मोहरम ह्या धार्मिक सणाला आमच्या गावाकडे एक वेगळे च महत्व आहे. सामाजिक एकोपा व सलोखा वाढविणारा हा सण, वर्षातून एकदा येतो पण वर्षभराचा आनंद पेरून जातो. आमच्या गावातील च नव्हे तर पंचक्रोशीतील लोकं या सणाची अगदी चातका गत वाट पाहतात. गावामध्ये मोहरम या शब्दापेक्षा ‘सवारी ‘हा शब्द जास्त प्रचलित व तोंडवळणी आहे. खरंतर हा सण कुठल्या धर्मात किंवा जातीच्या बंधनात अडकून नाही. लहान -थोर,गरीब -श्रीमंत, महिला -पुरुष ह्या सर्व गटातील लोकं यात अतिशय उत्साहाने सहभागी होतात. गावातील तरणी पोरं कामानिमित्त/नोकरी निमित्त बाहेर गावी जरी असतील तरी ती सर्व मंडळी ह्या सवारीच्या उत्सवात रंगारंग व्हायला आपल्या गावी येतात.गावातील प्रत्येक घरातील बायलेकी,सगे सोयरे, मित्र मंडळी ह्यांनी गाव गजबुजून जातो. इतक्या समध्या लोकांना एकत्र बघताना मन भरून येतो,अगदी भरल्या वाड्यासारखं गाव भरून दिसतं. कित्येक दिवसानी आपल्या जवळच्या लोकांच्या गाठी -भेठी होणार म्हणुन सासुरवासीन लेक आनंदाच्या भरात माहेरी येते . आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी समदं गाव नजरेखालून घालताना भावनेने गळा भरून येतो , बालपणीच्या आठवणी कुरवाळत बसते, इतक्यात एक दोन मैत्रिणीची भेटही झालेली असते . अश्या अनेक मैत्रिणीची /मित्रांची भेट घालून देणारा हा सण…म्हणजेच सवारी ची जत्रा.लहान -सहान पोरं दिवसभर अश्या ह्या उत्साहित वातावरणात न्हाऊन निघतात.
मोहरम हा तसा धार्मिक सण, पण आमच्या गावात त्याला सामाजिक बंधुभावाची झालर आहे. अक्खा गाव ते दोन दिवस अक्षरशः दिवस -रात्र जागून काढतो. पहिला दिवस तसा नॉन व्हेज वाल्यांचा म्हणायचा…. कारण त्या दिवशी गावात किमान दहा ते बारा बकरे कापले जातात.अश्या ह्या मटणाच्या जेवणाला आमच्यकडे कंदोरी म्हणतात आणि औतान देऊन लोकांना जेवायला घालतात. तसा व्हेज वाल्यासाठी पण मलिदा आणि बिरंजी चा पर्याय असतो म्हणा.ज्यांना मटण जमत नाही त्यांनी मलिदा खावावा बास. बकरी कापण्याचे कारण….. कि अनेक लोकांनी नवस म्हणुन देवाकडे मागणी केलेली असते आणि ते पूर्ण झाले म्हणुन परतफेड ह्या स्वरूपात करतात.
सायंकाळी 7 च्या नंतर गावातील प्रत्येक घरातून एक शेरा(कागदाचा हार किंवा फुलांचा हार ) हा (चांदपीर )देवाला चढवण्यासाठी अगदी वाजत -गाजत गल्ली बोळातून लोकं आनंदाने वेशीकडे निघतात. शेरा चढवून झाल्यावर पेढे मिठाई प्रसाद म्हणून वाटल्यांनतर सर्व जण मिळून एक सामूहिक नृत्य करतात, गोल रिंगण करून हलगीच्या तालावर नाचताना एक वेगळी च अनुभूती येते.त्या दिवशीची पूर्ण रात्र लोकं एकत्र येऊन सोंग (लोक कला, नाटकाचा एक प्रकार )बघतात. हा प्रकार हा आमच्या गावची लोक कला आहे. वेगळ्या धाटनीची यात पुराणकथा, रामायण, महाभारत, अश्या अनेक धार्मिक नाटके केली जातात, त्यात मध्ये मध्ये विनोदी सोंगे पण असतात, हा कार्यक्रम पूर्ण रात्र भर लोक तल्लीन होऊन बघतात. यात च सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम पण घेतले जातात. शिनलेला, भागलेला, जन्मोजन्मी चे दुःख डोक्यावर घेउन फिरणारा हा आमचा ग्रामीण भागातला शेतकरी या दोन दिवसाच्या उत्सवात सर्व दुःख विसरून या मनोरंजनाचा भरपूर आनंद घेतो.
दुसरा दिवस हा भल्या पहाटे च सुरु होतो,चार वाजताच. रात्र भर सोंगे बघणारी मंडळी देव उठे पर्येंत थांबत असतात. देव (चांदपीर )उठला कि गावातल्या प्रत्येकाच्या घरी दर्शन देण्यासाठी जाणार, सोबत शंभर ते दीडशे लोक नाचत देवांच्या पालकी सोबत असायचे. पहाटे पहाटे देव आपल्या घरी आला म्हणुन बायका पोरं थंड पाण्याणी अंघोळ करून दर्शनासाठी तयार असायचे. कित्येक वेळा गावात लाईट नसत, त्यावेळी मशाली पेटवून, किर्रर्र अंधारात, गल्ली बोळातून सवारी ही प्रत्येक घरी जाऊन दर्शन द्यायची. लोकं मोठ्यांनी आरोळ्या ठोकत ‘चांदपीर कि दोस चारोदिन’ च्या निनादात हलगीच्या तालावर लोकं झीन्ग होऊन ह्या उत्सवी रंगात रंगून जात असत.
दुसरा दिवस हा खऱ्या अर्थाने मुख्य आकर्षणा चा दिवस.या दिवशी वेगवेगळी सोंगाडी मंडळी आपली कला दाखविण्यासाठी दुपारी पूर्ण गावभर फिरत भारूड, वग, नाटक, विनोदी नृत्य, अश्या विविध प्रकारच्या कला लोकांसमोर सादर करतात. या दरम्यान पूर्ण गाव आपले रोज चे कामे बाजूला ठेवून या रंगात रंगून जातो आणि कलेला दाद देतात. दुपारी पाच नंतर गावातील जवळपास दोन ते तीन हजार लोकं वेशिपाशी एकत्र जमतात, आणि वाघा (माणूस वाघा सारखे रंगवून घेउन .. विशिष्ट प्रकारची चाल करत येतो )ची कला बघण्यासाठी उत्सुक होऊन वाट बघतात.खरं म्हणजे इतकी गर्दी एका वेळी शांतपणे आणि पूर्ण शिस्तीत…. दुसऱ्या कुठल्याच निमित्ताने पाहायला मिळत नाही.इथल्या गर्दीचे मानसशास्त्र काही निराळे च म्हणावे लागेल….. ह्या दोन दिवसात सर्व जण सारखेच ह्या उत्सवात सहभागी होतात, आनंद घेतात. रोज चे हेवेदावे,जन्मोजन्मी चे दुःख विसरून,निराशा झटकून,अतिशय उत्साहाने, आशेने एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सर्वांच्या आनंदात सहभागी होतात. एकमेकांना प्रेम देतात. ती एकी तो बंधुभाव नेहमी प्रमाणे वर्षानुवर्षे वृद्धिंगत होताना बघून आनंद होतो.
#@विठ्ठल मकपल्ले @# कृषी अधिकारी