आंबेडकरी सूर्यकुलातील सौंदर्य संज्ञा – भदंत पंय्याबोधी थेरो

 

गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या कालखंडात आंबेडकरी विचारधारेने प्रेरीत असलेल्या धम्म चळवळीला आपल्या कार्यप्रवण प्रतिभेच्या माध्यमातून गतिमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समुहातील एकमेव आंबेडकरी भिक्खू भदंत पंय्याबोधी थेरो हे आजच्या काळातील नांदेडसह मराठवाडा आणि राज्याबाहेरील काही राज्यात आपल्या धम्मकार्याची सौंदर्यसंज्ञा बनले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली धम्मचळवळ आणि त्या चळवळीचे वाहक म्हणून खऱ्या अर्थाने भिक्षूंची निर्मिती केवळ अपेक्षून चालणार नाही तर ती प्रत्यक्षात कार्यान्वित करून थांबलेपणाला गतिमान करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले भदंत पंय्याबोधी काळाच्या प्रवाहावर आपली नाममुद्रा अंकित करण्यात यशस्वी ठरले आहेत. सुर्यकुलात जन्माला आलेल्या या सर्वसामान्य आंबेडकरी कार्यकर्त्याने चळवळीच्या नावाखाली निव्वळ वळवळ करणाऱ्या स्वार्थी दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी आणि धम्मचळवळीतील भ्रष्ट आचार थांबवण्यासाठी ‘सौ चुहे खाके बिल्ली चले हज’ असे न करता जीवनातील सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून ऐन तारुण्यात अंगावर चिवर घेऊन बुद्धमार्ग निवडला आहे. भदंत पंय्याबोधी थेरो यांचा आजपर्यंतचा प्रवासही काही सुखकारक नाही, तो आजही संघर्षानेच भरलेला आहे.

धम्मचळवळीचे सौंदर्य विज्ञान लोकांना शिकवण्यासाठी आणि त्यांना सुपथी लावण्यासाठी गेल्या कैक वर्षांपूर्वी हा मार्ग त्यांनी निवडला होता. याचे तत्कालीन आंबेडकरी समाजाने अद्वितीय स्वागत केले आणि समाज अत्यंत खंबीरपणे या चारिकेच्या मार्गावर उभा राहिला. आज त्याची सुमधुर फळे आपण चाखत आहोत. हीच या भदंतांची उपासक उपासिकांच्या साथसंगतीने कमावलेली खरी शाश्वत संपत्ती आहे.‌

नांदेड शहरापासून जवळच असलेल्या तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो हे आहेत. ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत हे प्रशिक्षण केंद्र चालते. या ठिकाणाहून शिबिरांच्या माध्यमातून श्रामणेर दीक्षा घेणाऱ्या सर्व वयोगटातील उपासकांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. त्याआधीही त्यांनी अनेक श्रामणेर प्रशिक्षण शिबीरे आयोजित केलेली आहेत. तीर्थक्षेत्र दाभडसह शहरातील विविध ठिकाणी आणि शहराच्या सीमावर्ती जिल्हा परिसरात त्यांचे योगदान मोठे आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वर्षाचे ३६५ दिवसांत उपासकांच्या इच्छेप्रमाणे कधीही श्रामणेर दीक्षा दिली जाते. किमान दहा दिवस ते एक महिना, दोन महिने, तीन महिने किंवा वर्षभर अशा पद्धतीने दीक्षा घेऊन बुद्ध विचारांनी मंगलमय बनलेल्या पर्यावरणात राहण्याची सुविधा त्याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी भिक्षू होणाऱ्यांना भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली उपसंपदाही दिली जाते. बाबासाहेबांना अभिप्रेत धम्मचळवळ गतिमान करण्यासाठी भिक्खूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे असे ते म्हणतात आणि त्यापद्धतीने ते कार्य करीत असतात.‌ एवढे नव्हे तर बौद्ध कुटुबांस एक मुलगा भिक्खू संघाला कायमस्वरूपी दान देण्याबाबत ते नेहमी आवाहन करीत असतात. या आवाहनालाही आता प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. ही जमेची बाजू आहे. कारण वयस्कर व्यक्तींपेक्षा बालवयापासूनच कायमस्वरूपी दीक्षा घेण्याबाबत ते फार आग्रही असतात. खुरगाव नांदुसा येथून गावोगावी जाणाऱ्या धम्मसंदेश आणि धम्मदान यात्रेच्या माध्यमातून अनेक गावांतून धम्ममिरवणूका काढून धम्मदेसनेचे कार्यक्रम संपन्न झाले आहेत. लोकांमध्ये धम्मानुकरणाने जगण्याची प्रेरणा जागृत करण्याचा त्यांचा महत्प्रयास सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भदंत पंय्याबोधी यांच्या हस्ते सामुहिक मंगल परिणय सोहळे साजरे झालेले आहेत. नांदेडसह इतर जिल्ह्यांतील सर्वधर्म विवाह सोहळ्यांनाही ते उपस्थित राहिले आहेत. या सोहळ्यांच्या आयोजनामागे आणि अनेक गावांतून संपन्न होणाऱ्या धम्मपरिषदांच्या आयोजनामागे त्यांची असलेली अंतःस्थ प्रेरणा कुणालाही नाकारता येत नाही.

दरवर्षी जगभरातील बौद्ध राष्ट्रांचा धम्माभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडून श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांच्या दौऱ्यांचे आयोजन केले जाते. यात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झालेले आहेत. तसेच अजूनही होत आहेत. शक्य तितक्या गावात बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी तेथील बौद्ध उपासक उपासिकांचे उद्बोधन केले आहे. असे सोहळे गावोगाव घडून येत आहेत. नांदेड शहरात केवळ महिला बौध्द उपासिकांनी आयोजित केलेला आणि कमालीचा यशस्वी झालेला भव्यदिव्य असा ऐतिहासिक मंंगल परिणय सोहळाही भदंत पंय्याबोधी यांच्या हस्ते संपन्न झाला. याबरोबरच कौटुंबिक बौद्ध विधी संस्कारासही ते तत्पर असतात. या सगळ्यांची प्रेरक प्रेरणा सद्य:स्थितीत खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दर महिन्याच्या १९ तारखेला पौर्णिमेनिमित्त आयोजित पौर्णिमोत्सव या कार्यक्रमातून प्रसवते आहे. या ठिकाणावर दररोज अनेक उपासकांची ये-जा असते. दर पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच परित्राणपाठ, सूत्तपठण, गाथापठण, त्रिसरण पंचशील ग्रहण, बोधीपूजा, त्रिरत्न वंदना, ध्यानसाधना, धम्मध्वजारोहण, दान पारमिता भोजनदान, बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम, व्याख्याने आदी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच इच्छुकांना धर्मांतर दीक्षाही दिली जाते. या दिवशी जिल्हाभरातून तसेच परभणी, हिंगोली परिसरातून बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. याच ठिकाणावर अकरा फुटांची तथागताची अखंड पाषाणात कोरलेली भव्य मूर्ती एका भव्य विहारावर प्रतिष्ठापित करण्याचा ‘धम्मसंकल्प’ दान‌पारमितेच्या माध्यमातून त्यांनी केला आहे. आजपर्यंत ज्या पद्धतीने लोकांनी दान दिले त्याच पद्धतीने हा संकल्पही पूर्णत्वास जाईल असा त्यांचा मानस आहे.

धम्मचळवळीत सतत कार्यरत असल्यामुळे आणि अनेक प्रकल्प हाती घेतल्यामुळे काही विघ्नसंतोषी लोकांच्या मनात खट्टू होणे स्वाभाविक आहे. भारतात वैचारिक शत्रू लवकर निर्माण होतात आणि राजकीय हळूहळू. परंतु बौद्धांना राजकीय मर्यादा असल्या तरीही बौद्ध भिक्षू राजकीय भूमिका घेत असतील तर प्रस्थापित चेल्या चपाट्यांची मोठीच गोची होते. त्यामुळे ते लवकर द्वेष, मत्सरांच्या पटलावर येतात. भदंत पंय्याबोधी थेरो हे पर्यावरणवादी आहेत. खुरगाव परिसरात दोन हेक्टर क्षेत्रावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेले आहे. अहिंसक वन्य पशू आणि पक्षांसाठी त्यांनी या ठिकाणावर मोठा अधिवास निर्माण केला आहे. तसेच उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे सुद्धा तयार केले आहेत. नैसर्गिक पर्यावरण ढासळत चालले आहे ते जीवसृष्टीसाठी घातक आहे असे त्यांना वाटते. तद्वतच आंबेडकरी राजकीय पर्यावरणही प्रदुषित होत असल्यामुळे भिक्षू असूनही एका आंबेडकरी कार्यकर्त्याची भूमिका त्यांना घ्यावी लागते आहे. कारण या पर्यावरणात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक राजकीय पक्षांतील कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या संपर्कात आहेत परंतु सर्वत्र स्वार्थ आणि उचलेगिरी बोकाळली असल्याचे आपणास पहावयास मिळते. त्यामुळेही ते व्यथित होतात. अनेकदा अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या असतांना ते संबंधित मोर्चे, निदर्शने वा आंदोलनात हिरीरीने सहभागी झालेले आहेत. ते जात्याच आंदोलकी असल्यामुळे ते रस्त्यावरही ठामपणे उभे राहतात. ते पळपुटे भिक्षू नाहीत. परिस्थितीला पाठ दाखवून निघून जाणारे नाहीत. चिघळलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे येथे जाणिवपूर्वक अधोरेखित केले करणे आवश्यक वाटते. समाजातील अनेक घटनांसंबंधी पोलिस प्रशासनाशी सम्यक संवाद ठेवून सलोखा निर्माण करण्याचेही काम त्यांनी केले आहे. या सर्व घटनांचे साक्षीदार समाजात आहेत; जिवंत आहेत! शांतता कमिटीच्या बैठकीतील चर्चेनंतर सामाजिक शांतता, सलोखा आणि सर्वधर्मसमभावाची भावना निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. मात्र बदलत्या काळानुसार काही लोकांची पोटदुखी वाढली आहे. भदंत पंय्याबोधी हे राजकारण करतात हा आरोप काही राजकीय पक्षांच्या उपासकांनी त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या काही अतार्किक घटनांमधून निर्माण झाला आहे. गैरसमजातून आरोप करण्यामागे अशा काही लोकांची स्वार्थी मानसिकताच दिसून येते.

भिक्षूंनी राजकीय असू नये अशी आपली सर्वांची प्रामाणिक इच्छा असते. कारण तसे झाले तर आपली दुकानदारी चालणार नाही, दलाली थांबेल आणि राजकारणाच्या बाजारात आपल्याला काही किंमत उरणार नाही अशी‌ आपणाला भिती वाटत राहते. हेच या दुःखाचे मूळ आहे. भिक्खूंनी फक्त धम्मकार्यच करावे तसेच धार्मिक पौरोहित्य करावे असेच आम्हाला वाटते. ही पारंपरिक मानसिकता आपण बदलवायला तयार नाही. इतरांच्या कट्टरतेला नावे ठेवत ठेवत आपणही कर्मठ झालो आहोत. खरं तर मुळात आपण सर्वक्षेत्री परिवर्तनवादी आहोत. चिकित्सक आहोत. ते असायलाच हवे. काळाप्रमाणे होणारे बदल आपण स्वीकारलेच पाहिजेत. अनेक बौद्ध राष्ट्रांत बौद्ध भिक्षू त्यांच्या विधानसभेत किंवा संसदेत आहेत. पण आपण आपल्या भागातून एकाही भंतेंना आमदार किंवा खासदार झाल्याचे पाहू शकत नाही किंवा निवडणुकीसंबंधी तिकीट मागितले तरीही ते आपण सहन करु शकत नाही, इतके आपण परंपरावादी झालो आहोत. कारण इतर राष्ट्रांतील आणि भारतातील परिस्थिती भिन्न भिन्न असल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आपणच करतो. परंतु इतर धर्मातील साधू, साध्वी हे मंत्री, मुख्यमंत्रीपदी असण्याला आपली काही हरकत नसते. भदंत पंय्याबोधी थेरो हे राजकीय भंते नाहीत तर ते राजकीय भूमिका घेणारे भिक्षू आहेत. भारतीय संविधानच त्यांना ही भूमिका घेण्याची संधी देते. ते जर राजकारणात आले तर काही जणांच्या पायाखालची वाळूच नाही तर जमीनही सरकेल अशी असणारी परिस्थिती आपल्या भागात आहे. एवढेच नव्हे तर भिक्खूंनी अधिक शिक्षण घेणे, नेटसेट परीक्षा पास होणे, पीएचडी करणे किंवा प्राचार्य असणे हे मानवत नाही म्हणजे दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात आपण भिक्षूंना सहन करु शकत नाही. सगळे करुन सवरुन अपरिहार्य परिस्थितीत अगदी उतारवयातच भिक्षू बनलेल्या यांच्या मोठ्या समुहालाही तसेच वाटते.

धम्मचळवळीसमोर म्हणजेच
आंबेडकरी समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पुर्वीही होते आणि आजही आहेतच. कारण प्रश्नांची मालिका खंडित होणे आज तरी शक्य नाही. संघर्ष तर युगानुयुगे राहणार आहे. खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या संबंधाने त्यांना व त्यांच्या भिक्खू संघाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत‌ आहे. आजच्या समाजव्यवस्थेकडून आजही आपणास आणि भिक्षूंनाही अतिशुद्र मानसिकतेच्या संदर्भाने वागविले जात आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीवरील विशेषतः जातीसंबंधाने दबावतंत्राचे, अन्यायाचे, अत्याचाराचे आणि सर्व प्रकारच्या छळवादाचे प्रमाण वाढत चालल्याने या सगळ्यांच्या भक्ष्यस्थानी प्रामुख्याने बौद्धच आहेत. याचे अक्षय भालेरावच नाही तर असंख्य उदाहरणे देता येतील. खुरगावलाही त्यांना हा त्रास होतच असतो.‌ दमनकारी मंडळी दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले ध्येय साध्य करीत असतात
पण आपण आपल्यातील विविध होकारार्थी/नकारार्थी तपशिलांवरुन भांडत बसतो. विनाकारण वाद विवाद ओढवून घेतो. व्यसनाधीनता, शिक्षणाबद्दलची बहुसंख्यांकाची अनास्था, तरुणांची बिघडलेली वाट, हिंसक वृत्तींची वाढ असे अनेक प्रश्न त्यामुळे बाजूला पडतात. हे योग्य नाही. आंबेडकरी भिक्खू हा धम्मचळवळीचा पूर्णवेळ कार्यकर्ता असतो. म्हणूनच भंते पंय्याबोधी हे केवळ बुद्धाचेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही सैनिक आहेत. म्हणूनच आपण संक्रमणावस्थेतून जात असलेल्या काळात सामाजिक प्रश्नांवर मूलगामी विश्लेषण मांडणारे ते भंते आहेत. ६ जुलै ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने काही अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नाही.‌ यापुढे अथक अभ्यास आणि चिंतन करणारा सक्रीय क्रांतीकारी भिक्खू म्हणूनच त्यांनी समाजात यायला हवे आणि प्रबोधन करायला हवे. कुणाच्याही असमर्थनीय टीकेला दुर्लक्षून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय आणि सत्याच्या प्रस्थापनेत निर्णायक युद्ध झाले तरी त्यात उडी घेण्याची क्षमता त्यांनी ठेवायला हवी. पुढील काळात समाजक्रांतीच्या धगधगत्या कार्यशाळेत त्यांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन सर्वांप्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो. जयभीम!.

 

 

– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.
संकल्पक,
धम्मसंदेश आणि धम्मदान यात्रा, श्रामणेर
प्रशिक्षण केंद, ता. जि. नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *