Post Views: 64
नांदेड – भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. मात्र, आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. महिलांना कायद्याने पुरुषांसारखे समान अधिकार मिळाले आहेत. परंतु समाजात त्यांच्या स्थानाबाबत असमानता आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांबाबत लोकांच्या मनात दुहेरी मानसिकता आहे. आजही समाजात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिक स्थान मिळत नाही. मात्र, जगभरात महिलांना समान हक्क आणि जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुलींचे अर्थातच महिलांचे हक्क आणि अधिकार यासंबंधी बालवयातच माहिती व्हावी या उद्देशाने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नारी समता दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
लैंगिक समानतेचा प्रश्न हा संपूर्ण जगाचाच प्रश्न आहे. देशात लैंगिक समानता आणण्याच्या प्रयत्न सुरू आहेत. अनेक देश या विषमतेशी झगडत आहेत. याबाबत लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. महिलांच्या समानतेचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय बनला आहे. हा दिवस भारतातही साजरा केला जातो. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला समानता दिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुलींसाठी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, सहशिक्षक संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख मनिषा गच्चे, इंदिरा पांचाळ आदींची उपस्थिती होती.