मुंबई, दि. २३ ऑगस्ट २०२३:
‘इंडिया’च्या आगामी बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा सुरू असतानाच चांद्रयान-३ च्या लँडिंगची वेळ झाल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी चर्चा थांबवून शेवटीची काही मिनिटे थेट प्रक्षेपण बघितले. ही मोहिम यशस्वी होताच त्यांनी टाळ्या वाजवून आनंदही साजरा केला.
येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत नियोजित ‘इंडिया’च्या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आज दिवसभर एकापाठोपाठ बैठकींचे सत्र सुरू होते. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सायंकाळी नियोजनाची समीक्षा करत असतानाच ५.४५ वाजले. सायंकाळी ६ वाजता चांद्रयानचे लँडिंग असल्याने चव्हाण यांनी चर्चा थांबवली व टॅबवर मोहिमेचे थेट प्रक्षेपण बघितले. यावेळी त्यांच्यासमवेत मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षा प्रा. वर्षाताई गायकवाड, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य गुरूदीप सप्पल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, बी.एम. संदीप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे पदाधिकारी गौरव पांधी आदी उपस्थित होते. चांद्रयान-३ सुरक्षितपणे चंद्रावर उतरल्यानंतर सर्वच नेत्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला व त्यानंतर पुढील चर्चा सुरू झाली.