भारतीय संस्कृतीमध्ये गंगा नदीला अतिशय मानाचे स्थान दिलं गेलं आहे.
अनेक राजांनी राज्याभिषेकाच्या वेळी नद्यांचे पवित्र पाणी आणून राज्याभिषेक केलेला आहे. असे आपण अनेक उदाहरणं पाहिलेले आहोत. नदी ही डोंगरावर पाऊस आल्यानंतर वाहत जाते , तेव्हा ती स्वच्छ असते. नदीच्या पाण्यामुळे अनेक जणांना फायदा होतो. नदीच्या काठी असणारे लोक नदीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी करून घेतात आणि आपलं जीवन जगतात, नदी सर्वांना सुखी करते. परंतु *आज सर्व नद्यांची स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. त्यामुळे त्यावर काही उपाययोजना करण्यासाठी हा लेख*
नदी ही वाकडी- तिकडी असली तरीही तिचं पाणी गोडच असते. परंतु अलीकडच्या काळामध्ये नदीला माणसांनी का छळले याची सविस्तर माहिती आपण करून घेणार आहोत. नदीला कोणी देवता, माता म्हटले आहे, तिची भरपूर तोंड भरून स्तुती केली. आणि दुसऱ्या बाजूला नदीत घाण आणून टाकली त्यामुळे नदी जिकडे -तिकडे प्रदूषित झाली. त्यामुळे नदीचे पाणी प्राण्यांना, माणसांना त्रासदायक होऊ लागले.खरोखर एकीकडे भारतात नद्या- जोड प्रकल्प चालू आहे. आपल्याला पाणी एका नदीतून दुसऱ्या नदीमध्ये नेऊन मानवाला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे .तर दुसरीकडे केर- कचरा मलमूत्र सोडून नद्या प्रदूषित करीत आहेत. अनेक कारखान्यांचे पाणी पवित्र नद्यांमध्ये सोडून अक्षरशः जीवजंतू नदीतील मारले जात आहेत. सजीव परिस्थितीकी जगली पाहिजे, नाहीतर असमतोल होतो असे पर्यावरण सांगते. पर्यावरणाचे असंतुलन होऊ नये त्यासाठी नद्या स्वच्छ ठेवाव्या लागतात. नदी प्रदूषित करून चालत नाही. आज नदीकाठी लोक घाण करतात. प्रेत जाळली जातात.गुरेढोरे धुतली जातात. कपडे गाड्या धुतल्या जातात या सर्वामुळे नदी जास्तीत जास्त प्रदूषित होते. अनेक पवित्र शहरे नदीच्या काठावर वसलेली आहेत, देहू, आळंदी, आयोध्या, नांदेड ,पंढरपूर पैठण, नाशिक ही शहरे नद्यांच्या पवित्र ठिकाणी वसलेले आहेत, त्यामुळे इथे येणारा भाविक वर्ग सगळा नदीपात्रा मध्ये जाऊन आंघोळ करतो. कपडे धुतो त्यामुळे नद्या अस्वच्छ होतात. त्यासाठीच अनेक उपाय काढले जात आहेत.तरीही लोक गावातील घाण पाणी केरकचरा सगळा नदीकडे आणून टाकतात. तुंबलेले गटारे सर्वत्र दुर्गंधी पसरवतात,या सगळ्यांचा फटका नदी प्रदूषित होऊन जाते. अलीकडच्या काळात तर नदीच्या पात्रात काही ठिकाणी स्मशान भूमी बांधलेले आहेत. त्यामुळे आणखी भर पडून नदी प्रदूषित होते. तसेच नदीच्या काठावर कित्येक लोकांनी अतिक्रमण करताना दिसतात. इथे नदी होती काय? असे म्हणायची वेळ येते? अशा काही नद्यांवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे; तिथे कोणाचेही लक्ष नाही ज्यावेळेस नद्यांना महापूर येतो, त्यावेळेला कळते अचानक 26 जुलै 2005 ला मुंबई येथे मिठी नदीला महापूर आला,आणि हाहाकार मांडला आणि महापुराचे पाणी घराघरात घुसले ,रस्ते बंद झाले, वाहतूक ठप्प झाली,इमारती कोसळल्या अनेक माणसे गाई गुरांना जलसमाधी मिळाली याचे सगळे कारण म्हणजे पाण्याचा निचरा न झाल्याने हे संकट उडवले हे आपणाला विसरून चालणार नाही ,सद्या नद्यांवर अनेक जणांनी टोलेजंग बंगले उभे केले, त्यामुळे नदीचा प्रवाह बदलला आणि नुकसान झाले.लोकांनी नदीला छळले ?माणसांनी नदीचा प्रवाह बदलला, पंचगंगेच्या काठी असणारे कोल्हापूर,सांगली सातारा, महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे पात्र फार मोठे आहे, या नदीला महापूर आल्या नंतर पाणी संपूर्ण शहरांमध्ये उसळ्या मारत घुसते आणि अनेकांचा जीव घेऊन जाते,त्यामुळे हे मानवा आता तरी सुधारणा कर, नद्यांवर आक्रमण करू नकोस, नद्या निर्मळ राहतील, तरच समाज निरोगी व रोगमुक्त राहील ,नाहीतर पुढील पिढ्यांचे आरोग्य व जीवन दोन्हीही धोक्यात येईल. वरील संकटाचा सामना करण्यासाठी जल साक्षरतेची अत्यंत आवश्यकता आहे असे मला वाटते. म्हणूनच इयत्ता नववी -दहावीला आता जलसुरक्षेविषयी अभ्यासक्रम पुस्तकांमध्ये दिलेला आहे.त्यामुळे काही प्रमाणात सुधारणा होतील तेव्हाच नद्या निर्मळ आणि स्वच्छ राहतील. म्हणून यापुढे आपण नद्या -नाल्यांचे नैसर्गिक रूप बदलणार नाही यांची काळजी घेतली पाहिजे
*शब्दांकन*
*प्रा.विठ्ठल गणपत बरसमवाड*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मखेड जि. नांदेड