मीच माझ्या घरची गौराई

 

काळाच्या ओघात गाव बदलले, देश बदलला. आपली म्हणता येणारी माणसे फोन आणि इ-मेल मुळे हाकेच्या (क्लिकच्या) अंतरावर जरी असली तरी काही क्षण काही सण समारंभ तसेच साजरे करता येत नाहीत. मग अश्या वेळी मी मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेले हे मोरपीस बाहेर काढते आणि मनाशीच म्हणते “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”.

 

राज्यभरात गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. यानंतर आता ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात येते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन करण्यात येते. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हंटले जाते. या गणपती आवाहनात गौराईचे आवाहन म्हणजे मंगल पर्वाचा आनंद द्विगुणित करतात.

 

महालक्षमींचं आगमण गणेश चतुर्थीच्या काही दिवसांनी होते. राज्यात गौरी गणपतीचा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत.
घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. जेष्ठा गौरी आवाहन म्हणजे गौराई मुलाबाळांसह तीन दिवसांसाठी माहेरी येतात.

 

 

सर्व प्रथम महालक्ष्मीची स्थापना, महापूजा आणि शेवटी विसर्जन असा तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागी आख्यायिका आणि मान्यता देखील वेगवेगळ्या आहेत. काही मान्यतांनुसार गौरीला श्री गणेशाची बहीण मानले जाते, तर प्रचलित दंतकथांनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि ती श्री गणेशाची माता आहे. काही लोक या सणाला महालक्ष्मी पूजा देखील म्हणतात आणि या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा अर्चना करतात.

 

ज्या नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि त्याच मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करण्याची पद्धत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्मी होय. एक गौरी बाहेरून आणली जाते, तीच ज्येष्ठागौरी होय. पण ती घरात येताना रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावरून तिच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो.

 

त्यात आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मींचा समावेश होतो. या आठ पावलांवर स्त्रिया आपल्या गरजेनुसार गाईवासरे, धनधान्य, अलंकार, पुत्रपौत्र, दीर्घायुष्य, व्यवसायातील प्रगती आदि कामनांचा उल्लेख करतात.

 

महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबात शेकडो वर्षांपासून हा सण अखंडपणे साजरा होत आहे.
गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा सर्वत्र वेगवेगळी आहे. काही कुटुंबांमध्ये गौरीचा मुखवटा आहे, तर काही पारंपारिकपणे जलाशयातून पाच, सात किंवा अकरा खडे वा दगड घेऊन त्यांना गौरीस्वरुप मानून पूजा करतात. काही ठिकाणी पाच भांडी उतार असून त्यावर गौरी मुखवटे लावले जातात. तर काही घरांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळी इत्यादी धान्याच्या ढीग साचून झाकलेले असतात. तर गौरीची चित्रे किंवा पत्रके देखील उपलब्ध आहे. ज्यांची मनोभावे पूजा केली जाते.
अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो.

 

 

माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते. सर्व जन यानिमित्ताने एकत्र येतात हा उत्सव साजरा करतात आणि मग एकमेकांचा निरोप घेतात. म्हणूनच मी म्हणते सण हा नात्यांचा उत्सव असतो. हा असा गौराईचा सण सर्वत्र साजरा होत असला तरी घरात वावरत असलेल्या सगळ्याच महालक्ष्मी खूप खूप सुंदर असतात, पण तरीही मखरात न बसलेल्या फक्त दोन तीन दिवसासाठीच नाही, तर वर्षानुवर्षे आपल्या संसारात खरोखर ” उभ्या “असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणी, बहिणी, वहिनी,आत्या,काकू आणि आई,तुमच्यासारख्या सगळ्या गौरींना माझा नमस्कार आणि गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

रूचिरा बेटकर, नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *