नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर ; अशोकराव चव्हाण यांचा पाठपुरावा यशस्वी

 

नांदेड, दि. १६ सप्टेंबर २०२३:

नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्याची मागणी अखेर मंजूर झाली असून, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी ठरल्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करताना डी. पी. सावंत म्हणाले की, परभणी कृषी विद्यापिठाद्वारे संचलित एकही संस्था नांदेडला नाही. नांदेड जिल्हा आकाराने मोठा जिल्हा असून, येथे मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नियमित पिकांसह फळफळावळ व फुलांचे उत्पादन घेतले जाते. केळी आंबा, चिकू, मोसंबी, हळद, फुलशेती तसेच भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

 

त्यामुळे नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने कृषी शिक्षणाकडे ओढा होता. मात्र, कृषी अभ्यासक्रमच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी त्यापासून वंचित रहात होता. त्यामुळे नांदेडचा कृषी अनुशेष भरून काढण्यासाठी नांदेड येथे शासकीय कृषि महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मागणीसाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे आग्रही पाठपुरावा केला.

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिल्यानंतर केवळ मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता शिल्लक राहिलेली होती.

 

दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. मात्र, त्यानंतरही अशोकराव चव्हाण यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला. छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नांदेडच्या शासकीय कृषी महाविद्यालयाला मान्यता देण्याची मागणी केली.

 

अखेर अशोकराव चव्हाण यांचे प्रामाणिक प्रयत्न आज फळास आले असून, यामुळे नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असल्याची प्रतिक्रिया डी. पी. सावंत यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *