आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार थाटात प्रदान

 

पुणे- दि.२९ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत देशाबरोबर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून पदकांची लयलूट करणारी नांदेडची भुमिकन्या भाग्यश्री माधवराव जाधव यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार पुण्यात एका शानदार समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुण्यातील बालेवाडी येथे सोमवारी झालेल्या या शानदार सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पलसंपदा मंत्री गिरीष महाजन, लेकप्रतिनिधी, क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मृतीचिन्ह, तीन लाख रुपये असे या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे आहे.

नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री जाधव हिने दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची लयलूट केली आहे.
दुबई येथे झालेल्या फाजा व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर गतवर्षी टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे.
बंगळूरू येथे ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात तिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
नोव्हेंबर 2022 मध्ये पोर्तुगाल येथे जागतिकस्तरावर झालेल्या आयवॉज २०२२ या जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक क्रीडा प्रकारात रौप्य व कास्य पदक मिळवून भारताबरोबरच महाराष्ट्राचा नावलौकिक केला.
मार्च 2023 मध्ये उत्तर आफ्रिकेतील मोरक्को या देशात वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स ग्रॅन्ड प्रिक्स २०२३ या स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधीत्व करीत कास्य पदक पटकावले आहे.
बंगळूरु येथे दि.४ ते ८ मे या कालावधीत झालेल्या पाचव्या भारतीय ओपन पॅरा अथेलिटिक्स इंटर नॅशनल चॅम्पिअनशीप-2023 या स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांनी गोळाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
सध्या पॅरिस येथे सुरु असलेल्या. वर्ल्ड पॅरा अथेलिटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ती सहभागी झालेली असून तीने गोळाफेक क्रीडा प्रकारात चौथा क्रमांक पटकाविला आहे. त्याच बरोबर सन २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी एक जागा राखीव ठेवण्याचा बहुमान मिळविला आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव यांनी नेहमीच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्राची शान कायम राखली आहे.
अवघ्या सहा वर्षाच्या क्रीडा प्रवासात भाग्यश्री जाधव यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण (बंगळूरु), सहाय्यक प्रशिक्षक श्रीमती पुष्पा (बंगळूरु) व गुरुबंधु पालक पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
राज्य सरकारने तिच्या या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेऊन तिला सन २०२१-२०२२ चा थेट शिवछत्रपती पुरस्कार जाहीर केला होता. त्या पुररकाराचे वितरण सोमवारी पुण्यात एका शानदार सोहळ्यात करण्यात आले.
या समारंभास राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह भाग्यश्रीचे कुटुंबिय चुलती श्रीमती आशाबाई जाधव, वडील माधवराव जाधव,आई सौ. पुष्पाबाई जाधव, मोठे बंधु गणेश जाधव, रमेश जाधव, भावजयी सौ. गायत्री जाधव, सौ. अनुराधा जाधव, सौ. श्यामल कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *