तात्कालिक व दीर्घकालीन अशा दुहेरी उपाययोजनांची आवश्यकता!- अशोकराव चव्हाण

 

नांदेड, प्रतिनिधी

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी तात्कालिक व दीर्घकालीन अशी दुहेरी उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असून, राज्य सरकारने त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. याप्रसंगी अशोकराव चव्हाण यांनी या रुग्णालयातील असुविधांचा पाढाच वाचून दाखवला. ते म्हणाले की, या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी अशा सर्वच स्तरातील मनुष्यबळाची कमतरता आहे. आवश्यकतेनुरूप कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्ग-१ व वर्ग-२ ची भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे भरण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर द्यावेत. रुग्णालयाची क्षमता ५०८ खाटांची असताना आजमितीस येथे दुपटीने म्हणजे १ हजार ८० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे उपलब्ध सुविधा व मनुष्यबळावर प्रचंड ताण पडतो. रुग्णांची संख्या अधिक असल्याने औषधाची कमतरता असून, आर्थिक क्षमता नसतानाही रुग्णांना बाहेरुन औषधे आणणे भाग पडते. त्यामुळे औषध खरेदीसाठी स्थानिक पातळीवर पुरेसे अधिकार प्रदान करण्यात यावे. रुग्णालयातील यंत्रसामुग्री व उपकरणांची दुरुस्ती व देखभालीसाठी सेवा पुरवठादाराला वार्षिक देखभाल कराराची रक्कम तात्काळ देण्यात यावी. रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. ही जबाबदारी आऊटसोर्सिंगच्या बाह्ययंत्रणांवर सोपवावी लागेल. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी तालुका पातळीवरील आरोग्य सेवा बळकट करण्याबाबत नियोजन करण्यात यावे, अशा अनेक मागण्या आम्ही मांडल्या. उभय मंत्र्यांनी आमच्या भावना जाणून घेतल्या असून, त्यावर लवकरात लवकर निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा असल्याचे अशोकराव चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *