(आज श्रावण वद्य पंचमी दि.०४ सप्टेंबर २०२३ वैराग्यशीळ संत मोतीराम महाजांचा पुण्यतिथी दिन.त्या निमित्त त्यांच्या विचारांचा मांडलेला हा शब्दजागर.)
मानवी जीवन अनमोल आहे.हे ज्यांना कळाले त्यांनी अल्पकाळात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी केली. इतिहासात ते अजरामर झाले. आपला देश विविधतेने नटलेला आहे.या देशात प्रत्येक राज्यांचे एक वेगळेपण जाणवते. महाराष्ट्र राज्य हे विशेषत्वाने संतभूमी म्हणून ओळखले जाते. येथे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर,संत सोपान देव,संत मुक्ताबाई,संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ,संत तुकाराम, संत चोखोबांपासून संत निळोबा पर्यंत अनेक संत झाले. त्यांनी तेराव्या शतकात खऱ्या अर्थाने अध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. या संत मांदिआळीत मराठवाड्यातील संतांमध्ये संत गोरोबा कुंभार, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत माधव बाबा सारखे संत होऊन गेले. या परंपरेतील एक अग्रगण्य वैराग्यशीळ संत म्हणजे संत मोतीराम महाराज होत.
संत मोतीराम महाराजांचा जन्म मारवाडी समाजात खंडाळी रोकडोबा या गावी झाला.नंतर त्यांच्या परिवाराने तेथून गंगाखेड येथे स्थलांतर केले व तेथे राहू लागले.महाराजांच्या अंगात लहानपणापासूनच वैराग्य जाणवत होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे म्हणणे एका अर्थाने खरेच निघाले. उदर निर्वाहासाठी त्यांनी आपले मेव्हुणे यांच्या भांड्याच्या दुकानात काम करण्यास प्रारंभ केला.बरेच ग्राहक तेथे येत असत.त्यापैकी अनेकजण गरीब असत.आर्थिक अडचणीमुळे उधारीवर साहीत्य घेऊन जावयाचे. मेव्हुणे त्यांना उधारी मागायचे,उधारी नाही दिल्यावर त्यांना उतरून बोलणे एवढेच नाही तर त्यांच्या अंगावर मारायला धावणे, प्रसंगी मारणे असे वागत असत. संतत्व वृत्तीच्या महाराजांना असे मेव्हुण्याचे वागणे पसंत पडले नाही. महाराज या घटनेमुळे व्याकुळ झाले.त्यामुळे त्यांनी ते काम सोडून दिले.नंतर भावाकडे गंगाखेडला ही राहिले.तिथे ही भावाची पत्नी कमी अधिक बोलल्यामुळे त्यांचे तिथे राहण्यास ही मन लागले नाही. कारण मुळातच महाराजांचा स्वभाव वैराग्यशीळ होता.पुढे त्यांनी लोहगाव जि.परभणी येथे निवृत्ती ठाकूर बुवा यांची भेट घेतली व अध्यात्मिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. गुरु ठाकूरबुवा यांनी त्यांना गुरु दीक्षा दिली. गुरुकृपा लाभली. त्यामुळे अंगी असलेले वैराग्य अधिक बळकट झाले. पुढे गुरुबरोबर त्यांनी पंढरपूर आळंदीच्या आषाढी कार्तिकी वाऱ्या सुरू केल्या.एक वेळेस गुरु बरोबर पंढरपूरला असताना अचानक गुरूंची तब्येत बिघडली. तेंव्हा सर्वजण चिंतेत पडले की आजचे कीर्तन कोण करणार ?असा विचार करू लागले. त्यांनी गुरुमाऊलींना या विषयी विचारणा केली तेंव्हा त्यांनी सांगितले की आज माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी तर कीर्तन करणार नाही पण माझ्या जागेवर मोतीराम आज कीर्तन करेल.महाराजांना गुरुचे हे शब्द ऐकून काही सूचेना की आता काय म्हणावे! पण गुरु आज्ञा व गुरुकृपेमुळे त्यांनी त्या दिवशी कीर्तन केले. गुरु प्रसन्न होऊन म्हणाले ‘खूप छान, आता यापुढे जन उद्धारासाठी तु कीर्तन करत राहा. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तिथून पुढे महाराजांनी जो परमार्थ आरंभीला तो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. हा परमार्थ त्यांनी कुठलाही स्वार्थ ठेवून केला नाही.तर त्यात पूर्णपणे निस्वार्थ भावना होती. परमार्थ करताना सात्विक अन्नाच्या सेवनाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आल्याने ते वैष्णवा घरीच जेवायचे. पुढे पुढे तर त्यांनी प्रत्येक गावात एका वैष्णवांच्या घरी येऊन सीधा घेऊन स्वतः स्वयंपाक बनवून जेवायला प्रारंभ केला. हे करताना अन्ना बाबतीत ही वैराग्यशीळपणा त्यांच्या अंगी बानवला. त्यांच्या वैराग्याबद्दल अनेक प्रसंग सांगितले जातात. असे सांगतात की दिग्रस जी.परभणी येथे सप्ताहाला आले असता तेथे गंगेवर आंघोळीला गेले असता. त्यांनी अंगात घालायची बंडी काढून ठेवली होती. कोणीतरी त्यांच्या बंडीत पाच रुपयाची नोट ठेवली. हे त्यांना माहिती नव्हते. जेंव्हा ते आंघोळ करून आले तेंव्हा त्यांनी दुरुनच ओळखले की बंडीत काही तरी गडबड आहे.ते एकदम रागावले व म्हणाले अरे,माझ्या कपड्यावर कोणीतरी घाण केली आहे. शिष्य मारोतराव महाराजांना बघायला सांगितले, मारोतराव महाराजांनी खिशात पाहिले तर पाच रुपयाची नोट असल्याचे आढळून आले.तेंव्हा मारोतराव महाराज म्हणाले गुरुवर्य, घाण काही नाही, ही पाच रुपयाची नोट सापडली आहे.तेंव्हा त्यांना मोतीराम महाराज म्हणाले अरे मारुती, ही नोट म्हणजेच घाण आहे. म्हणून जळतन आणायला लावले त्यात बंडी पैश्याला बाटली म्हणून जाळून टाकली. असेच एक देहाच्या संबंधाने वैराग्यशीळतेचे उदाहरण दिले जाते.ते असे की एकदा ते कीर्तनासाठी नेहमी घोड्यावरून जात असत.एकदा घोड्यावर चढताना त्यांच्या पायाला रिकीम लागली व जखम झाली. काही दिवसांनी त्या जखमेत आळ्या झाल्या. कोणीतरी त्यांना आळ्या काढण्याचा सल्ला दिला, तेंव्हा ते म्हणाले हे माझे लेकर आहेत मी त्यांना मारणार नाही. म्हणून त्यांच्यासाठी खाद्य ठेवले व पायाला पट्टी बांधून घेतली. जणू त्यांनी ‘देहाच्या उदासे l पाविजे या ठाया ‘ हे वैराग्य दाखवून दिले. त्यांचे आयुष्यात असे कितीतरी प्रसंग आले.
त्या काळात दळणवळणाची व्यवस्था नसताना ही घोडा, बैलगाडी तर कधी कोसो दूर पायपीट करून ‘नाचू कीर्तनाचे रंगी lज्ञानदीप लावू जगी ll हे काम निस्वार्थपणे केले. ज्या काळात सर्वत्र अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता,प्राण्यांची शिकार करणे या अवगुणांनी समाज पुरता ग्रासला गेला होता. अस्या काळात समाजात संतांचे विचार पेरण्याचे महत कार्य महाराजांनी केले. तसेच व्यसनाधीन झालेल्या माणसांना व्यसनापासून मुक्त केले. शिकारीद्वारे प्राणीहत्या करुन जिभेचे चोचले पुरविले जात होते.ते त्यांनी बंद केले आणि गावात सप्ताह प्रारंभ करून परमार्थ महाधन प्रत्येकाच्या पदरी टाकण्याचे महत्त कार्य त्यांनी केले. यासाठी त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यावर त्यांनी मात करून ‘बुडत हे जन l न देखवे डोळा l येतो कळवळा म्हणोनिये ll या संतोक्तीप्रमाणे काम केले.यासाठी त्यांनी आयुष्यभर नैष्ठीक ब्रह्मचर्य पाळले. कुठलाच मोह त्यांनी आयुष्यात बाळगला नाही की मठ मंदिराची स्वतःसाठी उठाठेव केली नाही. गावकऱ्यांच्या मदतीने अनेक गावांच्या मध्ये सार्वजनिक मंदिरांची उभारणी केली. त्यांच्या सहवासात आलेले अनेक वाल्या वाल्मिकी झाले.आमच्या भागात माझे गाव देवकरा व पंचक्रोशीतच नव्हे तर मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात त्यांनी परमार्थाची पेरणी केली.त्यांचे पीक आज जोमाने आलेले पहावयास मिळते आहे. या कामी मोळवण ता. अहमदपूर येथील संत माधव बाबा, त्यांचे शिष्य संत मारोतराव मारोतराव महाराज,पुढे सोपान काका इसादकर, ज्ञानोबा माऊली महाराज आरबुजवाडीकर यांनी ही परंपरा प्रामाणिकपणे पुढे चालवली. म्हणून आज आमचा भाग अध्यात्मिक क्षेत्रात सुजलाम सुफलाम झाला आहे. आमच्या देवकरा या गावी संत मोतीराम महाराज सतत सात दिवस राहायचे.त्यानंतर त्यांचे शिष्य मारोतराव महाराज यांनी देखील ही परंपरा सुरू ठेवली. या दोन्ही महात्म्यांच्या प्रत्यक्ष सहवास गावाला लाभल्यामुळे आज गावाचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला पाहावयास मिळतो. संत विचारामुळे ज्ञानाची गोडी लागली आहे.वारकरी संप्रदायाच्या संस्कारामुळे अनेकजण व्यसनापासून परावृत्त झाले व त्यांनी आपली मुले शिकविली आहेत.आज आमच्या भागात ज्यांनी ज्यांनी वारकरी संप्रदायाचा महामंत्र उरासी बाळगून प्रामाणिक वागले त्यांची मुले मोठमोठ्या पदावर गेलेली पहावयास मिळतात व ते ही प्रामाणिकपणे सांगतात की आम्ही या संतविचारांमुळे घडलो आहोत.
मोतीराम महाराजांनी एका अर्थाने मृत्यूची तिथी सांगूनच देह ठेवला.श्रावण वद्य पंचमीला गुरुवार या पवित्र दिवशी सप्ताह प्रारंभ करून आपल्या गुरुच्या उपस्थितीत हरिपाठ सुरू असताना ईश्वर व गुरुचे नामस्मरण करून पवित्र गोदा तटावर मौजे फळा ता. पालम जि.परभणी या ठिकाणी देह विसर्जन केले.आज या घटनेला ५९ वर्षे होत आहेत. त्यानंतर अनेक गावात त्यांच्या शिष्यांनी समाधी बांधल्या. यात पिंपळदरी ता. गंगाखेड व आमचे गाव मौजे देवकरा ता. अहमदपूर, कातकरवाडी जी.बीड या गावीही महाराजांची समाधी असून प्रत्येक वर्षी त्यांचा पुण्यतिथी सोहळा पंचदिवशी कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जातो.यासाठी आमच्या ग्रामस्थांमध्ये स्पर्धा असते की महाराजांच्या या पुण्यतिथीच्या पंचदिवशी कार्यक्रमाची जबाबदारी आम्ही पार पाडतोत. पुढील 25 वर्षाच्या कार्यक्रमाचे नारळ घेवुन तारखा आरक्षित झाल्या आहेत.
यावर्षी हा पुण्यस्मरण सोहळा आमच्या गावचे परमार्थ प्रेमी बाबुराव रामराव बदने व त्यांचे सुपुत्र बॅंक मॅनेजर अरविंद बाबुराव बदने व प्रसिद्ध किडनी स्पेशलिस्ट डॉ.अविनाश बाबुराव बदने हे विविध कार्यक्रमांनी संपन्न करत आहेत.याच कार्यक्रमात आई प्रतिष्ठान कडून जागतिक कीर्तीचे प्लाॅस्टीक सर्जन डॉ.विठ्ठलराव लहाने यांच्या ग्रामविकासात यूवकांची भुमिका या विषयावर दि.०३ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३०वाजता व्याख्यानाचे आयोजन मौजे देवकरा येथे करण्यात आले आहे.गावचे सरपंच प्रतिनिधी कल्याण बदने यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
अशा या वैराग्यशीळ महात्म्यावर जेवढे लिहावे तेवढे कमी आहे.त्यांचा आशीर्वाद माझ्यासह सर्व भाविकांना लाभावा या अपेक्षेसह त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना साष्टांग दंडवत घालून.मी माझा शब्दजागर थांबवितो.
प्रा.डॉ.रामकृष्ण बदने
मौजे देवकरा ता.अहमदपूर
जि.लातूर
भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५