नांदेड ; भारत जोडो यात्रेचा इफेक्ट कर्नाटकच्या निवडणुकीत दिसून आला देशभरात काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे . वातावरण मतात परिवर्तित व्हावे व पुन्हा देशात इंडिया आघाडी ,राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे यासाठी विद्यमान सरकारचे सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे असलेले दुर्लक्ष गावा-गावापर्यंत पोहाेचवत जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठीच्या लोकसंवाद पदयात्रेचे सूक्ष्म नियोजन करीत यात्रा यशस्वी करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र जोडो’ अभियान राबविण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या ३ सप्टेंबरपासून राज्यात ‘लोकसंवाद पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ११) शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल येथे काँग्रेस मराठवाडास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर,माजी खा. तुकाराम रेंगे, विधानसभेतील काँग्रेसचे प्रतोद सुरेश वरपुडकर, आ. प्रज्ञा सातव, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत,आ. मोहनअण्णा हंबर्डे , आ. जितेश अंतापूरकर, माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ. भाऊसाहेब पाटील गोरेगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. सिराज देशमुख, प्रदेश काँग्रेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, रवींद्र दळवी आदींची उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले, की भारत जोडो यात्रेचा पक्षाला मोठा फायदा झाला वातावरण निर्मिती झाली हे वातावरण निवडणुकीपर्यंत कायम राहावे व मतात परिवर्तित व्हावे यासाठी जनसंपर्क आणखी वाढविणे तसेच सरकारचे अपयश सामान्यापर्यंत पोहोचविणे व काँग्रेसची भूमिका जनतेपर्यंत मांडणे आवश्यक आहे. यासाठी ३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून ‘लोकसंवाद पदयात्रा’ काढण्यात येणार आहे.या यात्रेत कॉर्नर बैठका, सभा घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक गावांतून यात्रा जावी यासाठी त्या – त्या जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्षांनी प्रमुख नेत्यांना विश्वासात घेत यात्रेचा मार्ग निश्चित करावा. सूक्ष्म नियोजन करत यात्रा यशस्वी व्हावी यासाठी सांघिक प्रयत्न करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
काँग्रेस एकसंघ आहे. मात्र, अन्य राजकीय पक्षाच्या फुटीमुळे आप-आपल्या जिल्ह्यात राजकीय परिस्थितीत झालेला बदल पाहता लोकसभेची उमेदवारी काँग्रेस की महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षास जागा सोडल्यास उमेदवार विजयी होईल तसेच बीआरएस, वंचित, एमआयएम फॅक्टरचा प्रभाव याचा अभ्यास करून १७ ऑगस्टपर्यंत वस्तुनिष्ठ माहितीचा अहवाल सादर करा असेही आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.दरम्यान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी प्रास्ताविकात केंद्र सरकार व फोडाफोडी करून राज्यात सत्तेवर आलेल्या राज्य सरकार विरुद्ध जनतेत प्रचंड असंतोष आहे. ही सरकारे सर्व पातळीवर अपयशी ठरल्या ने जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. महागाई, बेरोजगारी, सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण, ईडी-सीबीआयची मनमानी, जातीय दंगली, यामुळे जनतेत निर्माण झालेल्या असंतोषला वाचा फोडणे व काँग्रेस सर्व संकटात जनतेसोबत आहे, हे दाखवून देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगितले
—–
काँग्रेसला पोषक वातावरण ः मधुकरराव चव्हाण
———–
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य, शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेत आहे. ई़डी, सीबीआयच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे जात आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेस पक्षच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकतो. या मतांपर्यंत जनता पोहोचली आहे. मराठवाडाच नाही तर राज्यात काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे. हे वातावरण टिकून राहावे यासाठी सामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिले, असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
यावेळी माजी खा. तुकाराम रेंगे पाटील , आ. सुरेश वरपूडकर, आ. प्रज्ञा सातव, माजी आ. भाऊ पाटील गोरेगावकर, सिद्धार्थ हत्तीअंबीरे,राजेसाहेब देशमुख ,दिलीप देसाई, शरण पाटील आदींनी विचार मांडले. जिल्ह्यातील आजी, माजी आमदारांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड, जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षा मीनलताई खतगावकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.या बैठकीस मराठवाड्यातील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.कार्यक्रमाचे संचलन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले