गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते आहेत. पहिला मार्ग सोनमर्ग – बालताल- अमरनाथ च्या बाजूने आहे. हा खडतर रस्ता फक्त १४ किमी चा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात.दुसरा मार्ग पहेलगाम – चंदनवाडी- पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग ४५ किमीचा असून सोपा आहे. परंतु हिमालयाचे विलोभनीय दर्शन या मार्गात होते म्हणून अनेक जण हा मार्ग निवडतात.मी मात्र दरवर्षी माझ्या यात्रेकरूंना बालताल मार्गाने अमरनाथ दर्शनास नेत असतो. हा मार्ग खडतर असला तरी सर्व काही सुरळीत असल्यास आणि निसर्गाने साथ दिल्यास 14 तासात माणूस परत बालताल बेस कॅम्पवर परत येऊ शकतो. म्हणजे सकाळी पाच वाजता अमरनाथ दर्शनासाठी निघालेली व्यक्ती सायंकाळी सात वाजेपर्यंत बालटाल बेस कॅम्पर परत आलेली असते. त्या दिवशी रात्री बेस कॅम्पवर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परत श्रीनगरला येऊन पर्यटकांना इतर पर्यटन स्थळे दाखवणे माझ्यासारख्या टूर आयोजकाला सोपे जाते.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीप्रमाणे यावर्षी पहिल्या टप्प्यात माझ्यासोबत जे ७१ प्रवासी अमरनाथ यात्रेस आले त्या प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत. या सर्व यात्रेकरूंशी इतक्या वर्षाच्या पर्यटनाच्या अनुभवामुळे सहज जळून घेणे मला आता सोपे जाऊ लागले आहे. पर्यटकांच्या सर्वसाधारण तक्रारी,त्यांच्या मागण्या ह्याचा अंदाज समोरची व्यक्ती बोलायला लागली की लगेच येतो आणि त्याला न दुखावता पण स्पष्टपणे कसे सांगायचे हे देखील जमायला लागले आहे. असे असले तरी पर्यटकांना स्थळदर्शनास नेताना अडचणींचा सामना हा करावा लागतोच. केव्हा कुठे आणि कशी अडचण उभी राहील हे सांगता येत नाही.
जम्मू-काश्मीर राज्यातील हा भाग अतिरेकी कारवायांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया ९० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर होत्या.त्यावेळेस ही यात्रा जवळपास स्थगित झाली होती. परंतु भारतीय सरकार व लष्कराच्या मदतीने ही यात्रा पुन्हा सुरू करण्यास यश आले आहे. दरवर्षी येथे भेट देणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी अतिरेक्यांच्या हिंसाचारात काही भाविक मारले जात असत परंतु तरीही मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.
अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचे भरपूर वेळ दर्शन झाल्यामुळे मन प्रसन्न झाले होते. थकवा कुठल्या कुठे निघून गेला. खाली उतरलो. माहिती कक्षातून अनाउन्समेंट केली की, ” माझे दर्शन झाले असून मी बालटाल कडे परत जात आहे. ज्यांचे ज्यांचे दर्शन झाले असतील त्यांनी इतरांची वाट न पाहता बालटाल कडे परत जावे.” गुहे पासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या घोड्याच्या स्टॅन्ड कडे पायी चालत आलो. सगळे घोडे वाले सारखेच दिसत होते. त्यामुळे थोडासा बुचकाळ्यात पडलो. पण माझ्या घोड्यावाल्याने मला अचूक ओळखले. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही चार जण परत जाण्यास निघालो. माझ्यासोबत चार बॅनर होते. त्यावर मजकूर लिहिलेला होता की, भारतीय जनता पक्षातर्फे अमरनाथ यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत. मोदीजींचा, खा. चिखलीकरांचा व माझा फोटो तसेच नाव छापलेले होते. घोडेवाल्याच्या मदतीने मी रस्त्यात योग्य ठिकाणी बॅनर बांधले.
आमच्या सर्व यात्रेकरूंनी २१ वी अमरनाथ यात्रा, नांदेड असे नाव छापलेले टी शर्ट व कॅप घातली असल्यामुळे इतर यात्रेकरूंना नांदेडचे खूप यात्री आले असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात आम्ही फक्त ७१ जणच होतो. खाली उतरत असताना धूळ फार मोठ्या प्रमाणात उडत होती. त्यामुळे मास्क लावणे आवश्यक होते. दोन ठिकाणी विश्रांती घेऊन बालटाल बेस कॅम्प ला सायंकाळी ६ वाजता पोहोचलो. किती यात्री टेन्ट मध्ये परत आले याची चौकशी केली.२२ जण आले होते. मसाज वाल्याला बोलवून मस्तपैकी मालीश केली आणि गरम पाण्याने मनसोक्त आंघोळ केल्यामुळे थकवा दूर झाला. यावर्षीच्या प्रवासातील अत्यंत समाधान देणारी बाब म्हणजे यावर्षी आमच्यापैकी एकालाही कुठलीच शारीरिक व वैद्यकीय अडचण न उद्भवता खूप छानपणे बाबा अमरनाथचे दर्शन झाले. निसर्गाने देखील छान साथ दिली. आकाश निरभ्र असल्याने आणि वातावरणात हलकासा गारवा असल्यामुळे यात्रेकरूंना कुठलाच त्रास झाला नाही.
माझ्यासोबत आलेल्या सहप्रवाशांपैकी छत्रपती संभाजीनगर येथील यांत्रिकी अभियंता असणारे व्यवसायिक विशाल राठी व त्यांच्या पत्नी सौ रेखा राठी या दाम्पत्याने अमरनाथ गुफेपर्यंतचा येण्या जाण्याचा प्रवास हा पायी केला. यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. हे दोघेही विद्यापीठ पातळीवरील ऍथलेट्स असून २१ किलोमीटरच्या मॅरेथॉन शर्यती मधील विजेते आहेत.याशिवाय विशाल मंत्री आणि ब्रिजकिशोर दरक हे जाताना पायी व येताना घोड्यावर आले.बाबा अमरनाथच्या दर्शनास गेलेल्या आमच्या ग्रुप पैकी शेवटचा यात्रेकरू रात्री साडेआठ वाजता बालताल बेस कॅम्पवर परतला. झालेल्या परिश्रमाने सर्वच जण एवढे थकले होते की हात पाय धुवून थोडेफार खाऊन सर्वजण निद्रादेवीच्या अधीन झाले.
(क्रमश:)