पिंजऱ्यातील बंद मनं..

मी अनेकदा वृध्दाश्रमात जाते.. तशीच कालही गेले होते.
खरं तर वृध्दाश्रम असायलाच नको पण………. या पण मधे बरच काही सामावलय कारण यातलं माझ्या हातात फक्त माझे सासु सासरे आणि आई वडील त्याठिकाणी जाणार नाहीत हेच आहे पण त्यांची इच्छा असेल का ??.. कारण हे एका बाजूने होत नाही .. पण एका बाजुचा विचार केला तर प्रत्येकाने आपल्या आईवडीलांची काळजी घ्यायला हवी कारण लहानपणापासुन आपल्याला त्यांनी घडवलय पण काही आई वडील सुद्धा जेव्हा ऐकत नाहीत तेव्हा नाइलाज होतो..
वृध्दाश्रमाच्या गेटच्या आत जाताना लक्ष वेधलं ते पिंजऱ्यातील डॉगी नी आणि मन हेलावुन गेलं कारण प्राणी पक्षी पिंजऱ्यात मी पाहूच शकत नाही..आपण इतके क्रूर का बरं ??.. असं वाटलं हेच पुढच्या जन्मी उलट झालं तर ??कल्पनेने थरकाप उडाला .. पुन्हा जन्मही नको आणि मरणही नको आणि उघड्या डोळ्यांनी हे पहाणही नको… तिथुन आत गेले तर आजीआजोबा तेही पिंजऱ्यात आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.. त्यांची मनं बंद करुन मुग गिळुन आलेल्या परिस्थीतीला सामोरे जात आणि आलेल्या प्रत्येकाला आपलं मुल समजत चार भिंतीत बसायचं किवा झोपायचं.. सगळच वेदनादायी .. ते तिथे असायला कारणं वेगवेगळी असतील पण बंद मनामागे हुरहुर एकच असेल ना ??. याला ज्याची त्याची कर्म म्हणायची की अजुन काही ??.. पण मग जे सेवा करणारे त्यांचीही चांगली कर्मच म्हणावी लागतील ना.. सगळाच गोंधळ आहे..माझ्या श्रीकृष्णाला विचारावं वाटतं जितकं मला स्ट्रॉंग बनवलस त्याहीपेक्षा हळवं का बनवलस ??.. सगळच पेनफुल..
त्या आजीआजोबांशी मारलेल्या गप्पा , प्रेमाने फिरलेला मायेचा हात , त्या डोळ्यात असलेली घरची आस , क्षणात त्यांचे बदलणारे मुड आणि आम्हाला मुल समजुन भरवला जाणारा घास सगळच विलक्षण आहे.. त्यांचं त्यांच्या मुलाशी का पटत नसेल ??आणि बाहेरच्या लोकांना ते मुल का समजत असावे ??.. सगळीच कोडी.. आयुष्यच एक कोडं आहे.. मला कमाल वाटते ती माझ्या भगवंताची अशा चित्र विचित्र माणसाना तो कसं सावरत असेल.. पाप काय आणि पुण्य काय तिथुन जाऊन आल्यापासून डोक्यात नुसता गोंधळ सुरु आहे.. पिंजऱ्यात कोपऱ्यात शांत बसलेलं काळं डॉगी काय विचार करत असेल त्यावेळी ??.. आपण रोज तर किती चुका करतो.. वेळ मिळाल्यावर भगवंताचे नाव घेणार..तरीही तो आपल्याला माफ करतो.. सगळच थरकाप उडवणारं..
इतर वेळी मी जेव्हा अंधांच्या संस्था मधे जाते किवा वृध्धाश्रमात जाते तेव्हा मला इतका त्रास कधीच होत नाही.. मंदिरात गेल्याचा फील येतो.. मग काल असं काय झालं होतं की तिथुन आल्यापासून माझं कामात लक्ष लागत नाही…. बंद दरवाजा आणि बंद मनं दोन्हीही उघडुन बाहेर नव्याने डोकावण्याची गरज आहे हेच खरं.. जगणही कॅज्युअल घेउ नका आणि मरणही नाही .. मी कधीही जातीधर्मावर किंवा राजकारणावर लिहीत नाही आणि बोलतही नाही कारण मी जात धर्माच्या पलीकडे माणुस पहाते, पण काल जेव्हा आजी आजोबांची आडनावं ऐकली आणि मला लाज वाटली.. सगळ्यात उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील 90% मंडळी तिथे होती.. हा उच्च शिक्षणाचा प्रभाव की माज कि अति प्रमाणात दिलं जाणारं स्वातंत्र्य की अजुन काही की परदेशात मुलं गेल्यावर भरपुर पैसे पाठवले की झालं म्हणणारे जबाबदार (बे ) नागरिक ..
जरुर नव्याने विचार करा..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *