नाशिक- येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव व अलका कुलकर्णी संपादित ‘विचार पेरत जाऊ…!’ ह्या संपादित वैचारिक ग्रंथास ल. र. फाउंडेशन, लातूरचा राज्य साहित्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संयोजन समितीतील प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार,डॉ.रणजित जाधव, डॉ.हंसराज भोसले,डॉ.उमाकांत जाधव यांनी सदर माहिती पत्रकाद्वारे प्रसारित केली आहे .
‘विचार पेरत जाऊ…!’ ह्या ग्रंथास संकीर्ण विभागातून सदर राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी हायटाऊन हॉल, ऑफिसर्स क्लब, बार्शी रोड,लातूर येथे सकाळी ११.०० वाजता संपन्न होणाऱ्या सोहळ्यात प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, डॉ.नागोराव कुंभार,तहसीलदार प्रताप वाघमारे, साहित्यिक विवेक घोटाळे व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नाशिक येथील साहित्यसखी महिला साहित्यिक मंचच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा जाधव व सचिव अलका कुलकर्णी यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये यु- ट्यूबच्या माध्यमातून महिनाभर ‘विचार पेरत जाऊ!’ ही वैचारीक व्याख्यानमाला चालवली होती व त्यास देश तथा देशाच्या बाहेरून देखील मराठी भाषकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला होता.
ह्या सर्व वैचारिक अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे संपादन म्हणजे ‘विचार पेरत जाऊ!’ हा ग्रंथ होय.
ह्या ग्रंथात माजी जिल्हाधिकारी बी.जी. वाघ, प्रा.दिलीप चव्हाण, डॉ.श्रीपाल सबनीस, राज असरोंडकर, डॉ. मिलिंद कसबे, हेरंब कुलकर्णी, डॉ.लक्ष्मीकांत कावळे, डॉ.गणेश चंदनशिवे, गंगाधर अहिरे,डॉ.सुदाम राठोड,दीप्ती राऊत, मिलन खोहर, शमिभा पाटील, डॉ.बाळ राक्षसे, संभाजी भगत यांनी विविध सामाजिक विषयांवर केलेली महत्वपूर्ण मांडणी आहे.
ह्या सर्व भाषणांचे संपादन डॉ.प्रतिभा जाधव व अलका कुलकर्णी यांनी केले असून ह्या निमित्ताने कोरोनाकाळातील एक महत्वाचा दस्ताऐवज निर्माण झाला आहे. अनेक समीक्षक व विचारवंत यांनी सदर ग्रंथाची मौलिकता आपल्या प्रतिक्रियांमधून व्यक्त केली आहे.