पूर्वी प्रवास हा अवघड यातायातीचा विषय असल्याने तो आवश्यकता व गरजेनुसार आणि अपरिहार्यतेतून केला जात असे. ‘काशीस जावे नित्य वदावे ‘ही त्या काळजी प्रवासाची धारणा होती. केवळ अपरिहार्यता असेल तरच प्रवास केला जात असे. खडतर प्रवास मार्ग, संसाधनांची उपलब्धता, सुलभता ही त्या मागची मुख्य कारणे होती. पण मागील पन्नास वर्षात रस्ते लोहमार्ग आणि विमान मार्ग तसेच जलमार्ग या चारही प्रकारात काळाप्रमाणे साधनांची सुलभता झाल्यामुळे माणसाचा प्रवास करण्याची वृत्ती वाढली आहे. पर्यटन संस्कृतीत वाढ होत आहे. श्रीलंका ,मालदीव .मलेशिया. बँकॉक, अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.
या पर्यटनाचे देखील धार्मिक किंवा अध्यात्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, निसर्गरम्य स्थळांना भेटी असे प्रकार पडले आहेत.त्यामुळेच की काय सहज होणारा प्रवास इतरांना कळावा, त्यांना मदत व्हावी यासाठी मराठी वाड्:मयात रुढ झालेला प्रकार म्हणजे ‘प्रवास वर्णन ‘.
……मी स्वतः पर्यटन व्यवसायात असल्याने गेल्या २१ वर्षापासून अमरनाथ यात्रेबद्दल लिहित आहे.
प्रत्येक प्रवासात येणारे अनुभव वेगळे तर असतातच पण वैयक्तिक पातळीवर समॄद्ध करणारे ठरतात.
जम्मू तावी ला पोहोचल्यानंतर रात्री एक वाजता चौधरी ट्रॅव्हल्स च्या दोन गाड्यांनी सर्व प्रवाशांसह आम्ही श्रीनगरकडे कूच केली. गेल्या दोन-तीन वर्षात या भागात नितीनजी गडकरी मुळे अतिशय सुबक आणि सुंदर रस्ते निर्माण झालेले आहेत त्यामुळे प्रवास अतिशय सुखकर झाला. श्रीनगरला हॉटेलमध्ये आम्ही दुपारी साडेबारा वाजता येऊन पोहोचलो. हॉटेल स्नो पॅलेस मधील दुपारचे जेवण पाम्पटवार यांच्या सहकार्याने खेळीमेळीत पार पडले. नांदेड ते श्रीनगर हा रेल्वे व बस गाडीचा प्रवास एकूण 48 तासाचा होतो. त्यामुळे श्रीनगर मधील ही संध्याकाळ प्रवासी यात्रेकरूंना त्यांच्या मर्जीनुसार घालवा असे सांगितले. इतक्या किचकट प्रवासानंतर देखील जेवण झाल्यानंतर दोन वाजता काही हौशी प्रवासी श्रीनगर मधील पर्यटनास बाहेर पडले. मी मात्र आराम करायचे ठरवले कारण आराम करत असतानाच काही चिंतन देखील करायचे होते.
अमरनाथ यात्रा म्हणजे अध्यात्मिक पर्यटन या अध्यात्माच्या अनुभूती आणि त्याची सांगड वैयक्तिक पातळीवर ज्याची त्याने लावायची असते.
या प्रवासात आमच्या समूहामध्ये असलेले अरविंद चौधरी आणि त्यांच्या सौभाग्यवती अंजली चौधरी यांच्या बद्दल आज जरा लिहावेसे वाटते. नांदेड येथे दि.१७ रोजी सौ. अंजली चौधरी यांच्या पायाला फार मोठी दुखापत झाली होती. रोजच्या दहा प्रकारच्या वेदनाशामक गोळ्या आणि इंजेक्शन घेणे चालू होते. त्यांची आंतरिक इच्छा अमरनाथच्या यात्रेला येण्याची असल्याने फिजिओथेरपीची ट्रीटमेंट सुरू केली होती. फारसा फरक पडला नव्हता. पण जिद्दीने त्या रत्नेश्वरी पदयात्रेत देखील काही वेळ सहभागी झाल्या. नांदेड रेल्वे स्टेशनवर अमरनाथ यात्रेसाठी त्या जमा आल्या तेव्हा चेहरा जरी हसरा असला तरी होणाऱ्या वेदना लपत नव्हत्या. नांदेड ते जम्मू तावी या रेल्वे प्रवासात त्यांच्या बाजूला जम्मू येथील प्रिया मेहता नावाची महिला सह प्रवासी होती. थोडीफार ओळख आणि बोलचाल झाल्यानंतर चौधरी वहिनी अमरनाथ दर्शनासाठी जात आहेत हे कळल्यानंतर तिने वहिनींच्या दोन्ही पायाला विशिष्ट रीतीने मसाज करून दिला. आणि काय आश्चर्य चौधरी वहिनींच्या पायातल्या सर्व वेदना संपूर्णपणे संपल्या. बाबा बर्फानी को मेरा भी नमस्कार कहना एवढे म्हणून तिने दिल्लीला निरोप घेतला.चौधरी वहिनींच्या अंतरिक इच्छेला बाबा बर्फानी दिलेला हा प्रतिसाद म्हणायचा की आणखीन काही हे ज्याचे त्याचे जाणे त्याने ठरवावे.
ईश्वरावर निष्ठा असणाऱ्यांसाठी हा अनुभूतीचा विषय ठरू शकतो एवढे नक्की.
(क्रमश 🙂