अगले जनम मोहे बिटीया ना कीजो.. ; मणीपूर

 

खिलौना नहीं मैं कि खेलना चाहें सब,
नरक-सी जिंदगी में धकेलना चाहें सब,
नुचने का गिद्धों से अभिशाप ना दीजो।
कभी काटी जाती हूँ, कभी जाती जलाई,
कभी मारी जाती हूँ, बदन का फंदा लगाई,
दरिंदगी ऐसा घिनौना आलम ना दीजो।।
राक्षस नहीं हैं ये कुछ और ही हैं,
शर्मिंदा इनसे दैत्य असुर घोर भी हैं,
नारी जन्म है मनुज जीवन का अपमान ना दीजो।
ओ बाबुल! मोहे ऐसो वर दीजो।
अगले जनम मोहे बिटिया ना कीजो।

 

वरील ओळी सध्याच्या मणीपूरमध्ये घडलेल्या परिस्थिला अगदि योग्य आहेत.समस्त स्त्रीवर्गाला आपला स्त्रीजन्म खरचं नकोसा वाटू लागला आहे.स्त्रीयांच्या बाबतीत तर वरचेवर कौर्याची परिसीमा ओलांडली जात आहे.तसेही अगदि पुरातन काळापासुनच आपल्या भारत देशात महिलांची विटंबना झाली आहे.अशा या रक्तरंजीत घटनांना इतिहास साक्ष आहे.स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक, प्रतिगामी मानसिकता आहे.आणी ती आजही तग धरुन आहे ही खुप मोठी शोकांतिका आहे.गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.ती आई आहे, ती बहिण आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती सुरुवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.स्त्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कतृत्व सुध्दा.तरी तीच्या देहाचा बाजार मांडला जातोय?एकीकडे “बाई पण भारी देवा” म्हणत तिच खोटनाट कौतुक करायच आणि दुसरीकडे तिच्या देहाचे लचके तोडत तिला आयुष्यातुन पुर्णपणे उठवायचे?हा कुठला न्याय?
मणिपूर हिंसाचाराच्या वेळी एका समूदायाने दोन आदिवासी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर संबंधित महिलांवर जमावासमोर सामूहिक बलात्कारही केला गेला.त्यावेळी त्या असाह्य महीलांच्या मदतीला कुणीही धावून आले नाही,जो काही नंगानाच होतोय तो उघड्या डोळ्यांनी पाहायची समाजाला नाहितरी सवयच झाली आहे म्हणा.विशेषता हे प्रकरण घडत असतांना त्या महिला वेदनेने आक्रोश करत रडत याचना करत होत्या पण जमाव तर सभ्यता आणि सामाजिक नियम यांना धाब्यावर बसवून याचा आनंद घेत होता.जणू काही अवघी मानवताच कलयुगात नग्न झालीय की काय?असा प्रश्न मनात वारंवार डोकावतो.त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.या अमानवीय कृत्याची १४० कोटी देशवासियांना लाज वाटत असली तरी बलात्कार करणा-यांना याच काहिच वाटत नाही हे विशेष. आदिवासी कुकी समुदायाच्या महिलांवर मैतेई समुदायाच्या जमावाकडून हिंसक आणि जीवघेण्या हल्ल्यांची एक मालिकाच सुरु झाली.आणि या संघर्षाच्या काळात हत्यार म्हणून बलात्काराचा उपयोग केला जातोय ही अत्यंत घृणास्पद बाब आहे.घटनात्मक लोकशाहीत असा प्रकार अस्वीकार्य असुनही असे प्रकार घडतात हे खरच,मानवतेला लज्जास्पद आहे.ज्या देशामध्ये महिलेला देवी म्हणून पुजल जात तिथे हा प्रकार घडावा?जात,धर्म,प्रदेश आणि अस्मितेच्या नावाखाली मानवप्राणी वरचेवर पशुसमान होतोय हे मात्र तेवढेच खरे आहे.२००२ मधील गुजरात दंगलीत बिल्कीस बानो सामूहिक अत्याचार आणि तिच्या कुटुंबातील ७ सदस्यांच्या हत्येतील सर्व ११ दोषींची शिक्षा माफ करून त्यांची तुरुंगातून सुटका केली जाते.अश्यावेळी साहाजीकच न्यायव्यस्थेवर देखिल प्रश्न उठतात.फूलन देवीवर देखिल असाच सामुहिक अमानुष अत्याचार झाला,पण त्यांनी स्वता;च त्याचा सुड घेतला.मग महिलांनी फुलनचा आदर्श घेतला तर वाईट काहीच नाही.आत्मस्वाभिमानी असणे हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे,आणि तो तिला मिळालाच पाहिजे.
सध्या सोशल मिडीयावर मणिपूरमधून येणार्‍या महिलांवरील लैंगिक अत्याचाराची चित्रे हृदय पिळवटून टाकणारी आहेत.आता तरी या विषयावर लिहा,व्यक्त व्हा,प्रतिकार करा तरच हे कुठेतरी थांबेल.कसल्या बिनडोक हैवानांच्या देशात राहातोय आपण याची खरच लाज वाटतेय.अश्या रानटी,लिंगपीसाट,विकृत मानसिकतेचा आणि शासनव्यस्थेचा जाहिर निषेध आहे!

 

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *