काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण! ..बहादरपुरा मन्याड नदी पुलावरील थरार!

कंधार: ( विश्वंभर बसवंते )

म्हणतात ना?”काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” याचा प्रत्यय आज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोज गुरुवारी च्या पूर्वसंध्येला म्हणजेच रात्री १:०० वाजताचे सुमारास बहादरपुरा मन्याड नदी पुलावरून जात असलेला मालवाहू ट्रक पूलावरून खोल पाणी असलेल्या नदीत कोसळता कोसळता पूलाच्या मधोमध कठड्यावर तरंगला, म्हणून जीवित हानी टळली व ट्रक चालकाचे प्राण वाचले,ट्रक १ फूट जरी पुढे सरकला असता,तर ट्रक थेट खोल पाण्यात बुडून ट्रक चालकाचा अंत झाला असता, “दैव बलवत्तर” म्हणून वाचले प्राण “असे ट्रक चालक शेख अतीफ यांनी जड अंतकरणाने बोलून दाखवले.
दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोज गुरुवारी ट्रक क्रमांक एम. एच. २६ एडी.२७१३ चा चालक शेख अतीफ वय ३५ वर्षे राहणार नांदेड हा हिंगोली येथून पशुखाद्य घेऊन कंधार बहादरपुरा मार्गे तामिळनाडूकडे निघाला होता. रात्रीची अंधारी वेळ,ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाच्या कोसळणाऱ्या सरी व बहादरपुरा मन्याड नदी पुलाच्या दोन्ही बाजूचा मृत्यूचा सापळा बनलेला रस्ता, या सर्वच गोष्टीच्या संकटातून रस्ता पार करत पुढे जात असताना पुलाच्या तोंडाशी रस्त्यात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने ट्रक चालकास खड्ड्याचा अंदाज आला नसल्यामुळे ट्रक हा खड्ड्यात आदळून ट्रकचा कोणता तरी पार्ट तुटला, आणि चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला व ट्रक १० मीटर पुढे पुलाच्या मध्यभागा पर्यंत जाऊन, पाण्यात पडता पडता कठड्याला अडकून तरंगला, त्यामुळे मोठी जीवित हानी टळली असल्याचे बोलल्या जात आहे.
सदरच्या रस्त्याबाबत  अनेक वृत्तपत्रातून अनेक वेळा मन्याड नदी पूलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे खड्डे बुजून मजबुतीकरण करावे, यासाठी आवाज उठवण्यात आला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी डोळे झाकपणा करत, फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा प्रत्यय आज जनतेसह वाहन चालकांना आला आहे.सदर रस्ता बांधण्याची निविदा प्रक्रिया ही माहे “जून २०२३ रोजी पूर्ण झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक वेळा सांगितली जात आहे. परंतु केवळ या कामाचा “कार्यारंभ आदेश”आला नसल्यामुळे काम सुरू करता येत नाही, हे कारण पुढे करून वाहन चालक व प्रवासी यांच्या जीवाशी सार्वजनिक बांधकाम विभाग खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

गत तीन महिन्यापासून सदरच्या रस्त्याचे “कार्यारंभ आदेशास”विलंब होण्याचे नेमके गौडबंगाल काय? कार्यारंभ आदेश द्यायचा नसेल तर, मग निविदा प्रक्रिया मागून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे कारणच काय ? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारल्या जात असल्याचे ऐकावयास मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *