Post Views: 49
नांदेड – राज्यातील शिक्षकांना या ना त्या कारणावरून अशैक्षणिक कामास जुंपणे हे अन्यायकारक, अनैतिक व नियमबाह्य आहे असे मत व्यक्त करीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सर्वेक्षण व अशैक्षणिक कामावर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात कोणतीही अशी कामे करू नयेत असा सल्ला राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी राज्यातील सर्व कार्याकारीणीना दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी निरक्षरांचे सर्वेक्षण कामावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना बहिष्कार टाकत आहे अशी माहिती दिली आहे.
शिक्षकांनी निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. तसेच निरक्षरांचे सर्वेक्षण व इतर अशैक्षणिक कामे जणगणना, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तसेच निवडनूक पुर्व काम बीएलओ कामे हे शालेय कामकाज सोडून सुट्टीच्या वेळेत तथा सुट्टीच्या दिवशी करण्यास सांगितले आहे. हे सर्व अशैक्षणिक कामे शिक्षका मार्फत करुन घेतले जात आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणावरील अधिकार अधिनियम कलम २७ नुसार ही कामे शिक्षकांकडून करून घेतली जाऊ शकत नाहीत. याकडे शिक्षक सेनेने सरकारचे लक्ष वेधले आहे.
सर्वेक्षण तसेच निवडणूक पूर्व कामे यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष अभ्यंकर साहेब यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मंत्री ना. दीपकजी केसरकर, रणजितसिंह देओल, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय व सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त, पूणे यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात शिक्षक सेनेचे कार्यकर्ते अशैक्षणिक कामे व निरक्षरांचे सर्वेक्षण ही कामे करणार नाहीत असेही नमूद केले आहे.