मारोती मामा गायकवाड  यांच्या कंधार रास्तारोको आंदोलनाला मोठे यश:शंभर फुटाचाच रस्ता होणार ..! दिले लेखी आश्वासन

कंधार नपच्या अतिक्रमणातील शॉपिंग सेंटरवर सार्वजनिक बांधकाम विभागाचा पडणार हातोडा !

(कंधार ; प्रतिनिधी )

          कंधार शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता शंभर फुटांचा करण्यात यावा व साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय ठिकाणी बसविण्यात यावा यासाठी मारोती मामा गायकवाड कंधारकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१८ सप्टेंबर रोजी डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला मोठे यश आले असून नगरपरिषदने अतिक्रमणात बांधलेले शॉपिंग सेंटरवर सार्वजनिक बांधकाम विभागाचा हातोडा पडणार असून आता हा रस्ता शंभर फुटाचाच होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी पत्राद्वारे रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांना आश्वासन दिले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
           कंधार शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल या रस्याच्या संदर्भात हा रस्ता किती फुटाचा होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच या रस्त्यावर असलेले नगरपरिषदचे शॉपिंग सेंटर अबाधित ठेवण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला होता.त्यामुळे या रस्त्याच्या कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा रस्ता शंभर फुटाऐवजी साठ फुटाच्याच कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.परंतू या संदर्भात काही दिवसांपूर्वी माजी सैनिक संघटनेच्या वतीने शंभर फुटांचा रस्ता व्हाव यासाठी उपोषण करण्यात आले होते.त्यानंतर मामा गायकवाड कंधारकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१८ सप्टेंबर रोजी डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर रास्तारोको करण्यात आले.

          आदोलनकर्त्यांची आक्रमकता पाहून व शासनाच्या नियमांचे परिपत्रकान्वये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता शंभर फुटांचा करण्याचे लेखी आश्वासन कनिष्ठ अभियंता अजय चमकुरे यांनी दिले आहे.परंतू सध्या साठ फुटाचा रस्ता करण्यासाठीचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे.सदर काम दि.२१ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.पऱतू आंदोलनाची दखल घेत हा रस्ता शंभर फुटांचा करण्यात येण्याचे लेखी आश्वासन दिले.त्यामुळे या आंदोलनाला मोठे यश आले आहे.हा रस्ता मोठाच व्हावा अशी कंधार करांची अपेक्षा होती.

     दि.१८ रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनाला भारत राष्ट्र समितीचे ॲड.विजय धोंडगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड,लहुजी सेनेचे प्रितम गवाले,माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्ष साधना एंगडे, एमआयएमचे विधानसभा अध्यक्ष हबुभई यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.तर बालाजी कांबळे,पद्माकर बसवंते,कैलास कांबळे,महेश मोरे, विद्यासागर वाघमारे,मुन्ना बसवंते,संजय कांबळे,माधव गायकवाड,परमेश्वर सुर्यवंशी आदींसह शेकडो आंदोलनकर्त्ये सहभागी झाले होते.

     सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या लेखी आश्वासननंतरही नगरपरिषदेने बांधलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील शॉपिंग सेंटर नाही पाडल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा मामा गायकवाड कंधारकर यांनी दिला आहे तर न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *