बाॅलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री आता कुप्रसिद्ध होऊ लागली आहे. तिच्या बिनडोकपणाच्या ट्विट्समुळे चौफेर टीकेची धनी ती बनली आहे. सौंदर्याला विवेकाचा शापच असतो, हे तिच्या बेताल विधानामुळे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. ठिकठिकाणी तिच्या वादग्रस्त विधानांमुळे पोस्टरला जोडे मारुन नंतर जाळण्याचे आंदोलन झाले. महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी शिवसेनेच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. तिच्या व्यक्तव्यानंतर राजकीय नेत्यांसह सेलिब्रेटींनीही तिच्यावर टीकेची झोड उठवली. यानंतर कंगना राणौतला उपरती झाली आणि एक ट्विट मुंबई माझी कर्मभूमी, तिने मला यशोदामाईसारखं सांभाळले, असे म्हणत मुंबईबाबत आपले प्रेम दाखवून देण्याचा प्रयत्न केला. जय मुंबई, जय महाराष्ट्र! असा नारा तिने दिला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही तिची स्पष्ट शब्दांत कानउघाडणी केली, तर नेटिझन्सनी सोशल मीडियातून तिच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केले. त्यातूनच आपलीच वक्तव्ये आपल्याला अडचणीत आणत आहेत, याची जाणीव झाल्यामुळे, तिने जय मुंबई आणि जय महाराष्ट्र, असा नारा ट्विट करून दिला असावा, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. मुंबईचे वर्णन तिने यशोदामातेशी करून, आपण आधीची वक्तव्ये मागे घेत असल्याचे सूचित केले आहे, असे बॉलिवूडमधील मंडळींना वाटत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत टिकायचे, तर मुंबईखेरीज पर्याय नाही, कदाचित याची तिला जाणीव झाली असावी.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर चांगल्याच आक्रमक झालेल्या कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सध्या तुंबळ शाब्दिक लढाई जुंपली आहे. त्यात कंगनाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा समोर आला आहे. याप्रकरणी खा. संजय राऊत यांनी कंगनाने मुंबईत येऊ नये तसेच राहू नये म्हटले. यावर राऊत मला धमकी देत असल्याचा तिने कांगावा केला. येत्या ९ सप्टेंबर रोजी मी मुंबईत येणार आहे कोणाची हिंमत आहे मला कोण आडवतय मी पाहते असे जाहीर आवाहन ह्या कंगनाने प्रशासनाला केले, यावरुन तिचा मस्तवालपणा दिसून येतो. किंबहुना तिचा बोलविता धनी कुणी दुसराच आहे याचीही शंका येते. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईवर टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले होते. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले. तर कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनीही या वादावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया दिली असून, मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी कंगना राणौत हिची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली.
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादावर अमृता फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, ‘आपण एखाद्याच्या मताशी सहमत असू शकत नाही. मात्र तरीही आपण लोकशाहीने दिलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे हे काही योग्य नाही.’ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही कंगनाची पाठराखण केली. त्यांनी आरपीआय तिला संरक्षण देणार असल्याचे जाहीर करताना सत्ताधारी शिवसेनेलाही सुनावलं. लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणावतने मुंबईवर टीका केली नसून राज्यसरकारवर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना यांनां भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगनाला संरक्षण देईल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले. याआधी दस्तुरखुद्द ना. आठवले यांनी आरपीआयला काहीच अस्तित्व उरलेले नाही असे वक्तव्य केले होते. पण या दोघांनीही राजकीय चष्म्यातून पहात महाराष्ट्राच्या अस्मितेला ललकारल्याचा मुद्दा सपशेल बाजूला सारला आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी १०६ जणांनी हौतात्म्य पत्करले त्यांचाही अपमान झाला आहे. मुंबईमध्ये राहून करोडो रुपये कमवायचे नावारूपास यायचे व त्याच महाराष्ट्राला व मुंबईला ट्रक माफियाच्या जवळीक ठेवून बेताल वक्तव्य करायचे. मस्तवाल कंगना राणावत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून वेळीच कारवाई करावी अशी मागणी करतांनाच
भाजपचे आमदार राम कदम हे कंगना राणावत यांचे मानलेले भाऊ आहेत. त्यांनी कंगना राणावत यांची पाठराखण केली असून महाराष्ट्र व मुंबईची बदनामी करून सामाजिक शांतता बिघडवण्याचे हे षडयंत्र आहे. या कृतीची दखल घेऊन शासनाने व विधानसभा अध्यक्षांनी राम कदम यांच्या सदस्यत्वाच्या बाबतीत कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा अशीही मागणी शिवसेनेने केली. या सगळ्यात कंगना विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा रंगला आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून अभिनेत्री कंगणा राणावत हिने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी दत्त चौकात घोषणाबाजी करीत कंगणाच्या वक्तव्याचा निषेध केला.
शिवसेनेच्या या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कंगणा राणावतचे चित्र असलेल्या फलकाला चपलेने बदडून व ते फलक पायदळी तुडवून निषेध नोंदविण्यात आला. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य केल्यावरूनही कंगणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईसाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यायला हवे. माझे कंगना राणौत हिच्यासोबत व्यक्तिगत भांडण नाही, असे खा. राऊत यांनी म्हटले ते रास्तच आहे. महाराष्ट्राचा अपमान करणारा कुणीही असेल कितीही मोठा असेल. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, याचे भान ठेवून बोलणे गरजेचे आहे. मुंबई, महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही. मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचे कृत्य हे अत्यंत गंभीर आहे. हा मुद्दा फक्त शिवसेनेचा नाही आहे तर हा विषय महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. या वादात शिवसेना, मनसे पाठोपाठ आता महाराष्ट्र करणी सेनाही उतरली आहे.
कंगना राणौतने मुंबईची माफी नाही मागितली तर आम्ही कंगना राणौतच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू, असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेचे अजयसिंह सेंगर यांनी दिला आहे. कंगनाच्या वक्त्तव्यावर संताप व्यक्त केला. कंगना सारख्या प्रवृत्तीनेच आतंकवाद पोसला आहे. कंगना राणौतने मुंबईबाबत केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यामुळे तिने तात्काळ मुंबई आणि मुंबईकरांची माफी मागावी असे सेंगर यांनी म्हटले. याचबरोबर, कंगना राणौतने मुंबईची माफी नाही मागितली तर तिला राज्यात कुठेही शुटींग करू देणार नाही. करणी सेनेने पद्मावतीचा सेट जसा जाळून टाकला, त्याचप्रमाणे कंगना राणावतच्या सिनेमाचे सेट जाळून टाकला जाईल, असा इशाराही सेंगर यांनी दिला. याशिवाय, महाराष्ट्र ही कंगनाची कर्मभूमी आहे. तिच्याबद्दल कृतज्ञ असायला हवं. पण त्याऐवजी मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली जाते. त्याबाबत कंगनाला लाज वाटली पाहिजे. जे भाजपाच्या पोटात आहे, तेच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणौतच्या मुखातून आणि ट्विटमधून बाहेर येत आहे. कंगनाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत. कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे, असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे. ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना राणौतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्याच मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. कंगनाने केलेल्या एकाही वक्तव्याचा भाजपाने निषेध केला नाही. त्यांचे मौन हेच त्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवत आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा मुद्दाही राजकीय करुन त्याचा लाभ उठवण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे.
” महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही मंडळी अस्वस्थ आहेत. हे सरकार कोणत्याही मार्गाने खाली खेचायचे यासाठी मागील नऊ महिन्यापासून या लोकांनी सर्व उद्योग करुन पाहिले. सुरुवातीला राजभवनच्या आडून सरकार अस्थिर करण्याचे उद्योग केले, त्यात त्यांना यश आले नाही. कंगणासारख्या अभिनेत्रीला हाताशी धरुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम केले आणि आता तर या मंडळींची मजल मुंबईला पाकव्यात काश्मीर म्हणण्यापर्यंत गेली. भाजपाला ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आहे, ना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल, त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायची आहे, पण त्यांना कदापि यश येणार नाही, असा बाळासाहेब थोरात यांचा दावा आहे.भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले की कंगना राणौतने मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही. आशिष शेलार यांनी हे अधिक आक्रमकपणे बोलले पाहिजे, हा महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एका पक्षाचे नाही, एका जातीचे नाहीत तर देशाचे आणि महाराष्ट्राचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दांत टिप्पण्णी करत असेल तर विषय एका राजकीय पक्षाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, अशी खा. राऊतांनी शेलारांची कान उघाडणी केली.
शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगना रानौतला सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, असे असले तरीही कंगना रानौत यावर थांबली नाही. तिने यापुढेही ट्विट करणे सुरुच ठेवले. महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही. मराठीच्या गौरवाला ज्यांनी प्रतिष्ठित केले, महाराष्ट्र त्यांचाच आहे. मी मराठा आहे आणि हे मी निक्षूणपणे सांगते. जे करायचंय ते करा”, असा इशारा तिने ट्विटरवर दिला आहे. याचबरोबर, “यांची लायकी नाही. गेल्या शंभर वर्षात मराठ्यांचा इतिहास सांगणारा एकही चित्रपट तयार केला नाही. मी इस्लाम डॉमिनेटेड इंडस्ट्रीमध्ये माझा जीव आणि करिअर पणाला लावलं. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनवला. आज महाराष्ट्राच्या ठेकेदारांना विचारा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?”, असा सवाल कंगना रानौतने उपस्थित केला.
हिंदी चित्रपटसृष्टीत मी सर्वातआधी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट तयार केला आहे, हे चापुलसी करणारे, महाराष्ट्राप्रती प्रेम असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. मी चित्रपट तयार केला त्यावेळीदेखील या लोकांनी मला विरोध केला होता”, असेही कंगना रानौतने म्हटले. बॉलीवूडला मराठा अभिमान नाही आणि मुस्लिम प्रभाव हे त्याचे कारण आहे, असे वादग्रस्त विधान करून तिने झाशीच्या राणीवर चित्रपट सर्वात आधी आपण केला, असे म्हटले होते. पण झाशीच्या राणीवर आधीच दोन हिंदी चित्रपट आले होते. त्यापैकी एक सोहराब मोदी यांनी १९५३ साली तयार केला. त्यात राणीची भूमिका मेहताब या मुस्लिम अभिनेत्रीने केली होती. याशिवाय शिवाजी महाराज, तानाजी, संभाजी महाराज यांच्यावर हिंदी तसेच मराठीत अनेक चित्रपट आले आहेत आणि टीव्ही मालिकाही तयार झाल्या आहेत. त्यामुळे मराठी अभिमानाचा तिचा मुद्दा आणि दावाही खोटा ठरला आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने कंगनाचे बेताल ट्विट फारसे लक्ष देण्यासारखे नाही. परंतु तिचा टिवटिवाट थांबायलाच तयार नव्हता. ती बेछुटपणे आरोप करीत सुटल्यामुळे राजकीय पक्ष यात उतरले. उटसूट कुणीही काहीही बोलायला, लिहायला लागला तर महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. महाराष्ट्रातील लोकांनी आपल्या मराठी मातीसाठी रक्त सांडल्याचा इतिहास आहे. तो कुणीही विसरलेला नाही. इथला मराठी माणूस जशास तसे उत्तर देणारा आहे. हे तमाम भारतीयांनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रात येऊन कुणीही आपली दीड अक्कल पाजळू नये. कितीही मतभेद असले तरी अस्मितेच्या मुद्यावर मराठी माणूस एकजूट दाखवतोच. मुंबई, महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही अशी भाषा इकडे चालत नाही. मुंबई, महाराष्ट्र मराठी माणसाच्याच बापाचा आहे. मराठी माणसाने आपल्या महाराष्ट्रावर आपले नाव कोरले आहे. उपऱ्यांनी इथे येऊन शहाणपणा शिकवू नये. कारण
इथे डोक्यावर घेऊन नाचणारेच तुम्हाला आसमान दाखवितात. त्यामुळे महाराष्ट्राकडे वाकडी नजर करुन पाहणाऱ्याची हिम्मत नाही. ती हिम्मत एखाद्या अक्कलवंतानेही केलीच तर त्याला कोणती फळे चाखावी लागतील हे त्याला माहीत नसेल तर महाराष्ट्राच्या इतिहासाला प्रामाणिकपणे विचारुन घ्यावे. बाहेरच्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवतांनाच एक नारा लक्षात ठेवायला हवा- जय महाराष्ट्र!
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
०६.०९.२०२०