कंधार ; प्रतिनिधी
लोहा व कंधार तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीचा मोठा पाऊस होऊन खरीप हंगामातील कोवळी पिके खरडून गेल्याने अनेक हेक्टरवरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने लोहा व कंधार तालुक्यातील शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट कोसळले होते, पण प्रशासनाच्या वतीने लोहा व कंधार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे कोणतेही नुकसान झाले नाही असे भासवत लोहा कंधार तालुक्याचा अतिवृष्टीचा अहवाल शून्य टक्के दाखवला असल्याने हा शासनाला पाठवलेला अहवाल तात्काळ रद्द करून पुन्हा तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करून मतदारसंघातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देऊन न्याय देण्याची मागणी लोहा कंधार चे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी काल सोमवार दि. 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे,
लोहा तालुक्यातील सोनखेड मंडळात 80 मिलिमीटर पाऊस, कापशी मंडळात 71.75 मिलिमीटर पाऊस, कलंबर मंडळात 67.25 मिलिमीटर पाऊस , माळाकोळी मंडळात 77 मिलिमीटर पाऊस,शेवडी मंडळात 82 मिलिमीटर पाऊस झाल्याने या ठिकाणची अतिवृष्टीची नोंद झाली होती, तर कंधार तालुक्यातील उस्माननगर मंडळात 71.75 मिलिमीटर यासह सर्व लोहा व कंधार सर्व मंडळातील पाऊस झाल्याची नोंद झाली होती या अतिवृष्टीच्या पावसाच्या नोंदी जुलै महिन्यांमधील आहेत,
लोहा व कंधार तालुक्यातील या अतिवृष्टीच्या नुकसानी बाबत फेरतपासणी करून तात्काळ पंचनामे करून मतदारसंघातील शेतकरी बांधवांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन सखोल चर्चा केली व मतदारसंघातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीसह न्याय देण्याची मागणी केली, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर, डोणवाडाचे उपसरपंच हनुमंत पाटील जाधव, अशोक बोधगिरे सह पदाधिकारी उपस्थित होते.