सोशल इंजिनिअर : मधुसुदनजी कांडलीकर

सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मथुसुदनजी कांडलीकर यांचा दि. 3 सप्टेंबर रोजी गौरव सोहळा छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केला आहे. त्यानिमित्त हा लेख प्रकाशित करत आहोत. – संपादक
…….

समाजजीवनात वावरताना आयुष्यभर माणसं रेल्वेतील प्रवासासारखी भेटतात. प्रत्येक स्टेशनवर नव्याने भेटणारी माणसं पुढच्या प्रवासात मागे उतरूनही जातात. मात्र आयुष्याच्या प्रवासात काही माणसे आपले वेगळेपण टिकवून ठेवतात. ती कायम आपल्या लक्षात राहतात, जरी आपण त्यांच्या संपर्कात नसलो तरीही… त्याच कारण असं की, त्यांनी माणूस म्हणून समाजासाठी काहीतरी दिलेलं असतं. त्यांच्या जगण्यातली वेगळी खुबी असते. असाच वेगळेपणा जोपासत सामाजिकता जपणारे इंजिनिअर मधुसुदनजी कांडलीकर आहेत.
मधुसुदनजी कांडलीकर यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील नोकरीला होते. त्यामुळे त्यांच्या वाट्याला इतर अस्पृश्यांच्या वाट्याला आलेली दु:खं आली नाहीत. त्यांचे वडील गणपतराव कांडलीकर महसूल विभागात चांगल्या पदावर होते. ते उपजिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे कांडलीकर यांचे बालपण कोणत्याही अडचणीविना गेले. पण इतर नातेवाईकांची परिस्थिती ते अनुभवतच होते. कारण भारतीय समाज जीवनाची विचित्रता कोणत्याही माणसाला माणूस म्हणून सहजपणे जगू देत नाही. ती त्याला जातीच्या चक्रात अडकवून ठेवते. त्यामुळे जातीचे चटके सहन करतच जगावे लागते. ही जात आणि आर्थिक विषमतेची दाहकता अनुभवत कांडलीकर मोठे झाले. आपल्याच जवळच्या नातेवाईकांची रोजच्या जगण्यासाठी होणारी दमछाक त्यांनी जवळून अनुभवली.
मधुसुदनजी कांडलीकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला. वडील प्रशासनात असल्याने त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. प्राथमिक शिक्षण बिलोली येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले.

 

अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८९ साली पंचायत समिती जिंतूर येथे कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. तिथेही त्यांनी नोकरी सांभाळत आपल्या परीने सामाजिक उपक्रम राबवत राहिले.
दहा वर्षांपूर्वी मला परभणी जिल्ह्यातील एक कार्यकर्ता भेटला. तो कांडलीकर साहेबांच्या आठवणी सांगत होता, ‘‘कांडलीकर हे इंजिनिअर असल्याने त्यांच्या ऑफिसमध्ये अनेक कार्यकर्ते येत असत. आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडत. ते आपल्या परीने जेवढी शक्य तेवढी मदत करत. पण यातून त्या कार्यकर्त्यांच्या समस्या सुटत नव्हत्या. उलट ते अधिक परावलंबी होत आहेत, ही बाब कांडलीकरांतील अभियंत्याने ओळखली. मग त्यांनी अशी एक योजना तयार केली की, ‘कार्यकर्ता उद्योगी बनला पाहिजे.’ कांडलीकर यांनी इतर कर्मचार्‍यांच्या मदतीने कार्यकर्त्यांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून त्यांना वेगवगळ्या स्टॉलसाठी गाड्या तयार करून दिल्या. याचे कारण असे की, दररोज त्यांच्या हाताला काम मिळेल आणि त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून स्वावलंबी बनतील. पण शेवटी कार्यकर्ते ते कार्यकर्तेच. त्यांनी गाड्या घेतल्या. आठ पंधरा दिवस चालवून बघितले आणि गाड्या विकून पुन्हा ऑफिसांच्या दौर्‍यात स्वत:ला गुंतवून घेतले.’’
आपण ज्या समुहात जन्माला आलो. त्या समुहात काही बदल घडविता येतात. ही जाणीव कांडलीकर यांना होतीच. पंचायत समितीत नोकरी करत असल्यामुळे ग्रामीण भागातील समस्या त्यांना दररोज अनुभवायला मिळत होत्या. यावर उपाय म्हणून ते शासकीय योजनांना गती देत असत. दप्तर दिरंगाई न करता तत्परतेने लोकांच्या हाती लाभ सुपूर्द करत असत. ‘ग्रामीण भागातील आवास योजना, रस्ते, समाजमंदिर, पाणी टंचाई आदी कामात मला एका सेवकाची भूमिका निभावता आली. प्रशासनातील अधिकाराचा वापर लोकहितासाठी करता आला, याचा आनंद आहे. कारण या कामाच्या माध्यमातून मला अनेक वंचितांना मदत करता आली’, असे ते मोकळेपणाने सांगतात.

 

माझ्या स्वभावातील अडचणीने मी इतरांसारखा कायम रेंजवर राहत नाही. कायम आऊट ऑफ कव्हरेज राहतो. कधीतरी कांडलीकर यांच्याशी माझा संवाद होतो. पण त्यावेळी त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. त्यातून महत्त्वपूर्ण सूचना होतात. मी एका केलेल्या अपात्री दानाच्या संदर्भाने त्यांचीशी बोललो. ते मला म्हणाले, ‘‘तुम्हाला बदलच हवा असेल तर तो शाश्वत असावा. कारण वेगवेगळी कारणं सांगून मदत मागणारा माणूस संपूर्णपणे बदलून वागत नाही, ही त्याची सवय होते. ही सवय मोडून तो माणूस म्हणून जगण्यासाठी धडपडला पाहिजे, अशा ठिकाणी मदत कर. म्हणजे ती त्याचे आयुष्य बदलवण्यासाठी उपयोगी पडेल आणि तुम्हालाही पश्चाताप होणार नाही.’’
सामाजिक उपक्रमासाठी त्यांच्याकडे येणारे अनेक कार्यकर्ते मी पाहिले आहेत. कार्यक्रमासाठी थोडीशी मदत करून स्वत:ला मिरवूण घेणारे अनेक अधिकारी आहेत; पण यास कांडलीकर साहेब अपवाद आहेत. वडील उपजिल्हाधिकारी, स्वत: कार्यकारी अभियंता असतानाही त्यांच्या जगण्या-वागण्यात ‘आम्ही कोणीतरी वेगळे आहोत’ हा थोडाही अहंकाराचा लवलेश दिसत नाही. सहजपणे सामान्य माणसांप्रमाणे ते जगताना दिसतात.
माझ्या प्रकाशन संस्थेच्या ऑफिससाठी गाळा भाड्याने ठरला. डिपॉझिट दिलं. मग आडनावामुळे शेवटी गाळा मालकीणीने मला जात विचारली. त्यावेळी मी तो व्यवहार रद्द केला. ही गोष्ट मी कांडल्ाीकर साहेबांना सहज बोलताना बोललो. त्यावेळी त्यांनी फारच मोलाचं मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, ‘एखादा प्रसंग कोणत्या अवस्थेत घडतो? हे अगोदर तपासायचे. त्याच्या कोणकोणत्या बाजू मजबूत आणि कोणत्या कमजोर आहेत, हे लक्षात आल्यावर निर्णय घ्यायचे. प्रत्येक वेळी भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात. तुला गाळा न देण्याचे हेही कारण असू शकते. म्हणून त्यांनी काही निवडक प्रसंग माझ्यासमोर ठेवले.’ त्या प्रसंगाचा तर मीही साक्षीदारच होतो. त्यामुळे झापडबंद जगण्यातला एक अडथळ्याचा पडदा कायमचा दूर करता आला.
संविधानिक हक्काने अधिकारी झालेले अनेक माणसे आयुष्यभर अधिकारीपणाच्या तोर्‍यात जगत आले.

 

म्हातारपणी मुलांच्या लग्नाच्या अडचणी आल्या त्यावेळी समाजकारणात मिसळताना मी पाहिले आहे. तेव्हा कांडलीकर साहेबांच्या जगण्यातून एक मेसेज मिळतो की, ‘पदं ही काही जन्मभर चिटकून राहणारी बाब नाही. पण कृती आणि तुमचा लोकसंपर्क जीवनाला पुरून उरतो.’ म्हणून ते छोट्या छोट्या उपक्रमातही सहभागी होतात. समाजाच्या कार्यक्रमात ते पूर्ण वेळ थांबतात.
एकदा मी त्यांना म्हणालो, ‘कार्यकर्त्याने अधिक आक्रमक असावे की, अधिकार्‍यांनी?’
ते म्हणाले, ‘सामाजिक अन्यायाविरोधात कार्यकर्ता तर प्रशासानातील योजना वंचितांपर्यंत पोहोचविण्यात अधिकारी आक्रमक असावा लागतो. बदल हा काही एका दिवसात घडत नाही. मानवी मन हे मानसिकरित्या गुलाम असते. ती गुलामी दूर करण्यासाठी त्याला मानसिक, बौद्धिक आणि आर्थिक पातळीवर सक्षम बनवावे लागते. तेव्हा कुठे बदल दिसतात. कायम आक्रमक राहून फार काही बदल घडत नसतात. समस्यांचे मूळ शोधले आणि ते नष्ट झाले तरच अपेक्षित बदल दिसतात.’

 

स्वत:ची दोन मुले आयआयटी झाले आहेत. ती देश-विदेशात आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत. त्याचा तोरा ते कधीच मिरवत नाहीत. इंजिनिअर म्हणून जिंतूरपासून सुरुवात झालेली त्यांची कारकीर्द कधीच वादग्रस्त ठरली नाही. ते कामय सयंतपणे प्रत्येक प्रकरण हाताळतात. कारण त्यांची एक धारणा राहिली की, ‘कुणीही अंगावर यावे, अशी कामेच करायची कशाला? आपल्या अधिकारात जेवढे आहे, तेवढे करावे. यातून सामाजिक विस्कटलेली घडी आपल्या परीने चांगल्या पद्धतीने नीट करता येईल ती करावी.’
कांडलीकर साहेबांच्या वडिलांची चार पुस्तके मी माझ्या प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशित केली.

यानिमित्ताने अधिक त्यांच्या जवळ जाता आलं. चांगली माणसं सहवासात आली की, जगण्यात बरंच शिकता येतं. ज्या ज्या वेळी भेट होते, त्या त्या वेळी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विषयांवर चर्चा होत असते. शिक्षण, आरक्षण आणि सत्ता याबद्दलही त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. आरक्षणाचे लाभार्थीच संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी फटकून वागतात, ही सल त्यांनी अनेकदा मला बोलून दाखविलेली आहे. ज्यांनी लाभ घेतले त्यांनी तरी किमान कृतज्ञता ठेवली पाहिजे, ही त्यांची नितळ भावना आहे.
१९८९ साली कांडलीकर सरांनी नोकरीस प्रारंभ केला. तिथे त्यांनी १९९७ पर्यंत कार्यरत राहिले. १९९९ साली जिल्हा परिषद बांधकाम विभाग, परभणी येथे उपअभियंता पदावर पदोन्नती मिळाली. डिसेंबर १९९९ साली उपअभियंता, मार्ग प्रकल्प उपविभाग, परभणी. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, परभणी येथेच कार्यकारी अभियंता पदाचा यशस्वी पदभार सांभाळला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग परभणी २००३-२००५ साली कार्यरत होते.

परभणी येथे ‘बानाई’ या इंजिनिअर्सच्या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी सांभाळले. यासोबत लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघातही ते कार्यरत राहिले. या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्य त्यांनी केले आहे. याबद्दल ते जाणीवपूर्वक समाधान व्यक्त करतात. सार्वजनिक बांधकाम उपविभाग मंठा येथे २००५-२००८ त्यांनी पदभार सांभाळला. सार्वजनिक बांधकाम उपविभाग जाफराबाद २००८-२००९, सार्वजनिक बांधकाम उपविभाग घनसावंगी २००९-२०१२, सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिल्लोड, २०१२-२०१५, सार्वजनिक बांधकाम उपविभाग भोकरदन २०१५-२०१६, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई २०१६-२०१८, २०१८ साली कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नतीवर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन लातूर येथे रुजू झाले. तिथे तीन वर्षे म्हणजेच २०२१ पर्यंत कार्यरत राहिले. त्यानंतर बदली होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन जालना येथे रुजू झाले. प्रशासनातील या जबाबदार्‍या त्यांनी अत्यंत आनंदाने पार पाडल्या. या ३४ वर्षांच्या दीर्घ प्रवासात त्यांना नोकरीच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांशी संवाद साधता आला. भेटता आले. यातून काही सामाजिक कामे तडीस नेता आली, याचे मानसिक समाधान वाटते.
आजच्या जाहिरातीच्या काळातही तत्त्व आणि सत्त्व सांभाळून जगणार्‍यापैकी कांडलीकर आहेत. त्यांचा माझा जवळपास वीस वर्षांचा सहवास आहे. या सहवासात अनेक बाबी शिकता आल्या. एक सयंत सामाजिक इंजिनिअर जवळून अनुभवता आला. ते नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या नव्या कारकीर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा! यासोबत ते जरी ‘रिटायर’ झाले असले तरी त्यांचे सामाजिक परिवर्तनासाठी विचाराचे ‘टायर’ पुढील अनेक वर्षे चालणारे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून निश्चितच ‘शाश्वत रस्ता’ नव्या पिढीला मिळेल, ही अपेक्षा!

 

वैजनाथ वाघमारे
शब्दवेध बुक हाऊस (प्रकाशन)
छत्रपती संभाजीनगर
मो- ८६३७७८५९६३ / ७७५८९४१६२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *