मागील भागात मी जरी म्हटले असले की बालटाल बेस कॅम्प मधील लंगर मध्ये भोजन करून आम्ही झोपी गेलो ते तितके खरे नाही. कारण अमरनाथच्या दर्शनासाठी पालखीने जाणारे प्रवासी,घोड्यावर जाणारे प्रवासी यांच्या प्रवासाची सरकारच्या निर्देशनाप्रमाणे ॲडव्हान्स पेमेंट करून रिसीप्ट बनवावी लागते. आमच्या यात्रेकरूंची ही ॲडव्हान्स रिसिप्ट बनवण्यातच रात्रीचे 11 वाजले. मागील वर्षापासून केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची अडवणूक होवू नये यासाठी पालखीचे तसेच घोड्याचे दर ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे या पुढे जास्त दर कोणालाच घेता येणार नाही. अग्रीम रक्कम अदा केल्याची पावती व यात्रेकरूचे आरएफआयडी हे जागोजागी तपासल्या जाते. आरएफआयडी मुळे प्रत्येक यात्रेकरू नेमका कुठे आहे ते ट्रेस होत असल्यामुळे कोणीही हरवत नाही. या नवीन यंत्रणेमुळे
यात्रेकरूंची सर्वतोपरी काळजी केंद्र सरकार घेत असल्याचे स्पष्ट होते.ही हिंदू भाविकांसाठी अत्यंत समाधानाची गोष्ट आहे.
माझ्यासोबत आलेल्या ७१ प्रवाशांपैकी २६ प्रवाशांनी डोलीत जायचे ठरवले ,४१ प्रवाशांनी घोड्याने जाण्यास पसंती दिली, ४ जणांनी हा प्रवास पायी करायचे ठरवले. पालखीने जाण्यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे सध्या एका प्रवाशास १८०५० रुपये तर घोड्याने जाणाऱ्या ४४५० रुपये असा निर्धारित केलेला दर आहे. अर्थात आपल्याला पालखीने नेणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा घोड्यावर जाताना घोड्यासोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी राजीखुशीने काही खर्च हा होत असतोच.
भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे अमरनाथ ची नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे ८ ते २० फूट उंचीचे असते. परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत. मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे, त्या घळीमधून पाणी टपकत असते व त्यामुळे हे शिवलिंग तयार होते हे विशेष.याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असेही म्हणतात. त्या गुहेचा परिघ सुमारे दीडशे फूट आहे.श्रावण पौर्णिमेला लिंग पूर्ण आकारात येते आणि अमावस्या पर्यंत हळूहळू लहान होते. आश्चर्याची बाब म्हणजे हा शिवलिंग घन बर्फाने बनलेला आहे. इतर गुहेत सहसा कच्चा बर्फ असतो जो हातात घेतला की लगेचच चुरा होईल. मूळ अमरनाथ शिवलिंगपासून काही फूट अंतरावर एकसारखेच आईसबर्ग आहेत.ते गणेश,कार्तिकेय आणि पार्वती आहेत अशी सर्वांची धारणा आहे.असे मानले जाते की, भगवान शंकरांनी पार्वतीला या जागी अमरत्वाचे रहस्य समजावले होते.ही कथा ऐकवताना दोन कबुतरांनी पण ऐकली ज्यामुळे ही कबुतरे देखील अमर झाली.इतक्या उंचीवर कमी ऑक्सिजन मध्ये दुसरे कोणतेही चिटपाखरू आढलत नाही.पण कबुतरांचे दर्शन या गुहे जवळ काही जणांना होते.
रात्री दिलेल्या सूचनेनुसार सर्वजण ३ वाजता गरम पाण्याने स्नान करून तयार झाले. प्रत्येकाचे छोटे छोटे गट करून त्यांना डोली किंवा घोड्यावर बसवून दिले. त्यानंतर मी घोड्यावरून निघालो. आम्ही सर्वांनी २१ वी अमरनाथ यात्रा नांदेड असे छापलेली काळी जर्सी आणि भगवी टोपी घातलेली असल्यामुळे सर्वजण लगेच ओळखू यायचे.डोमेल गेट ५ वाजता उघडतात, पण गर्दी जास्त होत असल्यामुळे आम्ही एक तास आधी पासूनच रांगेत उभे होतो. गेट उघडताच सर्वांची कडक तपासणी करून सोडण्यात आले. या वर्षी अमरनाथ यात्रेच्या मार्गात अनेक सुधारणा करण्यात आलेली दिसली. रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली होती. दरीच्या बाजूला बहुतेक ठिकाणी ब्यरेकेटिंग केलेली आहे. ज्या ठिकाणी दगड कोसळण्याची भीती होती तिथे जाळी लावलेली होती. संपूर्ण यात्रा मार्गावर लायटिंग लावण्यात आल्यामुळे रात्री देखील प्रवास करता येतो.
एकदोन जागी थांबून आम्ही सकाळी ११ च्या सुमारास गुहे जवळ आलो. अडीच किलोमीटर आधीच घोडे वाल्याना पोलिसांनी उतरविले. पालखी वाले मात्र आपल्या सवारी ला गुहेपर्यंत नेत होते. शेवटचे अंतर बर्फातून चालावे लागते आणि तिथेच खरी दमछाक होते. दम लागला की थोडीशी विश्रांती घ्यायची आणि परत पुढे चालायचे. एका ठिकाणी मी आणि जयवंत पांडागळे सर बसलो होतो. त्या ठिकाणी काही तामिळी भाविकांचा ग्रुप आपसात चर्चा करीत होते की,इतक्या कठीण यात्रेत दुसऱ्यांदा कोणी येणार नाही. त्यावेळेस पांडागळेसर म्हणाले की, आमचे दिलीपभाऊ २१ व्या वेळेस आले आहेत तेव्हा त्यांनी अक्षरशः माझे पाया पडले आणि सांगितले की, तुम्ही खरंच देवदूत आहात. आम्हाला एकदाच दर्शनाला येतांना ३३ कोटी देव आठवले पण तुम्ही खरंच भाग्यवान असून तुमच्या वर दैवी कृपा आहे.
अडीच किमी चालणे जड जात असल्यामुळे काही जण तिथे २ ते ३ हजार रुपये देऊन डोली वर नाईलाजाने जातात. लंगर मध्ये थोडासे कढी चांवल खाऊम आम्ही दर्शन रांगेत लागलो.मोबाईल व इतर वस्तू लॉकर मध्ये जमा केल्यानंतर परत एकदा आमची कडक तपासणी झाली. २५० च्या वर असणाऱ्या पायऱ्या चढताना प्रत्येक १० पायऱ्यानंतर थांबावे लागत होते. प्रत्यक्ष गुहेत प्रवेश केला आणि माझ्या सह अनेकांना आज देखील पांढऱ्या कबुतराची जोडी दिसल्यामुळे खुप समाधान वाटले. बरफानी बाबा चे दर्शन घेतले सर्व थकवा क्षणात दूर झाला. प्रत्येक भाविकाला साधारणतः अर्धा एक मिनिट पवित्र शिवलिंगापुढे थांबू देतात. मी दर्शन घेत असतांना एक तरुण जोर जोरात रडू लागला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून समजावू लागलो. तेवढ्यात ड्युटी वरील एक मिल्ट्रीवाला आला आणि त्याने विचारले हा तुमचा भाऊ आहे का? मी होकारार्थी मान डोलावली. आम्हा दोघांना त्यांनी शिवलिंगापुढे उभे राहू दिले. तो तरुण आनंदाने रडत होता आणि मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून ओम नमः शिवाय चा जप करत होतो. तब्बल दहा मिनिटे प्रत्यक्ष शिवलिंगा पुढे कधी नाही ते थांबायला मिळाले हा माझ्या अमरनाथच्या २१ व्या वारीचा प्रसादच म्हणावा लागेल.
(क्रमशः)