययकारी शब्दांत त्यांनी आपल्या आत्मकथनात मांडले आहेत.
दारूकरिता पैसे चोरण्याचा तसेच पहिल्याप्रथम दारू पिण्याचा त्यांचा अनुभव अतिशय भेदक शब्दात व्यक्त झाला आहे. आपल्या आयुष्यातील दुःख त्यांनी कवितेमध्ये देखील व्यक्त केली आहेत. पुस्तकात श्रावणाच्या पावसामुळे झोपडीत शिरलेले पाणी व त्यामुळे त्यांना व आईला सहन करावा लागलेला त्रास व त्यामागील वेदना मोजक्या शब्दात त्यांनी वाचकांच्या डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत. त्यातील दाहकता वाचून समजू शकते इतक्या त्या सच्च्या आहेत. साहसापोटी चालत्या ट्रेनच्या डब्यांवरून उड्या मारणे, जीवघेणे स्टंट करणे हा अनुभव अतिशय चित्तथरारक शब्दात व्यक्त केला आहे. गरिबीमुळे जीवनाला दिशा नाही, मार्गदर्शन करणारे कुणी नाही या अस्वस्थेत आयुष्यातील भरकटणे देविदास तारू प्रभावीपणे येथे व्यक्त करतात.
आंबेडकरी कार्यकर्ते गोविंद वन्ने यांच्यामुळे लेखकात शिक्षणाची लागलेली ओढ, तू मोठेपणी कोण होणार ? या त्यांच्या प्रश्नामुळे आता मव्ह कायं ? (आता आपले काय) या स्वतःलाच विचारलेल्या प्रश्नाचा घ्यावासा वाटणारा स्वतःचा शोध आणि त्याकरिता त्यांनी केलेला संघर्ष हा मुळापासून वाचण्यासारखा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिका -संघटित व्हा -संघर्ष करा हा महत्त्वपूर्ण संदेश लेखकाच्या आयुष्याला नवे वळण, नवी दिशा देणारा कसा ठरला याची कहाणी म्हणजे “आता मव्ह काय ? ” हे पारदर्शी व आशावादी आत्मकथन होय. सावत्र आईने व भवतालच्या परिस्थितीने त्यांचा सातत्याने केलेला अपमान हाच प्रेरणा कसा देणारा ठरला, संकटाना संधी मानून त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला यांची कितीतरी प्रेरक उदाहरणे, प्रसंग या आत्मकथनात वाचायला मिळतात. “अत्त दीप भव” हा गौतम बुद्धांचा संदेश समजून घेत, अंगी बाणत देविदास तारू यांनी केलेला प्रवास लक्षणीय आहे, उद्बोधक आहे, आशावादाची नवी पेरणी करणारा आहे. मुळातच हुशार, संवेदनशील असलेल्या परंतु परिस्थितीने आणि सभोवतालच्या जातिव्यवस्थेने पदोपदी संघर्ष कराव्या लागणाऱ्या देविदास तारू यांच्या आयुष्यातील सर्वच प्रसंग अतिशय प्रेरणादायक व चिंतनीय आहेत. व्यसनाधीन, वाया गेलेला मुलगा ते लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थीप्रिय, पीएचडी पदवीप्राप्त आदर्श शिक्षक हा त्यांचा कायापालट, शिक्षणाने केलेला खराखुरा चमत्कार समजून घेण्यासाठी “आता मव्ह काय ? ” हे प्रभावी आत्मकथन वाचायलाच हवे. या समृद्ध लेखनाच्या रूपाने मराठी साहित्यात उत्तम आत्मकथनाची भर पडली आहे हे निश्चित. देविदास तारू यांच्याकडून अधिकाधिक उत्तमोत्तम लेखन होवो या मनःपूर्वक सदिच्छा
साभार fb