शिक्षक दिन ;TEACHER’S DAY शिक्षक : ज्ञानाचा अथांग सागर

” शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय  राहणार नाही ” हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे  वाक्य अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे. आपला देश जागतिक महासत्ता होण्यासाठी यशस्वी मार्गक्रमण करत आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षण आणि शिक्षणाच्या या पवित्र कार्यात शिक्षकाचे कार्य अनमोल असे आहे. शिक्षक म्हणजे  समुद्र ज्ञानाच्या सागरातील एक पवित्र शिल्प… आदरणीय कोपरा… प्रत्येक व्यक्तीच्या मनातला आदरणीय कोपरा…..अपूर्णांकाला पूर्णत्व प्राप्त करून देऊन बालकांचे व्यक्तिमत्व  घडवणारा… अशा कितीतरी उपमा देता येतील. अशा या शिक्षकरुपी व्यक्तिमत्वातून शैक्षणिक तत्त्वातून  मूल्य फुलवणारे गुरुवर्य…तमाम  गुरुजनांना विनम्र अभिवादन!

            स्वतंत्र भारताचे दुसरे  राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे यांचे नाव सर्व भारतीयांना माहित आहे. मद्रास (चेन्नई)जवळच्या तिरुत्तनी गावात त्यांचा जन्म झाला. 5 सप्टेंबर1888  हा त्यांचा जन्मदिन असून तो संपूर्ण भारताचा शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. ‌डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरु राहीलच .

          1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्यासाठी इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिक्षकाला भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस….. 

समुद्रात भरकटलेल्या जहाजाला दिशा दाखवण्याचे काम होकायंत्र करते त्याप्रमाणे आपल्या जीवनात दिशा दाखवण्याचे काम शिक्षक करत असतात. शिक्षकांच्या हातात देशाचे भवितव्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई वडिलांनंतर शिक्षकाकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात म्हणून शिक्षकाला दुसरे पालकही म्हटले जाते. वैचारिक व जिज्ञासू व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी शिक्षकाचा मोठा वाटा असतो. 

                  संस्कारक्षम व शिस्तप्रिय व्यक्तिमत्व घडवण्यासाठी शिक्षक आपली सर्व ताकद पणाला  लावतात.  शिक्षक एकाच बागेत  विविध रूप आणि रंगाचे फूल सजवणाऱ्या माळ्याप्रमाणे असतो. विद्यार्थ्यांना काट्यावर हसत चालवण्यासाठी प्रेरित करतात. आज प्रत्येक घरात शिक्षण पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकाचे स्वप्न असतं म्हणून शिक्षक हे आजच्या सन्मानाचे हक्कदार आहेत.

 इंटरनेटच्या जगात टु जी, थ्री जी, फोर जी आले पण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मात्र गुरुजीच आले. राष्ट्राच्या प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ असणारे आणि बालमनाच्या कळीला फुलवणारे खेड्या-पाड्यावर वाडी-तांड्यावर, गाव- रस्त्यावर डोंगर घाट प्रवास करून अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या गुरुजनांना मानाचा मुजरा!!!

सविता गणपतराव कदम       

    सहशिक्षिका,जि.प.हा.टेळकी         

   मो.नं 9420415252-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *