शिक्षण क्षेत्रातील संघर्षशील योद्धा: संतोष अंबुलगेकर

 

आजचे शिक्षणक्षेत्र विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. महाराष्ट्राच्या राज्यनिर्मितीनंतर शिक्षण आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हीच एक मोठी समस्या होती. राज्याचे साक्षरतेतले मागासलेपण हेही एक मोठेच आव्हान होते. विविध प्रयोगानंतरही शिक्षणाची आजची अवस्था सदृढ आहे असे म्हणता येत नाही. नवे शैक्षणिक धोरण येत आहे तेही अनेक समस्या निर्माण करीत आहे.‌ आधीच शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला राजकीय आणि स्वार्थांध लोकांनी गढूळ बनवून टाकले आहे. खरे तर ते अधिक पवित्र मानायला आणि ठेवायला हवे परंतु शिक्षणाचा सगळ्यांनीच बाजार मांडलेला आहे. शिक्षकांवरही समाजाचा विश्वास राहिलेला नाही आणि विविध स्तरांतील शिक्षकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.‌ पूर्वीही आजच्या इतक्या नसल्या तरी विविध संघटना अस्तित्वात होत्या. त्यांचे कार्यही आपापल्या पद्धतीने चालायचे.‌ काही मोजक्याच प्रश्नांवर भूमिका घेतली जायची. परंतु शिक्षण क्षेत्रात आज काही समस्या निर्माण होतात; त्या काही अंशी, बव्हंशी सोडविल्या जात नाहीत तोवर दुसऱ्या काही नव्या समस्या जन्माला येत असतात. काही तर लंबी रेस का घोडा असतात. या परिस्थितीमुळे शिक्षण ही संकल्पनाच आजारग्रस्त झालेली आहे. शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे शिक्षणच बंद करण्याचा घाट घातला जात आहे की काय अशी शंका आता येऊ लागली आहे. ही परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. असे जाणवू लागले आहे की, आसमंतातील काळी काळकाजळी हळूहळू शिक्षणक्षेत्रावरच जमू लागली आहे. तेव्हा अशा या अंधारप्रदेशात शिक्षक सेना नावाची धगधगती मशाल हाती घेऊन फुलत्या निखाऱ्यावरुन चालण्याचं धारिष्ट्य ज्याच्या अंगी आहे असा संघर्षशील योद्धा म्हणजे नांदेड जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील अंबुलगेकर!

गेल्या दशकाच्या प्रारंभीच त्यांनी शिक्षक सेनेचे शिवधनुष्य पेलले ज्यावेळी शिक्षक सेना आत बाहेरून खिळखिळी झालेली होती. त्यावेळच्या निष्ठावंत शिक्षकसैनिकांनी शिक्षक सेनेला तारले. शिक्षक सेनेच्या जबाबदारीचा मुकुट आपसूकच संतोष अंबुलगेकर यांच्या शिरी आला. जबाबदारीसह अनेक आव्हानांचा सामना करीत तसेच वाटेत येणाऱ्या खिंडी लढवित संघटनेला गतवैभव मिळवून देण्याचे ऐतिहासिक महत्कार्य अंबुलगेकरांनी बोटावर मोजता येतील एवढ्या मावळ्यांना घेऊन मिळवून दिले. हा काळ सोपा नव्हता. लोक कमी होते. काम करणे गरजेचेच होते. शालेय अध्यापन, कामकाज आणि संघटनेचेही कार्य करावे लागत होते. त्यासाठी सतत वेळ देणं, बैठकांचे आयोजन, संपर्क साधणे, तालुक्यांची बांधणी करणे यांना प्राधान्य द्यावे लागत‌ होते. या काळात कुटुंबाकडे दुर्लक्ष होत होते तरी सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होत होते आणि ते सोडवणे गरजेचे होते. त्यासाठी लोकशाही मार्गाचाच अवलंब करणे आवश्यक होते. कारण तोंडाला काळे फासणे, घेराव घालणे, कॅबिन फोडणे, पुतळा जाळणे, शासनादेशाची होळी करणे, अधिकाऱ्यांचे अपहरण करणे, हल्लाबोल करणे, गाड्यांचा ताफा अडवणे असे आंदोलनाचे विविध प्रकार शिवसेना आपल्या पद्धतीने करीत होती ही पद्धत वेळपरत्वे शिक्षक सेनाही अवलंबित होती. पण आता ते शक्य नव्हते त्यामुळे लोकशाही मार्गानेच आंदोलनाचा एकमेव पर्याय समोर होता. याच मार्गाने शिक्षक सेना सर्वसामान्य शिक्षकांच्या हृदयात आहे. संघटनविषयक मजबूत बांधणी करुन योग्य भूमिका समोर आल्यामुळे संघटनेस सौंदर्य प्राप्त झाले आहे. या वैभवाला संघटनेसाठी अविरत मेहनत घेण्याची, झिजण्याची झालर आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ही शिवसेनेचीच एक अपत्य शाखा आहे. संतोष अंबुलगेकर जिल्हाध्यक्ष पदावर आरूढ झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाप्रमुखांची योग्य साथ शिक्षक सेनेच्या पाठीशी राहिली. तशी साथ आजपर्यंत मिळत राहिलेलीच आहे.‌ ह्यात काही शंका नाही. २०११ साली हिंदी बीएड विरोधात जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वाखाली जि. प. च्या शिक्षण विभागावर हल्लाबोल करण्यात आला. आधीच दडपणाखाली असलेल्या आणि आता अधिकच गांगरुन गेलेल्या शिक्षणाधिकारी यांना धडकी भरली. या प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याच दिवशी आमच्या मागणीची दखल घेत हिंदी बीएड आधारावर देण्यात येणाऱ्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचे पत्र पाचवाजेच्या आधी जिल्हाध्यक्षांच्या हातात दिले! हे एकाच दिवशी झाले असले तरी त्यामागे अनेक दिवसांचे प्रयत्न होते. या आंदोलनापासूनच मी या संघटनेत सामील व्हायचे ठरवले. त्या आधीपासून शिक्षक सेनेच्याच संपर्कात होतो परंतु कोणतेही पद नव्हते. असे असले तरी अनेक शिक्षक संघटनांच्या बांधणीतील जातीयवाद लक्षात घेता जातीयवादी समजल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या या शाखेतच खरा बहुजनवाद मुरलेला आहे असे प्रत्ययाला येत राहिले. याचा आनंद असतांना संघटना म्हणजे मैत्रीचा अनुबंध असतो, संघटनेत असत्याविरोधात लढण्याची उर्जा देणारा सांघिक बळाचा प्रेरणास्रोत असतो. यात सर्वसमावेशकता, समानतेची दृष्टी आणि वागणूक, व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्याचा पुरस्कार, वैचारिक मतांना मान्यता आणि एकत्वाची, एकजुटीची ही सौंदर्यमूल्ये जोपासली जात आहेत हे खऱ्या अर्थाने इथेच दिसत होते. याचाही निर्भेळ आनंद संघटनेच्या माध्यमातून मिळत होता.

अंबुलगेकरांच्या कार्यकर्तृत्वाची चुणूक अल्पावधीतच जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात आणि शिवसेनेच्या राजकीय गोटात चमकत राहिली. अनेक लोक येत गेले आणि संघटनेशी जुळत गेले. गद्दार तर सगळीकडेच असतात. त्यांना वेळेवर डच्चू देण्याचे प्रसंगावधान त्यांनी राखले अन्यथा अस्तिनातील साप पोसले जाऊन संघटनेलाच डसण्याचे काम पुढील काळात झाले असते. यामुळे जे नुकसान होणार होते ते भरून निघणारे नव्हते. निष्ठावंताच्या वेषात गद्दार जन्माला येत असतील तर ते वेळीच ओळखणे आवश्यक होते. अंबुलगेकरांना हे फार चांगले जमते ही जमेची बाजू आहे आणि हा संघटनेसाठी फार महत्वाचा मुद्दाही आहे. संघटनेत स्वार्थाला, दलालीला कोणतेही स्थान नाही. पदाधिकारी म्हणून माझेच काम झाले पाहिजे असे कुणालाही वाटता कामा नये. संघटनेत येणं म्हणजे डोक्यावर ओझं घेऊन चालायचं नसतं. आपल्याला आपल्याच बांधवांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम करावयाचं आहे अशी त्यांची धारणा आहे. तुमचं काम होईल की नाही हे माहीत नाही परंतु इतरांचे काम नक्कीच झाले पाहिजे. तुम्हाला श्रम, वेळ आणि पैसाही द्यायचा आहे पण त्यासाठी कुणाला लुबाडू नका, फसवू नका असा सज्जड दम ते पदाधिकाऱ्यांना देतात. शुद्ध नितीविचारानेच संघटनेत राहायचे अन्यथा पोटात काळं आणि चेहऱ्यावर पांढरं घेऊन संघटनेत कुणी असू नये. खांद्यावर भगवा आणि शिवछत्रपतींचा आशिर्वाद घेऊन शिवसेना ज्या पद्धतीने काम करते असे निष्ठावंतच संघटनेत असावेत म्हणजे संघटनदर्शी भूमिका जोपासता येतात असे त्यांचे मत आहे.

राज्यभरात अनेक म्हणजे सतराशे साठ संघटना आहेत. या संघटनांचे महत्वाचे पदाधिकारी एकट्या नांदेड जिल्ह्यातच पायलीचे पंधरा म्हणून ठेचाळत असतात. कवडीशून्य अकलेचे काही पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे चांद्रयान आपणच चंद्रावर नेल्याच्या बढाया मारत असतात. ते कसल्याही बढाया मारत असले तरी शिक्षक सेनेचे एकटे जिल्हाध्यक्ष आणि शिक्षक सेनेचे बळ काय असते याची प्रचिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह काही सटरफटर स्वयंघोषित नेत्यांनाही आलेली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात शिक्षक सेनेचा नाद करायचा नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे संतोष अंबुलगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक शिक्षक कार्यकर्ते संघटनेत सामील होत आहेत. कारण कोणत्याही प्रश्नासाठी शेवटपर्यंत झुंज देणारे हे नेतृत्व आहे. संघटनेमार्फत एकवेळ पदाधिकाऱ्यांची वैयक्तिक कामे मागे पडतील परंतु सर्वसामान्य शिक्षकाचे किंवा सर्वांच्या हिताचे काम झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली जाते. हे संघटनेचे वैशिष्ट्यच आहे. हे निर्माण होण्याचे कारण म्हणजे आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अंबुलगेकरांनी पहिल्याच आॅनलाईन पद्धतीने झालेल्या बदल्यांच्या वेळी ज्या शेकडो शिक्षकांवर अन्याय झाला होता अशांसाठी महिलांसह सर्व पीडितांना घेऊन तब्बल ४५ दिवस जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले होते. सरांनी
ऐन दिवाळीतही कुटुंबासाठी वेळ दिलेला नाही. तसेच त्यांच्या परिवारानेही काही तक्रार केलेली नाही. एवढेच नव्हे तर एकच मुलगा आणि एकच मुलगी असलेल्या या बापाने त्या दोहोंच्याही दहावी आणि बारावीच्या वर्षात तसेच परीक्षेच्याही वेळी संघटनेचेच काम केले आहे, हे येथे आवर्जून सांगितलेच पाहिजे.

शिवसेना ज्या पद्धतीने ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या सूत्रानुसार आणि तत्वानुसार काम करते. तद्वतच हे व्रत शिक्षकसेनेनेही अंगिकारले आहे. आजपर्यंत शिक्षक सेनेने जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांच्या नेतृत्वाखाली जसे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी घंटानाद, गुरुद्रोह, लक्ष्मी कुपोषण, ढोल बजाओ, धरणे आंदोलन अशी अनेक आंदोलने केली. याबरोबरच रक्तदान शिबिरे, शालेय साहित्याचे वाटप, एक वही एक पेन अभियान, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक प्रबोधन आदी उपक्रम राबविले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येते. या व्यापक उपक्रमात तालुका कार्यकारिणी ह्यासुद्धा हिरीरीने सहभागी होतात. एवढेच नव्हे तर कोरोनाकाळातही बंदिवान म्हणून ठरलेल्या ठिकठिकाणच्या शेकडो भुकेल्यांच्या तोंडी घास भरविण्याचे कार्य अंबुलगेकरांच्याच नेतृत्वाखाली संपन्न झाले. शिक्षक सेनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. नवनवीन विविध कार्यकल्पनांच्या पार्श्वभूमीवर नव्या संकल्पना स्विकारुन त्या पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वांच्याच सहकार्याने संतोष अंबुलगेकर हे नेहमीच अग्रेसर आहेत. परंतु या कामासोबतच जिथे शिक्षक बांधवांना वा भगिनींना विनाकारण वरिष्ठांकडून त्रास होत असेल, नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असेल अशा प्रसंगी शिक्षक सेना सदैव तयार म्हणून ती उभी राहते, ह्याबद्दल हा लेख वाचणाऱ्या वाचकांनीही आजमावून पाहिले पाहिजे.

एका दशकाहून अधिक काळ अंबुलगेकर शिक्षकांच्या विविध प्रकारच्या प्रश्नांसाठी प्रशासनाशी भांडत आहेत. चकीचे निर्णय घेण्यात आल्यामुळे अनेकवेळा सर्वसामान्य शिक्षक बांधवांना फटका बसतो. अन्याय झाल्याची भावना निर्माण होते. सततचा गुरुजींना होणारा त्रास त्यांना सहन होत नाही. हे कुठेतरी थांबायला हवे असे ते म्हणतात. जिल्हाभरातून वेगवेगळ्या संदर्भात फोन येत असतात. त्यांना बोलणे व समाधान करणे पहिले कर्तव्य आहे असे ते समजतात. संघटना या अर्थाने शिक्षक सेनेच्या केंद्रस्थानी शिक्षक आहे आणि संघटनेची बांधणी आहे. संघटनेच्या माध्यमातून पतसंस्थांच्या निवडणूका लढणे एकच केवळ उद्दिष्ट नाही. निवडणूक लढविली नाही तरी चालेल पण दुसऱ्याच्या दावणीला संघटना बांधायची नाही असा त्यांचा खाक्या आहे. तरीही अनेक पतपेढ्यांच्या निवडणुकीत सहभागी झालेले आहेत. सद्या ते नांदेड जि.प. शिक्षण सहकारी पतपेढीत संचालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र कुठेही काहीही चुकीचे काम होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि शेवटपर्यंत लढण्याचा त्यांचा शास्ता अजूनही कायम आहे. त्यांनी विद्यमान सत्ताधारी मंडळाला सळो की पळो करुन सोडले आहे. आधीच्या संचालक मंडळालाही मिळालेली सर्वच वर्षे संतोष अंबुलगेकरांनी त्यांच्याविरुद्ध उघडलेल्या मोहिमेतच गेलेली आहेत. आता त्यातील जुने दोनच संचालक निवडून आले आहेत. येणाऱ्या पुढील काळात सत्तेत असलेल्या विद्यमान संचालक मंडळाने काळाची पावले ओळखून राहायला हवे आणि सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने काम करायला हरकत नाही, अशी अंबुलगेकर यांची आणि सभासदांचीही रास्त अपेक्षा आहे. अन्यथा यांचीही सद्दी संपेल अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी आहे.

शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना संतोष अंबुलगेकरांनी वाचा फोडली आहे. त्याची यादी वाचली तर वेळ आणि लिहिण्यास जागा कमी पडेल! मात्र एखाद्या मागणीचा पाठपुरावा करून ती मागणी मान्य करुन घेतली तर ‘आम्ही केलं… आम्ही केलं’ अशा दुसऱ्याच्या डोक्यावरील सन्मानाचा फेटा अगदी कोडगेपणा दाखवून स्वतःच्या डोक्यावर घालून बेशरमपणे उरबडवेपणाचा नाच करणाऱ्या संघटना हारतुरे घेऊन माळेगावच्या उचल्याप्रमाणे आधीच तयार असतात. हे जिल्हा परिषदेत अनेक वेळा घडलेले आहे.‌ शिक्षक सेनेने निवेदन दिले की मागून इतर संघटना जाग्या होतात. काही संघटनांनी तर मागण्यांचीही नक्कलच केलेली आढळली. सर्व शिक्षक संघटनांच्या मागण्या समान असणे स्वाभाविक आहे मात्र मागण्यांची रचना, आंदोलनाची पद्धत वेगळी असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना आता कळून चुकले आहे की, खरंच काम कोण करतंय आणि दुसऱ्याच्या कामाचं श्रेय कोण घेतंय!! यामुळे इतर संघटनांचा चेहरा आता पुरता फाटला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी, शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठीही शिक्षण आयुक्तांना घेराव घालण्याची ताकद केवळ शिक्षक सेनेतच आहे, हे संतोष अंबुलगेकर यांनी नुकतेच दाखवून दिले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर मार्गदर्शनाखाली आज त्यांच्या नेतृत्वाखालील ही शैक्षणिक चळवळ भरभराटीला आली आहे. आजघडीला शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाणही सोबत आहेत. त्यांच्यामुळे सुखनैव दिवस संघटनेला येणार आहेत. आजचे हे वैभव, ही भरभराट कायम राहो आणि त्यांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या औचित्याने उत्तम आरोग्य लाभो अशी मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र!

– गंगाधर ढवळे, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *