नमस्कार, आपल्या सर्वाना माहित आहे की, अमरनाथ यात्रा सर्व यात्रामधे सर्वात कठीण मानली जाते. बहुतांश लोकांना आपल्या सम्पूर्ण आयुष्यात एक वेळेस देखील अमरनाथचे दर्शन करणे अवघड असते.परंतु बाबा बर्फानी चा माझ्यावर विशेष आशीर्वाद आहे असे मी मानतो. याची यावेळी मला प्रचिती देखील आली आहे.गेल्या २० वर्षापासून अखंड सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेला या वर्षी खंड पडतो की काय याची भीती वाटत होती. कारण ही तसेच होते, मला २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरुद्ध केलेल्या महागाई विरोधातील एका आंदोलनात झालेली ५ वर्षाची शिक्षा. परंतु पंढरीच्या वारी प्रमाणे भक्ती भावाने अमरनाथला दरवर्षी जात असल्यामुळे परमेश्वर काही तरी वेगळा मार्ग नक्कीच काढेल असा दृढ विश्वास होता आणि अवघ्या आठच दिवसात हायकोर्टातून जामीन मिळाली. पण याच कालावधीत अमरनाथ चे रजिस्ट्रेशन देखील सुरु झालेले होते. त्यामुळे प्रचंड धावपळ करावी लागली. प्रत्येक इच्छुकांना पंजाब नॅशनल बँकेत जाऊन बायोमेट्रिक नोंदणी करणे या वर्षी पासून सक्तीचे केल्यामुळे फक्त ७१ यात्रेकरूंना नियोजित तारीख मिळू शकली. त्यामुळे दरवर्षीचा १०५ यात्रेकरुंचा आकडा काही गाठता आला नाही याची थोड़ी खंत मनात राहिली. परंतु परमेश्वरच्या मर्जी पुढे आपले काय चालणार. आणखी बरेच जणांचा येण्यासाठी आग्रह असल्यामुळे दुसऱ्या जथ्याची घोषणा केली. ७० चा कोटा हा हा म्हणता संपल्या मुळे अनेकांची निराशा झाली. त्यांना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये संपर्क करण्याच्या सूचना दिल्या.
यात्रा पर्ची हातात आल्यानंतर मग खरे नियोजन सुरु होते. प्रत्येकाला कन्फर्म रेल्वे तिकीट मिळालेच पाहिजे पण ते देखील शक्यतो एक दुसऱ्या कोच मध्ये.जातांना नांदेड ते जम्मू हमसफर एक्सप्रेस, येतांना अमृतसर दिल्ली शताब्दी आणि नंतर दिल्ली ते नांदेड गंगानगर एक्सप्रेस ची तिकिटे कन्फर्म मिळाली. मुक्कामाच्या ठिकाणचे हॉटेल बुकिंग तसेच रेल्वे प्रवास संपल्यानंतर आगेकूच करण्यासाठी दोन बसेस बुक केल्या. गेल्या 20 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामुळे हे कठीण नियोजन मी खात्रीपुर्वक करून घेतले. याच सुनियोजित स्वभावामुळे 20 वर्षाच्या या अखंड यात्रे मधे आज पर्यन्त कुणाचीच ग़ैरसोय झालेली नाही. बुकिंग पूर्ण होताच जाण्याच्या २ महिने आधीपासून श्रीराम सेतु गोवर्धन घाट येथे चालण्याचा आम्ही सर्वानी सराव आम्ही सुरू केला. दररोज सहा किलोमीटर पायी चालणे व त्यानंतर १५ मिनिटाचे प्राणायाम यामुळे अमरनाथ यात्रेसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सर्वजण सक्षम झाले. रत्नेश्वरी पाऊस दिंडीमध्ये शारीरिक दृष्ट्या कोन कितने पानी मे है याचा प्रत्येकाला प्रत्यय आला आणि एक छोटीसी यात्रेची रंगीत तालीम देखील झाली. अमरनाथ चे रजिस्ट्रेशन केलेल्या प्रत्येकाचा १ लाखाचा विमा केंद्र सरकार तर्फे काढण्यात येतो. परंतु तो फक्त दर्शन मार्गापुरता मर्यादित असल्यामुळे आम्ही वेगळा ट्रॅव्हल इन्शुरन्स काढतो.
अमरनाथ यात्रेत जागोजागी भोजनाचे लंगर असतात. ज्या ठिकाणी लंगर नसतात तिथे गेल्या २० वर्षा पासून माझे अनेक मित्र, हितचिंतक तसेच जुने अमरनाथ यात्री जेवण देतात. सहसा यात्रेकरूंना जेवण विकत घेण्याची वेळ येत नाही. अमरनाथ यात्रा ही ना नफा ना तोटा या तत्त्वावर आयोजित करत असल्यामुळे इतर यात्रेत असणारी आमची केटरिंग टीम सोबत नसते. अन्नदान करण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर,सतीश सुगनचंदजी शर्मा,डॉ. अजयसिंह ठाकूर ,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, प्रतिमा राजेंद्र चौधरी, मनोज शर्मा नागपूर,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,ज्ञानोबा जोगदंड,सरदार कुलदीपसिंघ,ओमप्रकाश पाम्पटवार,सरदार जागीरसिंघ,सरदार प्रताप फौजदार,अशोक जायस्वाल ,स्नेहलता जायसवाल ,शेंदूरवाडकर व रावके,प्रदीप शुक्ला, अरुण लाठकर, महेश जायस्वाल, शशिकांत कुलकर्णी यांनी तयारी दर्शवली. त्यामुळे माझे बरेच काम हलके झाले. सदानंद मेडेवार यांच्या पुढाकारामुळे नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिष्ट्र असोशियन तर्फे मोफत औषधी मिळाल्या.
ग्रुपमधील सदस्य त्वरित ओळखू यावे यासाठी अमरनाथ यात्री संघातर्फे सर्वांना टी-शर्ट, रेनकोट व कॅप देण्यात येते. दरवर्षीचा रंग वेगवेगळा ठेवत असल्यामुळे आतापर्यंत वीस रंगाचा वापर झाला. नवीन कोणताच रंग न आढल्यामुळे काळ्या रंगाचे टी-शर्ट व रेनकोट छापून घेतले. रत्नेश्वरीच्या गेट टुगेदर मध्ये त्याचे वाटप केले.
यात्रेचा दिवस जसा जसा जवळ येत तसा प्रत्येकाच्या मनात उत्साह दिसून येतो होता.प्रत्यक्ष यात्रेला जाण्याच्या एक दिवस आधी सर्व तयारीचा पुन्हा एकदा आढावा घेतला. एकेक तिकीट तसेच आय कार्ड व यात्रा पर्ची,ट्रॅव्हल इन्शुरन्स सर्व काही व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करतांना रात्रीचे २ वाजले होते. सम्पूर्ण अमरनाथ यात्रेचे प्रत्येक दिवशीचे सुमधुर वर्णन दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आपण सर्वानी वाचावे अशी मी माझ्या सर्व वाचक वर्गाला विनंती करतो.
( क्रमशः )