घरांच्या पडझडीची मदत वाढवा;टपरीधारकांनाही विशेष मदत द्या -अशोकराव चव्हाण यांची विधानसभेत मागणी

 

नांदेड, दि. २१ जुलै २०२३:

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नांदेड जिल्ह्यात शेती, घरे व टपरीधारकांसारख्या लहान व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्य सरकारने त्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

शुक्रवारी दुपारी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीकडे त्यांनी विधानसभेत बोलताना सरकारचे लक्ष वेधले. याप्रसंगी ते म्हणाले की, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्री अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्याच्या देगलूर, बिलोली, मुखेड आणि अन्य तालुक्यांमध्ये सुद्धा प्रचंड पाऊस झालेला आहे.गावात पाणी शिरले आहे. शेती उद्ध्वस्त झाली आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील वाहतूक खंडीत झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांकडून मी सद्यस्थितीची माहिती घेतली आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघातील परिस्थिती गंभीर असल्याने आ. जितेश अंतापूरकर देखील सातत्याने त्यावर लक्ष ठेवून आहेत. शेतीच्या नुकसानाला एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदत होईल. मात्र, घरांच्या पडझडीसाठी मिळणारी पाच हजार रुपयांची तुटपुंजी असून, त्यामध्ये वाढ करण्यात यावी. त्याचप्रमाणे टपरीधारकांसारख्या लहान व्यावसायिकांना कोणतीही मदत दिली जात नाही. विशेष बाब म्हणून त्यांनाही मदत करावी, अशी मागणी अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *