महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या 27 जुलै 2012 या दिवशीच्या शासन निर्णयानुसार ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात यावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे; मात्र 2012 पासून हा पुरस्कार आजतागायत संस्कृतदिनी देण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे, तर प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान न करता 2-3 वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे दिले जात आहेत. संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार्यांसाठी प्रेरणा मिळावी, हा उद्देश यातून सफल तर होत नाहीच, उलट संस्कृत भाषेच्या उत्कर्षाला मारकच ठरत आहे. त्यामुळे यंदा तरी राज्य सरकारने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार संस्कृतदिनी अर्थात 30 ऑगस्ट या दिवशी द्यावा, *अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’कडून करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे याविषयी निवेदन देण्यात आले.*
प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत कार्यकर्ते या पात्रतेतील 8 जणांना हा पुरस्कार दिला जातो. ‘संस्कृतदिन’ अगदी 15 दिवसांवर आला आहे. या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यास पुरेसा अवधी मिळावा, असा विचार करून हे निवेदन देण्यात आले आहे, *असे ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अभिषेक मुरुकुटे यांनी सांगितले.*
वर्ष 2016 आणि वर्ष 2017 या 2 वर्षांचे पुरस्कार वर्ष 2018 मध्ये, तर वर्ष 2018, 2019 आणि 2020 या वर्षांचे पुरस्कार वर्ष 2021 मध्ये एकत्रितपणे देण्यात आले. वर्ष 2021, 2022 आणि 2023 चा पुरस्कार अद्याप घोषितही झालेला नाही. तसेच हे पुरस्कार वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात दिले जातात. हा पुरस्कार संस्कृतदिनी दिल्यास खर्या अर्थाने संस्कृत भाषेचा, या पुरस्काराचा आणि पुरस्कारार्थींचा सन्मान ठरेल. तसेच हा पुरस्कार चालू झाल्यापासून मागील 10 वर्षांत पुरस्काराच्या रकमेत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. तरी ही रक्कम वाढवण्याविषयी मंत्रिमहोदयांची भेट घेतली असता, त्यांनी खात्याचे प्रधान सचिव यांना अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. या घटनेलाही आता पाच महिने झाले आहेत; मात्र त्या संदर्भात शासनाने काय प्रक्रिया केली, ते समजलेले नाही, *असेही श्री. मुरुकटे यांनी म्हटले आहे.*
आपला विश्वासू,
*श्री. अभिषेक मुरुकटे,*
समन्वयक, सुराज्य अभियान, महाराष्ट्र राज्य.
(संपर्क : 9821541107)