‘प्रेम नसावे फसवे खोटे
रंगीत- रंगीत दिवे मोठे
खोटी -खोटी लाडीगोडी
अन् हृदयावर दणादण सोटे…
-एम,पी,एस ,सी उत्तीर्ण असणाऱ्या दर्शना पवार हिचा खून 18 जून रोजी झाला, आणि रायगडाच्या पायथ्याशी तिचा मृतदेह सापडला, याचे मुख्य कारण होते. दर्शनाने विवाहास नकार दिला. यावर हा आधारित लेख आहे.
मुला मुलींनी एकमेकाविषयी आकर्षण वाटणं, प्रेम वाटणं ही नैसर्गिक भावना आहे. पण स्वतःवर ताबा ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. केवळ या भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही. फॅशन म्हणून कपडे घालण्यापेक्षा आपल्याला शोभतील अशी वेशभूषा करावी. दूरदर्शन ,संगणक, मोबाईल, शाळा कॉलेज, अभ्यास, परीक्षा आणि मित्र-मैत्रिणी यात दिवस, महिने ,अनेक वर्ष भराभर निघून जातात.
आपण किती मोठे झालो हे लक्षात येत नाही *दिवस तुझे हे फुलायचे* ……
खरोखरच आपण म्हणतो. झोपाळ्या वाचून झुलायचे! दिवस तुझे हे फुलायचे! शिक्षणाने मुली प्रगल्भ होतात, ध्येय साध्य करण्याचा मार्ग शोधतील खऱ्या अर्थाने जीवन स्त्री पुरुष समानतेच्या मार्गावर त्या पोहोचतील त्या सर्वांचे मूळ आहे शिक्षण. शिक्षण म्हणजे पुस्तक वाचन करणे. परीक्षा देणे. चांगले गुण मिळवणे, आणि चांगली नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारणे ,एवढा संकुचित अर्थ शिक्षणाचा घेऊ नये. प्रत्येक क्षण शिक्षणाचा आहे. मुलीच्या अंगी आत्मविश्वास असणे, तिने सावध असणे तिला सुरक्षित आधार असणे, तिला शिक्षण मिळणे ,उत्तम संधी मिळणे ती स्वावलंबी असणे आणि माणुसकीचा प्रत्यय तिच्यासोबत असणे हे अतिशय गरजेचे आहे,
आज महिला सुशिक्षित झाल्या, खरोखरच त्या हुशार झाल्या काय? त्यांना समाजाची रीती, रिवाज, परंपरा कळाल्या काय? आपले- दुसरे, चांगले- वाईट याचे ज्ञान मिळाले काय ? मुली या भावनिक असतात त्या ताबडतोब कोणासोबतही मैत्री करतात. आणि त्याचे दुष्परिणाम स्वतःला भोगावे लागतात, आणि काही काळातच समाजासमोर येतात
,त्यामुळे पालकांना त्याचा फार त्रास होतो, मुलींना तिच्या शरीरचनेविषयी पौगंडावस्था याविषयी शास्त्रीय ज्ञान देण्याचे काम आई- वडील करतात. बहिण, शिक्षिका व उत्तम पुस्तके करू शकतात या नाजूक वयात न कळत काही चूक घडू नये म्हणून लैंगिक ज्ञान,गर्भधारणा याबाबत माहिती असणे आवश्यक असते या दृष्टीने कोणत्या मर्यादेचे पालन करावे; कोणती काळजी घ्यावी; मुलांशी मैत्री कितपत ठेवावी या सर्वांचे ज्ञान तिला असणे गरजेचे आहे. दिवस तुझे हे फुलायचे…..! खरोखरच आई-वडिलांच्या आशा- आकांक्षा अपेक्षा मुलींकडून भरपूर असतात. पालकांनी घातलेली काही बंधने मर्यादा याचा राग न धरता मुलींनी त्यामागची कारणे लक्षात घ्यावी आणि त्या मर्यादेचे उल्लंघन करू नये, प्रेम वाईट गोष्ट नाही,प्रेमाशिवाय जीवन नाही पण *वासना व प्रेम यातील फरक कळणं अतिशय महत्त्वाचे आहे* पुढील आयुष्य जुळून येणे आणि योग्य वेळेवर ते घडणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, दररोज वर्तमानपत्र उघडल्यानंतर बलात्कार, छेडछाड, एकतर्फी प्रेम हातात कोयता घेऊन मुलींच्या मागे पळणे त्यांच्या त्या किंकाळ्या ऐकणे समाजाला आता हे नवीन राहिलं नाही, कुठेही, कधीही काहीही घटना घडत आहेत आणि फुलणाऱ्या कळ्या उमलणाऱ्या कळ्या तोडून फेकून दिल्या जात आहेत, त्यासाठी वयात येणाऱ्या मुली हळूहळू स्त्री होतात आणि हीच स्त्री उद्या मोठ्या पदावर बसते, मुले- मुली समानतेचे युग आहे म्हणून आज फिरत आहेत आणि याच्यातूनच धोक्याचे वळण गाठत आहेत.
दर्शना पवार या मुलीने आकाशात झेपावण्यासाठी भरारी मारली आणि त्यात ती खरोखर यशस्वी झाली
,शैक्षणिक गुणवत्ता तिच्याकडे होती ती कधीही पाठीमागे आली नाही, आई-वडिलांना अतिशय आनंद झाला परंतु विवाहासाठी नकार ही गोष्ट तिचा जीव घेऊन गेली यावरच ही घटना संपत नाही, मानव हा किती क्रुरूर आहे यांचे हे ज्वलंत उदाहरण आहे. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर तो काय करू शकतो? हे आपल्याला कळून आलेले आहे. तुझ्याशिवाय मी क्षणभर सुद्धा जीवन जगू शकत नाही. तुला सूर्य- तारे आणून देतो असे म्हणणारे महाभाग सुद्धा थोडं वितृष्ट आल की मुलींचे तुकडे तुकडे करत आहेत. दररोज कुठे ना कुठे महिलांवर हल्ले होतात तरी समाज सुधारला नाही,खून करणारे दरोडे घालणारे बलात्कार करणारे यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, म्हणून दोन दिवस मोर्चे काढले जातात, निवेदन दिले जातात,शोध सुरू आहे असे सांगतात, त्यावर काही काळ लोटला जातो, उलट सुलट सवाल- जवाब घेतली जातात आणि ती घटना मागे पडते अशा पद्धतीने त्या घटनेचे महत्त्व कमी होऊन जाते ,आपल्या येथे कायद्याची कडक अंमलबजावणी होत नाही, पोलिस ठाण्यात सोम्या गोम्याचे फोन जातात आणि आरोपी मुक्त वाता वरणात सोडून दिले जातात. त्यामुळे कायद्याचे भय आज कमी झालेले आहे असे मला वाटते. म्हणून मुलींनी आपापल्या पद्धतीने सावध राहावं
आपली संस्कृती जोपासावी, आई-वडिलांची मान खाली जाणार नाही याचीही दक्षता घ्यावी,जर दर्शना पवार त्यांच्यासोबत फिरण्यास गेली नसती तर वेगळा इतिहास घडला असता,परंतु इतिहासामध्ये जर तरला काही महत्त्व नसते म्हणून तमाम तरुण मुला-मुलींना मी सांगू इच्छितो की, आपण सर्वांनी आपली संस्कृती आणि परिवार या गोष्टी सांभाळून आपलं जीवन आनंददायी कसं बनेल याकडे लक्ष द्यावे, मुलाने स्वतःची पात्रता बघावी , खरोखर आपण या मुलीच्या लायक आहोत काय? एकतर्फी प्रेमामधून वाईट कृत्य करू नये तरच उद्याची पिढी संस्कारक्षम होईल आणि आपला देश खरोखर महान आहे असे आपल्याला सांगता येईल,तुमच्यावर प्रेम आहे असे तुम्हाला सांगणारा प्रेमवीर भेटल्यास भावनेच्या भरात लगेच उतावीळपणे त्याच्या प्रेमाचा स्वीकार करू नका, प्रेमाची परिणीती विवाह बंधनात व्हावी ही आपली संस्कृती आहे पण दोन-चार वर्षे प्रेमाच्या गुलाबी छटा रंगवून नंतर टाईमपास म्हणून प्रेमाचा स्वीकार होऊ नये ,प्रेमात भोळसरपणा नको, विवेक हवा, आधुनिकतेच्या नावाखाली प्रेमाला बदनाम करू नका. फक्त बाह्य सौंदर्याकडे आकर्षित होऊन होकार देऊ नका. प्रेमातले धोके वास्तव व योग्य वेळ या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या घटना आहेत. प्रेम व विवाह यासाठी विचार करायला परिपक्व व्हावं लागतं अशी खूणगाठ मनाशी बांधा. जात, धर्म, गरिबी, श्रीमंती या गोष्टी नंतर अडसर ठरतात त्याचा विचार करा. एकमेकासाठी त्या करणं म्हणजे प्रेम करणं होय . मुलगी म्हणून तू जन्माला आलीस तू सृजनशक्ती आहेस कर्तुत्व शालिनी आहेस, तुझ्यातल्या सुप्त गुणाच्या पाकळ्या उमलणार आहेत,भारतातील अनेक स्त्रियांचा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर आहे त्याची प्रेरणा तुला नित्य दीपस्तंभ बनून सोबत करत राहील’
सावध हरीणी सावध गं..
करील कोणीतरी पारध गं..
वाटेवरती काचा गं…
मासोळी साठी जाळे गं…
लपून कोणीतरी हेरतय सावज गं..
म्हणून माझ्या हरीणी, तू रहा सावध गं….!
मुलीवर कधी कोणत्या वेळी संकट कोसळेल याचा कधीच नेम नसतो. अशा प्रसंगी आपण सावध राहिले पाहिजे. संगणक आणि इंटरनेटच्या जगात वारंवार सायबर गुन्हे घडताना दिसतात. बदनामीकारक प्रोफाइल एटीएम क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारे गुन्हे यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे,अशा धोक्यापासून बचाव करण्यासाठी मुलींनी काही खबरदारी घेणे आणि आपलं जीवन सुखकारक जगणे अत्यंत आवश्यक आहे,
*शब्दांकन*
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत संस्थापक अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी.
ता. मुखेड जि. नांदेड