पैंजणाचा नाद आणि बासरीची साथ..
कालच्या लेखात मढे घाटात ते कपल पाहिलं त्यावेळी मला कोणाची तरी आठवण आली असं मी लिहीलं होतं , त्यावर अनेक वाचकांना उत्सुकता होती ,मॅम कोण आहे ??..वाचकमित्रांनो,
तुम्ही कल्पनाही करु शकत नाही इतकं मी त्याच्यावर प्रेम करते.. त्याच्या बासरीवर ,त्याच्या लिलांवर आणि त्याच्या रोमॅन्टिक अदांवर..
माझ्या पायातील पैंजणातील एक घुंगरू जमीनीवर पडावा आणि त्यातुन बासरीतील एक स्वर अलगद ओठावर यावा इतकं नाजूक प्रेम मी त्याच्यावर करते.. चकवा लागलेला असताना ज्याने घाटातुन आम्हाला सुरक्षित घरी आणलं तो दुसरा तिसरा कोणी असूच शकत नाही.. घाटातील ३० फुट उंचीवरुन पडणारा धबधबा झाकोळून टाकण्याची ताकद जेव्हा त्या ढगात येते आणि त्याचक्ष्णी मी त्याच्या मिठीत जाते आणि तो सुखद सोहळा कोणीच पाहु शकत नाही हे फक्त तोच करु शकतो..
पाणी पिताना एखादा पाण्याचा थेंब उरोजावरुन बेंबीपर्यत जातो त्याचक्षणी त्या थेंवाचा मोती होवुन बेंबीपाशी अडकतो आणि तो मोतीही लाजुन गुलाबी होतो इतकं सुंदर प्रेम फक्त आणि फक्त तोच करु शकतो.. बासरीतुन निघणाऱ्या प्रत्येक स्वरागणिक माझ्या हृदयातील स्पंदनं कागदावर थिरकायला लागतात आणि मोत्यासारखे शब्द तुमच्यापर्यंत पोचतात इतकी येणारी लेखणीतील ताकद फक्त तोच देवु शकतो ना… वीर्य , योनी , विवाहबाह्य संबंध , घटकंचुकी , ओरगॅझम , ॲनल सेक्स अशा तुम्ही नाव न घेणाऱ्या शब्दांवर माझ्याकडून जो लिहुन घेतो तो सर्वसामान्य व्यक्ती कसा असु शकेल ??..
माझ्या आत उतरुन किवा आत बसुन त्याची बासरी जेव्हा शब्द आणि आत्मविश्वास बाहेर फेकते तेव्हा माझा वाचक ट्रोलही करतो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या लिखाणाची वाटही पहातो ही ताकद फक्त तोच देवु शकतो..
मी अशी कोणावरही का प्रेम करेन ??.. ज्याच्या हातात सगळ्या जगाची दोरी त्याच्यावर प्रेम करण्यात खरं थ्रील आहे .. बरोबर ना ??. लहानपणापासूनच कृष्ण भक्त आणि तोच सखा आणि जेव्हापासून भगवद्गीता चाळायला लागले तेव्हा त्याच्या प्रेमात अजुन रुतत गेले… शरीरावर प्रेम कोणीही करेल पण जो मन जाणतो तोच प्रियकर …
पहा असं प्रेम करुन..
सोनल गोडबोले