आमच्या सोबत असलेल्या शशिकांत कुलकर्णी,अरुण लाठकर,दिगांबर शेंदूरवाडकर, श्याम रावके,मिना कुलकर्णी यांच्या तर्फे काल रात्री सर्वांना जेवण दिले होते . परंतु प्रत्येक हाऊस बोट ला जेवण वाटप करत असताना बराच उशीर झाला होता, त्यामुळे आजचे डिनर हे बाहेरच घ्यावे असे ठरले.हाऊस बोट मधील मुक्काम अतिशय आरामदायी झाला असल्यामुळे सर्वजण प्रसन्न वाटत होते. दिवसामोठ्या बसेसना डललेक परिसरात प्रवेश बंदी असल्यामुळे सकाळी सहाला आमच्या दोन्ही बसेस शिकारा स्टॅन्ड क्रमांक ७ समोर येऊन थांबल्या होत्या. आपापल्या हाऊस बोट वरून शिकाराने आम्ही स्टॅन्ड जवळ पोंहचलो.शिकारा ही छोटी नाव मी चालवत असल्याचे पाहून सर्वांनी कौतुकाने फोटो व व्हिडिओ शूटिंग केले. गेली अनेक वर्ष डललेक ला आलेलो असल्यामुळे मी चप्पू चालवायला शिकलो.गुलमर्ग ला जाण्यासाठी साडे सहाला आमचा बसप्रवास सुरु झाला. श्रीनगर सोडल्यानंतर एका धाब्यावर मुकेशसिंह तौर या सहप्रवाश्याकडून सर्वांना गरमागरम आलू पराठे चा नाश्ता मिळाला. ज्यांना संकष्टी चतुर्थी होती त्यांच्यासाठी केळी व चिप्स ची व्यवस्था करण्यात आली.
तसे पाहिले तर संपूर्ण कश्मीरच अतिशय सुंदर आहे.पण त्यामध्येही सर्वात देखणे ठिकाण कोणते असेल तर ते गुलमर्ग. श्रीनगरपासून ५० कि मी वर काश्मिरी च्या बारामुल्ला जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून २७३० मीटर उंचीवर हिमाच्छादित पर्वत शिखरावर वसलेलं छोटंसं गाव.गुलमर्गच प्राचीन नाव गौरी मार्ग असं होतं.१६व्या शतकात युसुफ शहा चक ने बदलून गुलमर्ग ठेवलं.गुल म्हणजे फुल, आणि मर्ग म्हणजे भूमी. फुलाची भूमी हे नाव का ठेवले असेल याची प्रचिती तिथे गेल्या बरोबर येते.येथील सौंदर्यामुळे गुलमर्ग ला पृथ्वीवरील स्वर्ग असेही म्हणतात.सुरूवातीला सपाट मैदानी भागातून व शेवटी १० -१२ कि मी डोंगर चढनीचा रस्ता आहे.पायथ्या शी ५०० लोक संख्येच टन्गमर्ग हे गाव आहे. या परीसरातील बहुतेक लोकांचे व्यवसाय हे पर्यटन आधारित आहेत.पर्वत माथ्यावरील गुलमर्ग ला जाताना निसर्ग सौंदर्य पाहताना मन तृप्त होत होते.रस्त्याच्या दुतर्फा डोंगरावर छोट्या छोट्या फुलांची उधळण झाली होती. गुलमर्ग गाव हे जितके सुंदर आहे तितकेच इथले घोडेवाले आणि गाडीवाले खराब आहेत. त्यामुळे बसमध्ये आधीच सर्वांना हुशार करून ठेवले. छोटे छोटे ग्रुप करून घोडे अथवा जीप ठरवा असा सल्ला दिला. गुलमर्गला कोणीही ग्रुप लीडर झाला की त्याच्या मागे हे घोडेवाले असे लागतात की विचारू नका. बस मधून उतरल्यावर दिलेल्या सूचना प्रमाणे सर्वांनी घोडे /जीप ठरविले.
सर्वाना ” गंडोला “रोप- वे,केबल-कार राईडचं आकर्षक होतं.हा आशियातील सर्वोच्च केबल कार प्रकल्प आहे आणि जगातील सर्वात मोठा आणि दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे. गंडोलाच्या एका कार मध्ये सहा लोकांना जाता येते. ताशी ६०० लोकांना घेऊन जाऊ शकतो.हा केबल कारचा प्रकल्प जम्मू आणि काश्मीर सरकार आणि फ्रेंच फर्म पोमागाल्स्की यांचा संयुक्त उपक्रम आहे.गुलमर्ग रिसार्ट ते काँगडोरी स्टेशन २६०० मीटर पहिला टप्पा व काँगडोरी स्टेशन ते काँगडोरी शिखर दुसरा टप्पा ३७४७ मीटरचा आहे. वेळेअभावी पहीला टप्पा राईडचा आनंद घ्यायच्या सूचना सर्वांना दिल्या. पूर्वी गंडोल्याची तिकिटे इथेच मिळायची. परंतु आता सर्व काही ऑनलाईन झाले आहे.याची कल्पना नसल्याने रु ७४० ची तिकिटे १००० रु ला ब्लॅक मध्ये घ्यावी लागली. ४५ जणांनी गंडोला राईटचा आनंद लुटला. वर गेल्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या हिमाच्छादित मैदानावर स्किईंग चा आनंद घेतला. स्किईंग सेट चे मालक ठराविक मोबदला घेऊन आपल्याला थोडंसं स्किईंग शिकवितात.उतारावरून थोडंसं स्किईंग जमतं पण निसरड्या बर्फावर बरेच जण पडतातही. पण भुसभुशीत बर्फात मार लागतं नाही. खरंतर हा मामला फक्त फोटो काढाण्यापुरता असतो.मग ते ट्रेनरच आपले फोटो व्हिडिओ काढून देतात. आजूबाजूला अनेक जण बर्फावरील घसरगाडी स्लेज घेऊन थांबलेले होते. या घसरगाडी चालविण्याऱ्याच्या मागे बसून बर्फावरून खाली येताना खूप मजा आली.
रोटी या चित्रपटातील राजेश खन्ना व मुमताज या जोडीचे “जय जय शिवशंकर, काटा ना लगे कंकर” या प्रसिद्ध गीताचे ज्या ठिकाणी चित्रीकरण झाले होते. त्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले.हे मंदिर काश्मीर चे शेवटचे राजे हरीसिंग यांची राणी मोहिनीबाई सिसोदिया यांनी बांधून घेतले म्हणून याला महाराणीमंदिर असेही म्हणतात.हे मंदिर शिव आणि पार्वतीला समर्पित आहे. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे.ज्यामध्ये भरपूर हिरवळ आहे. गुलमर्गच्या कानाकोपऱ्यातून हे मंदिर दिसते.
गुलमर्गचे बर्फाच्छादित दृश्य
स्कीइंगची आवड असणाऱ्यांसाठी गुलमर्गची गणना देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम स्कीइंग रिसॉर्ट्समध्ये केली जाते. डिसेंबरमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक स्कीइंगसाठी येतात. येथे स्किइंग करण्यास सक्षम होण्यासाठी उतारांवर स्कीइंग करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्यांनी नुकतेच स्कीइंग शिकायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठीही हे योग्य ठिकाण आहे. सर्व स्कीइंग सुविधा आणि चांगले प्रशिक्षक देखील येथे उपलब्ध आहेत.
गुलमर्ग गोल्फ कोर्स हा जगातील सर्वात मोठा आणि हिरवा गोल्फ कोर्स आहे. इंग्रज इथे सुट्टी घालवण्यासाठी येत असत. त्यांनीच १९०४ मध्ये गोल्फप्रेमींसाठी या गोल्फ कोर्सेसची स्थापना केली. सध्या त्याची देखभाल जम्मू आणि काश्मीर पर्यटन विकास प्राधिकरण करत आहे.
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला महाराजा हरि सिंह यांनी ८७०० चौरस फुटांचा बांधलेला महाल आम्ही पाहिला.
खिलनमर्ग ही गुलमर्गच्या मध्यभागी वसलेली एक सुंदर दरी आहे. येथील हिरव्यागार शेतात रानफुलांचे सौंदर्य नजरेसमोर निर्माण होते. खिलनमर्ग येथून बर्फाच्छादित हिमालय आणि काश्मीर खोऱ्याचे अप्रतिम दृश्य पाहता येते.देवदार आणि चिनार च्या झाडांनी वेढलेला अलपथर तलाव आफरवत शिखराच्या खाली आहे. या सुंदर तलावाचे पाणी जूनच्या मध्यापर्यंत गोठलेले असते.
गुलमर्गपासून आठ किमी अंतरावर असलेला निंगली नाला हा अफरत शिखरावरील बर्फ वितळल्याने आणि अल्पथर तलावाच्या पाण्याने तयार झालेला प्रवाह आहे. हा पांढरा प्रवाह दरीत येऊन शेवटी झेलम नदीला जाऊन मिळतो. दरीच्या बाजूने वाहणारा हा प्रवाह गुलमर्गमधील एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे.
गुलमर्ग दर्शनासाठी दुपारी चार पर्यंतचा वेळ दिला होता. काही यात्रेकरुंचे स्थळ दर्शन आणखी चालू असल्यामुळे जे आले नाहीत त्यांना फोन केला. संध्याकाळी पाच नंतर वाहने सोडण्यात येणार नाही असा पोलीस व्हॅन मधून इशारा देण्यात आले असल्यामुळे सर्वांची घालमेल होत होती.सर्वजण आल्यावर सव्वा पाच ला आम्ही गुलमर्ग सोडले. नांदेड येथील प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंदनजी शर्मा हे गेल्या वर्षी आमच्या सोबत अमरनाथ यात्रेला आले होते. त्यांनी दरवर्षी एक जेवण देण्याचे सांगितले होते. त्यानुसार डल लेक समोरील एका पंजाबी ढाब्यावर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. शिकाऱ्याने हाऊस बोट मध्ये जाऊन पुन्हा एकदा राजेशाही मुक्काम केला.
(क्रमश:)