नांदेड, दि.4 – नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये नवजात बालकांसह इतर रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अचानक वाढले. मागील तीन दिवसांपासून मृत्यूचा या रुग्णालयात तांडव सुरु आहे. अशावेळी सत्ताधारी पक्षाकडून रुग्णालय पर्यटन व स्टंटबाजी सुरु असताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार या महाविद्यालयास आवश्यक ती मदत करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली असून त्याचाच भाग म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने सलग दुसऱ्या दिवशी सुमारे चार लक्ष रुपयांची औषधी सामुग्री देण्यात आली.
24 तासात 24 रुग्ण मृत्यूमुखी पडले. रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचे हे प्रमाण वाढत जात पुढील 24 तासात ही संख्या एकेचाळीस पर्यंत पोहोंचली. अशावेळी निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता होईल ती मदत करण्याची भूमिका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतली.
वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचे त्यांनी आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे यांनी दि. 3 रोजी सव्वा लाखांची औषधी रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केली.
पुढचे पाऊल टाकत नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर यांच्या पुढाकारातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चार लक्ष रुपयांची औषधी सामुग्री अधीष्ठाता एस.आर.वाकोडे यांच्याकडे देण्यात आली.
यावेळी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, प्रवक्ते संतोष पांडागळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, माजी उपमहापौर अब्दुल गफार, सतिश बसवदे, मदन देशमुख, अजिंक्य पवार, सत्यजित भोसले, भालचंद्र पवळे, दीपक पाटील, अतूल पेद्देवाड, नरसिंग पावडे, सुषमा थोरात, शशीकांत क्षीरसागर, सचिन संत्रे, मुन्वर शेख, पिंटू लोमटे, राहुल कौंसल्ये,रुपेश ढवळे, सचिन ढेंबरे आदी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
युवक काँग्रेसचा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयास मदतीचा हा ओघ सुरुच असून औषध नसल्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही ही काळजी घेण्याची जशी रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी आहे. तशी सामान्य नागरिक म्हणून आपली आहे, या भूमिकेतून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार यापुढे वैद्यकीय सेवा देण्यासाठीची तयारी सुध्दा दर्शविली आहे.