प्राचार्य मैनाताईंचे हार्दिक अभिनंदन..! संघर्ष यात्रा – 

 

‘ संघर्ष यात्रा ‘ हे उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्या मैनाताई साबणे यांचे आत्मकथन आज मोठ्या थाटात प्रकाशित होत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. बारा वर्षांपूर्वी उदगीर येथील शामार्य कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या. सोळा वर्षांपूर्वी जेव्हा मी उदगीरला येऊन स्थायिक झालो, तेव्हा येथील सामाजिक चळवळीमध्ये निर्मलाताई डोळे, मीनाताई घनपाठी, लक्ष्मीबाई पांढरे, अरुणा लेंडाणे, प्रा.भारती मुळे, सुशिलाताई खादीवाले यांच्यासोबत मैनाताईही आघाडीवर असलेल्या मी पाहिले आहे. हिंदू खाटिक जात समूहातील शून्यातून विश्व निर्माण केलेल्या मैनाताई साबणे सर्वसामान्य महिलांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. उदगीर आणि परिसरात सामाजिक, राजकीय चळवळीतील त्यांचे योगदान निश्चितच दखलपात्र आहे. आदर्श शिक्षक, कुशल मुख्याध्यापक, संस्थाचालक, धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या, लातूर जिल्ह्याच्या शिवसेना नेत्या ते हेर (राखीव) विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हा त्यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे.
हजारो वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या अनुसूचित जाती समूहातील एक स्त्री, केवळ आणि केवळ शिक्षणाच्या बळावर, प्रचंड जिद्द आणि स्वप्रयत्नांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करते, एका नामांकित संस्थेत प्राचार्यासारख्या मोठ्या पदावर विराजमान होते, ही गोष्टच येथील प्रस्थापित व्यवस्थेच्या पचनी पडण्यासारखी नव्हती. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मैनाताईंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. समाजकंटकांनी त्यांच्यावर अनेक खोटे आरोप लावले. परंतु आपल्यावर आलेले हे बालंट मैनाताईंनी कायद्याचा आधार घेऊन मोठ्या खंबीरपणाने झुंज देऊन झुगारून दिले. मैनाताई म्हणजे व्यवस्थेच्या विरुद्ध लढणारी झुंजार वाघीण होय. त्यांच्या या संघर्षाची कहाणी म्हणजेच त्यांचे हे आत्मकथन होय.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट ( ता. भूम) मैनाताईंचे जन्मगाव. त्यांचे कुटुंब कळंब तालुक्यातील येडाई देवीच्या येरमाळा या गावातून विस्थापित होऊन ईट येथे स्थायिक झालेले. संघर्ष हा मैनाताईंच्या पाचवीलाच पुजलेला. घरची अत्यंत गरीब परिस्थिती. स्थलांतराचे दुःख घेऊन, सर्व प्रकारच्या वंचना सोसत हे कुटुंब जगत होते. पण त्यातही या कुटुंबाने आपली हिंमत सोडली नाही. स्वाभिमानी बाणा सोडला नाही. मिळेल ते काम करत मनाताईंच्या वडिलांनी आपले कुटुंब सांभाळले. मैनाताईंच्या आजीच्या आग्रहावरून त्यांना शाळेत घालण्यात आले. शाळेत सुरुवातीपासूनच त्या हुशार होत्या. खो-खो सारख्या खेळात त्यांनी तालुका आणि जिल्हा पातळीवर यश संपादन केले होते.

मैनाताईंना ईट गावात शिक्षणाची चांगली गोडी लागलेली असताना पोटापाण्यासाठी या कुटुंबाला पुन्हा एकदा स्थलांतर करावे लागले. यावेळी हे कुटुंब बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे जाऊन राहू लागले. चौसाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असतानाच अल्पवयीन मैनाताईंचा विवाह उदगीर येथे झाला. सासरी मोठ्या कुटुंबात राबत असतानाच त्यांना शिक्षणाचे महत्त्व पुन्हा जाणवू लागले. दोन मुली झालेल्या असताना त्यांनी उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात अकरावीत प्रवेश घेतला आणि बघता बघता पदवी संपादन केली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षक पदासाठी आवश्यक असलेले बी.एड.चे प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले. शिक्षिका म्हणून एका नामांकित विद्यालयात त्या रुजू झाल्या.

 

इथपर्यंतचा प्रवास म्हणजे प्रचंड जिद्दीने, चिकाटीने मिळविलेले यश होय. शिक्षिका म्हणून काम करताना त्यांना काहीच अडचणी आल्या नाहीत. मात्र जेव्हा त्यांनी भारतीय संविधानाच्या कलमानुसार मुख्याध्यापक पदावर आपला हक्क सांगितला आणि ते पद कायद्याने स्वतःकडे खेचून घेतले, त्यानंतर मात्र त्यांना सातत्याने अनेक संकटांचा सामना करावा लागला.
भारतात अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. अनेक महामानवांनी समाजाच्या भल्यासाठी आपले जीवन समर्पित केले. येथे समता नांदावी, सर्व नागरिकांना समान विकासाची संधी मिळावी, सर्वांना समान पातळीवर जगण्याचा आनंद घेता यावा यासाठी आणि भेदभाव विरहित समाजाचे स्वप्न साकारण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.

 

मात्र भारतीय समाज मन अजूनही बदलायला तयार नाही. समाजात अजूनही प्रचंड भेदभाव आहेत. स्त्री पुरुष विषमता आहे, जातीय विषमता आहे हेच मैना ताईंना कराव्या लागलेल्या आधुनिक काळातील संघर्षावरून दिसून येते.
या आत्मकथनात मैनाताईंनी आपल्या संपूर्ण जीवनाची चित्रकथा सुंदर शब्दांमध्ये साकार केली आहे.

 

हे आत्मकथन म्हणजे तत्कालीन समाज जीवनाचे निखळ प्रतिबिंब होय. निजाम कालीन मराठवाड्यातील समाज जीवनाचा उभा आडवा छेद या आत्मकथनाच्या निमित्ताने मैनाताईंनी घेतलेला आहे. या आत्मकथनाचे साहित्यिक मूल्य जसे महत्त्वाचे आहे तसेच या आत्मकथनाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्यही प्राप्त झालेले आहे. या आत्मकथनात वैयक्तिक अनुभवांबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अनुभव सुद्धा आलेले आहेत आणि ते महत्त्वाचे आहेत. वाचकांना या आत्मकथनातून निश्चितच जीवनाचा बोध सापडेल असा मला विश्वास वाटतो. मैनाताईंनी यापुढेही लिहीत रहावे यासाठी खूप खूप शुभेच्छा..!
– डॉ. मारोती कसाब

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *