कवी – मंगेश पाडगावकर
कविता – टप टप पडती अंगावरती
मंगेश केशव पाडगावकर.
जन्म – १०/०३/१९२९ (वेंगुर्ला – सिंधुदुर्ग).
मृत्यू – ३०/१२/२०१५ (८६ वर्षे).
कवी, गीतकार, लेखक, अनुवादक असं चतुरस्त्र व्यक्तीमत्व. पाडगावकर यांनी ६० वर्षे सातत्याने साहित्य क्षेत्रात विविध स्वरूपाचे लेखन केले.
“सलाम” या त्यांच्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या व्यतिरीक्त राज्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, म.सा.प.साहित्य पुरस्कार… असे अनेक नामांकित पुरस्कार मिळाले.
पाडगावकर दुबई मध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
सुरवातीच्या काळात पाडगावकर यांच्यावर बा.भ.बोरकर यांचा ठसा होता. नंतर त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.
जिप्सी, छोरी, उत्सव, विदुषक, सलाम, गझल, भटके पक्षी, बोलगाणी असे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले. भोलानाथ, बबलगम, चांदोमामा हे बालकवितासंग्रह प्रकाशित झाले. शिवाय मीरा, कबीर आणि तुलसीदास यांच्या कवितांचे भावानुवादही पाडगावकर यांनी केले.
मंगेश पाडगावकर, विंदा करंदिकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम खूप गाजले. पाडगावकर यांची काव्यसादरीकरणाची विशिष्ट शैली रसिकांना नेहमीच भुरळ घालित असे. प्रेमावरच्या कवितांमुळे पाडगावकर तरुणांची मने जिंकत असत.
या जन्मावर या जगण्यावर…
भातुकलीच्या खेळामध्ये…
शुक्रतारा मंद वारा…
अशा अनेक लोकप्रिय गाण्यांचे पाडगावकर हे गीतकार आहेत.
असा बेभान हा वारा, अफाट आकाश, आता उजाडेल, आम्लेट, दार उघड दार उघड चिऊताई, नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं, मी आनंदयात्री, सलाम, सांगा कसं जगायचं, सावर रे, टप टप पडती अंगावरती…. अशा अनेक उत्तमोत्तम गाजलेल्या कविता पाडगावकरांनी रसिकांना दिल्या…
अशाच कवितांपैकी एक पाडगावकर यांची खूप गाजलेली आणि पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ठ असलेली कविता म्हणजे “टप टप पडती अंगावरती” ही सदाबहार कविता. ही कविता निसर्ग कविता, बाल कविता आणि आनंदी जीवनाबद्दल भाष्य करणारी… अशा तिन्ही अंगानी सर्वश्रेष्ठ आहे. साधी सरळ सोपी शब्दरचना हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. निसर्गातील प्रतिमांचा वापर करीत बालकवितेच्या माध्यमातून पाडगावकरांनी आनंदी जीवनाचं सार सांगितलं आहे. अशा प्रकारे एकाच कवितेत पाडगावकर अनेक हेतू साध्य करताना दिसतात.
प्राजक्ताची टप टप अंगावर पडणारी फुले. त्याखाली फेर धरून नाचणारी गाणारी मुले अशी कल्पना मनात रंगवत कविता पुढे सरकते.
झाडांच्या मधून जमिनीवर पडणारी उन सावली जणू सुंदर जाळीच विणल्याचा आभास कवीला होतो. वाऱ्याची झुळूक आल्याने गवत खुशीने डुलते आहे.
अशा निसर्गातील अनेक प्रतिमांचे दाखले कवी आपल्या कवितेत देतो…
आयुष्य खूप सुंदर आहे. आपण फुलांसारखं फुललं पाहिजे. सूरात सूर मिसळून म्हणजे आनंदाने एकोप्याने हे जीवन जगलं पाहिजे. असे सुंदर आयुष्य जे आनंदाने जगतात तेच खरे शाहणे. आणि जे आयुष्याचा आनंद घेणार नाहीत ते बाकी सारेजण खुळे. अशा प्रकारचा जीवनाकडे आनंदी दृष्टीने पाहण्याचा विचार पाडगावकर आपल्या कवितेत मांडताना दिसतात. आणि त्यामूळेच ही कविता समाजातील सर्व वयोगटाला आणि सर्व स्तरातील लोकांना लागू होते. चला तर मग, या सर्वांगसुंदर कवितेचा प्रत्यक्ष आस्वाद घेऊयात –
टप टप पडती अंगावरती
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले,
भिर भिर भिर त्या तालावर
गाणे अमुचे जुळे !
कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी,
येतो वारा पहा भरारा
गवत खुशीने डुले !
दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पहा नाहती,
हसते धरती, फांदीवरती
हा झोपाळा झुले !
गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा,
पाऊस, वारा, मोरपिसारा
या गाण्यातुन फुले !
फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर चला रे,
गाणे गाती तेच शहाणे
बाकी सारे खुळे !
◆◆◆◆◆
— मंगेश पाडगांवकर
◆◆◆◆◆
संदर्भ – इंटरनेट
विनंती – या स्मृतिगंध उपक्रमाबद्दल आणि या कवितेबद्दल आपला अभिप्राय जरूर कळवा.
(विजो – विजय जोशी, डोंबिवली, ९८९२७५२२४२)
सुचना – या उपक्रमातील माहिती कोणताही बदल न करता आपण इतरत्र देऊ शकता.
■■■