कै .डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला थाटात सुरुवात

नांदेड : भारताचे माजी गृहमंत्री कै. डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत नांदेड शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या विद्यमाने ऑनएक्स सनराइज महाराष्ट्र पहिली सीनियर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरू करण्यात आली . या स्पर्धेचे माजी पालकमंत्री डी पी सावंत, आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे , महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव तथा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते श्रीकांत वाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटकीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री डी पी सावंत यांनी भूषविले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांनी गेल्या 19 वर्षापासून आयोजित करणारी ही स्पर्धा महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रामध्ये मोठी भर घालणारी आहे. आजच्या धक्कादुकीच्या जीवनात खेळ हा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने प्रत्येकाने खेळाकडे लक्ष दिले पाहिजे. क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी त्याला पाठबळ दिले पाहिजे . या अनुषंगाने नांदेड येथे सकारात्मक वातावरण आहे. या बाबीचा फायदा निश्चितपणे खेळाडूला होईल. भर पावसातही या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व स्पर्धक आणि आयोजक यांचेही माजी मंत्री डी पी सावंत यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे म्हणाले की, जीवनात खेळ अत्यंत आवश्यक आहे. खेळामुळे फिटनेस चांगले राहते .शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तंदुरुस्ती टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने खेळाकडे वळले पाहिजे .नांदेड येथे खेळासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा फायदा निश्चितपणे खेळाडूंनी घ्यावा. क्रीडा क्षेत्रात नांदेडचे नाव रोशन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर यावेळी बोलताना महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव , जीवनगौरव पुरस्कार प्राप्त तथा दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते श्रीकांत वाड म्हणाले की, डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मागील एकोणावीस वर्षापासून सुरू असलेली ही स्पर्धा महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी गौरवशाली आहे. या स्पर्धेतून अनेक खेळाडू घडले आहेत. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात भरभरून योगदान देणाऱ्या नांदेडच्या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे मनस्वी कौतुक करतानाच या स्पर्धेतून विजेते ठरणाऱ्या संघाला पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी जाते आणि ही बाब या स्पर्धेसाठी अत्यंत गौरवशाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नांदेड येथे होणारे ही स्पर्धा अत्यंत लक्षवेधी ठरते असे गौरवपूर्ण उद्गार वाड यांनी काढले.
यावेळी माजी मंत्री डीपी सावंत यांच्यासह आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्रीकांत वाड ,महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन शहा, प्रदीप गाबडा , महाराष्ट्र कोचिंग सचिव जोयेल चांदेकर , आयोजक तथा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर महेश वाकरडकर , उपाध्यक्ष डॉ. शीला कदम, डॉ . श्याम पाटील तेलंग आदींची उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी 30 जिल्ह्यातून तब्बल 422 स्पर्धकांनी एन्ट्री केली आहे. ही स्पर्धा यशवंत कॉलेज येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि जिल्हा क्रीडा बॅडमिंटन हॉल येथे संपन्न होत आहे. 25 तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी रयत गुप्ता , डी के मोहन, श्रीधर जाधव, शेख अक्रम , अभिजीत कुमार, उमेश डहाळे, अशितोष वाकरडकर , स्वप्निल छिद्रावार, कृष्णा चुडावकर, सचिन भंडारे ,शुभम शिंदे, ऋषी कुमार पांचाळ, ओंकार तांदळे आदी परिश्रम घेत आहेत . या स्पर्धेतील विजेत्या संघाला सव्वा दोन लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे . ही स्पर्धा मुख्य पंच विश्वास देशवांडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आज दिवसभरात 140 सामने पार पडले.

चौकट
शिवछत्रपती जीवनगौरव मिळाल्याबद्दल श्रीकांत वाड यांचा नांदेडमध्ये गौरव
मागील 40 वर्षापासून महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून या क्रीडा प्रकाराला भरीव असे योगदान देत एका विशिष्ट उंचीवर पोहोचण्यासाठी काम करणारे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्रीकांत वाड यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर वाड हे पहिल्यांदाच नांदेड शहरात दाखल झाले . त्यामुळे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने सचिव डॉक्टर महेश वाकरडकर यांनी वाड यांचा सत्कार करून गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *