परभणी दि.३१ : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व्दारे अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत ‘नई रोशनी लोक संचालित साधन केंद्रा’ची स्थापना झाली असून या केंद्राच्या सहाव्या वार्षिक साधारण सभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अध्यक्षस्थानी श्रीमती शाहीन बेगम शेख, प्रमुख उदघाटक ‘मानव विकास’चे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी नागेश कुलकर्णी, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंझाडे, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संदिप रिढे, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ इमरान खान, केंद्राच्या व्यवस्थापक जयश्री टेहरे उपस्थित होत्या.
महिला सक्षमीकरणांतर्गत या केंद्राचे कार्य आणि कर्तृत्व अत्यंत कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे. बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेली महिलांची चळवळ अत्यंत सक्षमपणे उभी आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय व त्याचबरोबर आपला व आपल्या कुटूंबाचा सर्वांगीण विकास साधण्यास हातभार लावला आहे. सत्ता, संपत्ती व सामाजिक न्यायाबरोबर महिलांचा मानसन्मान प्रतिष्ठा वाढली आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम उभारणे तसेच ते यशस्वीरित्या कार्यान्वित करण्याचे काम या केंद्रामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे महिला विकासाच्या केंद्र बिंदू बनल्या असल्याचे माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. झिंझाडे यांनी सांगितले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. केंद्राच्या सचिव अनीसा शेख व लतिफा बी यांनी अहवालाचे व सभेपुढील विषयाचे वाचन केले. यावेळी उषा दामपुरीकर यांनी मनोगत व्यक्त केले. नई रोशनी लोक संचलित साधन केंद्रामार्फत चालू असलेल्या कामाचे डॉ. संदिप रिढे यांनी कौतुक केले व शेळी पालन व्यवसायाशी संबंधित विविध योजनांची माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्रामार्फत केंद्रातील महिलांना विविध प्रकारचे अन्नप्रक्रिया, शेळी पालन, कुकुट पालन व शेतीविषयी प्रशिक्षण दिले आहे. महिला लघु उद्योगाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. नई रोशनी केंद्राचे काम हे वाखाणण्याजोगे असल्याचे सांगून प्रा. डॉ. इमरान खान यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 22-23 मध्ये उत्कृष्ट बँक लिंकेज निवडक गट, दोन मुलीची शस्त्रक्रिया केलेल्या महिला, बचत गटाचा आधार घेऊन मुलीला एमबीबीएस केलेल्या माता व मुलगी, मानवविकास कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल जागृती वस्ती स्तर संघ आणि उत्कृष्ठ उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.
केंद्रातील सर्व सभासद महिलांना शुभेच्छा देत गेल्या वर्षी केलेल्या कामाची व पुढील वर्षात व भविष्यकालीन नियोजनाबाबत सविस्तर महिलांना श्रीमती शाहीन बेगम शेख यांनी अध्यक्षीय भाषणतून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री टेहरे यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेखा खाडे यांनी केले व आभार मिरा कराळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माविमचे अधिकारी, केंद्राचे कार्यकारिणी मंडळ, वस्ती स्तर संघातील सर्व पदाधिकारी, सहयोगीनी कविता देवस्थळे, सत्यशीला उघडे, वेणू राउत, उषा उजगिरे यांनी परिश्रम घेतले.