कंधार :- कंधार येथील पंचायत समिती कार्यालयात ग्रामीण घरकुल लाभधारकांना बेसुमार लुटण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून असून या विषयी पंचायत समिती कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळवून सुध्दा डोळेझाक केल्या जात आहे.
घरकुल लाभधारकांना लुटणाऱ्या कर्मचाऱ्यावर चौकशी करुन कार्यवाही करावी आणि तात्काळ हाकालपट्टी करावी यासाठी आज दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी पासून कंधार पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सामाजिक कार्यकर्ते बाबुराव टोम्पे यांनी सुरू केले आहे.
अन्न, वस्त्र, पाणी, निवारा हया प्रमुख गरजा लोकशाही मुलतत्वात समाविष्ठ करण्यात आल्या असून त्या शासनाला पुर्ण कराव्याच लागतात. बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील असतांना घरकुल मंजुर करुन देण्यासाठी आणि प्रतिक्षा यादीत समावेश करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक घरकुल लाभधारकाकडून दहा-दहा हजार रुपये घेत आहेत तर कंधार पंचायत समिती कार्यालयात घरकुल विभागात कार्यरत असणारे कर्मचारी आणि सर्व अभियंता हे घरकुल लाभधारकाकडून घरकुलाचे बिल अदा करण्यासाठी सुमारे दोन-दोन हजार रुपये घेत आहेत. जे लाभधारक मलीदा देत नाहीत त्यांच्या घरकुलाचे बिल जाणीवपूर्वक जमा ठेवत आहेत. ज्या लाभधारकांनी पोटाला पिळ मारुन बांधकाम पुर्ण केले अशा अनेक लोकांना वेठीस धरुन त्याचे बिल टाकण्यास टाळाटाळ करीत आहेत. घरकुलांचे बिल काढण्याच्या कामात दलालाचा सुळसुळाट झाला असून घरकुल लाभधारक भरडला जात आहे. प्रसंगी अनेक घरकुल लाभधारक बिल मिळत नसल्याने आत्महत्या करण्याच्या विवंचनेत दिसत आहेत.
या सर्व अनागोंदी कारभाराची गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कार्यवाही करित तात्काळ हाकालपट्टी करावी हि मागणी अनेक दिवसापासून असतांना दोषी कर्मचाऱ्यांची पाठराखण केल्या जात आहे.
कंधार पंचायत समिती कार्यालयात घरकुल विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि या कामी कार्यरत असणाऱ्या सर्व अभियंता यांची लवकर चौकशी करुन तात्काळ हाकालपट्टी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव टोम्पे यांनी लेखी निवेदनाव्दारे केली असून मागणी निवेदनाच्या प्रती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मा. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी नांदेड, मा. तहसीलदार साहेब, कंधार, मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय कंधार, मा. पोलीस निरिक्षक साहेब, कंधार यांना देण्यात आल्या. सदरील उपोषणाला मामा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांनी भेट दिली व सदरील प्रकरणी दोषीवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली .
′