(सहायक पोलीस आयुक्त असलेल्या नागेश गायकवाड या माजी विद्यार्थ्यांने हेरंब कुलकर्णी या शिक्षकांना लिहिलेले पत्र)
आदरणीय हेरंब कुलकर्णी सरांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ जाहीर झालाय… त्या निमित्ताने…
अजूनही आठवतंय ..सीताराम सारडा शाळेत नववीत असताना आम्ही हेरंब कुलकर्णी पहिल्यांदा संपर्कात आलो… त्यावेळी हेरंब कुलकर्णी या नावाचा शाळेत जो काही दरारा होता, तो आजही आठवतोय …. दरारा यासाठी की ते अभ्यासाच्या बाबतीत खूपच शिस्तप्रिय होते… तळमळीने अध्यापन करत असताना साहजिकच त्यांना विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा असणारच… या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा धाक कधीच वाटला नाही… त्यांच्या विषयी एक प्रकरची आदरयुक्त भीती नेहमी मनात असायची, जी अजूनही कायम आहे…
नववी आणि दहावीत असताना हेरंब कुलकर्णी सर आम्हाला मराठी विषयाचे अध्यापन करायचे.. अ तुकडीला मराठी आणि ब तुकडीला इंग्रजी विषय शिकवणारे कुलकर्णी सर आमच्या आयुष्यातील पाहिले आयडॉल…. त्यांच्याकडून अ तुकडीत असल्याने त्यांच्याकडून इंग्रजी शिकण्याची संधी मिळाली नाही, मात्र त्यांनी शिकवलेली मराठी भाषा आयुष्यभर समृद्ध करून गेली आहे…सरांची ओघवती भाषाशैली, भावनांशी समरस होऊन लेखकाला नेमकं काय म्हणायचंय हे समजावून सांगण्याची त्यांची हातोटी कमाल होती… (त्यामुळे संदर्भासह स्पष्टीकरण करा हा प्रश्न माझा सर्वांत आवडता बनला होता…) मराठीचा धडा, कविता शिकवताना सर त्या लेखकांचा आणि कवींचा अशा प्रकारे परिचय करून देत असत की, वाटायचं आत्ता जाऊन त्यांची सगळी पुस्तके आणून वाचायला सुरुवात करावी… त्यामुळेच नववीत असताना अहमदनगरला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाऊन मी दया पवार यांचे बलुतं, डॉ.किशोर शांताबाई काळे यांचे कोल्हट्याचं पोर, अण्णाभाऊ साठे यांचे फकिरा, ना. सं.इनामदार यांचे झेप, विश्वास पाटील यांचे पानिपत , पु. ल. देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली ही पुस्तके विकत घेतली होती. वर्षभरात ही सगळी पुस्तके मी वाचून काढली, त्यातली काही माझ्या त्यावेळच्या वयाच्या मनाने अगम्य होती, तरीही ती वाचली… कुलकर्णी सरांमुळे वाचनाची गोडी लागली, ती आजतागायत कायम आहे…त्यावेळी वाटायचं की, सरांनीच पुस्तके लिहिली तर किती छान होईल ना…
आजही आठवतंय.. मी, अमोल, जयेश, दीपक आम्ही सरांच्या माणिक चौक येथील रूमवर जाऊन कित्येक वेळ गप्पा मारायचो.. सर त्यावेळी आम्हाला स्वामी विवेकानंद, जे.कृष्णमूर्ती, ओशो यांच्या विचारांबद्दल सांगायचे… त्यांच्या संग्रही असलेली पुस्तके आम्हाला दाखवायचे… मराठी व्याकरणातील बारीसारीक बारकावे सांगायचे… त्यामुळे मराठी व्याकरणात एक जरी मार्क गेला, तरी सर आता खूप रागावणार याचा धाक असायचा… (आज सरांना मी अभिमानाने सांगू शकतो की, मी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कित्येक दिवस मराठी व्याकरण शिकवले आणि या विषयावर माझे पुस्तक देखील आहे…)
कदाचित आपल्यापैकी कित्येकांना एक आदर्श व अभ्यासू शिक्षक एवढीच हेरंब कुलकर्णी सरांची ओळख किंवा आठवण असेल… कदाचित *प्रासंगिका* या सदरातून आपण त्यांच्या कविता वाचल्या असतील…. वाहिन्यांवरील चर्चेत बोलताना त्यांना ऐकले असेल… वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख वाचले असतील… वेतन आयोग नाकारण्यामागचे त्यांचे अर्थशास्त्रीय विचार आपल्या लक्षात असतील… अगदी अलीकडे, जुनी पेन्शन का नको या विषयावर त्यांचे सविस्तर विचार ऐकले असतील…. सरांची राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवरील *तो निघालाय* ही कविता, *टिकली* ही कविता, *यांचा महाराष्ट्र त्यांचा महाराष्ट्र* अशा कित्येक कविता ऐकल्या असतील…
मात्र एवढीच सरांची ओळख नाही…. सरांचे कार्यकर्तुत्व यापेक्षा कितीतरी अफाट आहे…अगदी विकिपीडिया वर देखील सरांचा परिचय दिलेला आहे.. (फेसबुक, इंस्टाग्राम वर तर आपण असतोच, पण विकिपीडियावर आपली माहिती येणे, ही साधीसुधी गोष्ट नसते…. त्यासाठी अफाट कार्य कर्तुत्व लागतं…) दहावी नंतर सरांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवता आला नसला तरी, वर्तमानपत्रातून, दूरचित्रवाणी माध्यमातून आणि महत्वाचे म्हणजे आपल्या विविध पुस्तकांमधून सर जे प्रगल्भ विचार मांडत आलेले आहेत, ते आपल्या सर्वांसाठी नेहमीच दीपस्तंभासारखे राहिलेले आहेत… सरांनी लेखक व्हावे, कवी व्हावे असे शालेय जीवनात नेहमी वाटायचे…. आज एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून सर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.. सर साहित्यिक आहेत, याहीपेक्षा मला सरांचा अभिमान वाटतो, तो त्यांच्या अफाट संशोधनाचा.. परखड विचारांचा.. आणि शिक्षणाविषयी असलेल्या निस्सीम तळमळीचा… विशेषतः त्यांनी स्वतः अविरत प्रवास करून शालाबाह्य मुलांच्या समस्या, स्थलांतरित मजूर व वेश्या व्यवसायातील महिलांची मुले, ऊसतोड कामगार, वीटभट्टी बांधकाम मजूर व रस्त्यावरील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, मुलींचे शिक्षण, वंचित वर्गाचे शिक्षण याबाबत सातत्याने विश्लेषणात्मक लेखन केले आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दुर्गम भागात असलेल्या शाळांची पाहणी करून शिक्षण क्षेत्रातल्या समस्या सरांनी वेळोवेळी त्यांच्या लेखांमधून सविस्तरपणे मांडल्या आहेत.
*’आमच्या शिक्षणाचं काय?’, ‘परीक्षेला पर्याय काय ?’ , ‘बखर शिक्षणाची’ , ‘शाळा आहे – शिक्षण नाही !’* या पुस्तकांतून सरांनी शिक्षव्यवस्थेतील त्रुटींवर जळजळीत कटाक्ष टाकला आहे… *आमच्या शिक्षणाचं काय?* हे पुस्तक मी वाचले आहे. महाराष्ट्रातील वीज जिल्हे फिरवून सामाजिक संस्था त्यांचे कार्यकर्ते यांना भेटून मुलांचे शिक्षण शाळांमधून मुलांची गळती शाळाबाह्य मुले बाल कामगार याविषयी वास्तवदर्शी स्थिती सरांनी या पुस्तकात मांडलेली आहे. *परीक्षेला पर्याय काय?* यातून सरांनी विविध शिक्षण तज्ञ मानसोपचार तज्ञ साहित्यिक कुलगुरू यांचे विचार मांडलेले आहेत.. भर पावसाळ्यात गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, नंदूरबार, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये जाऊन शिक्षणाचा हा शोध घेऊन सरांनी *शाळा आहे शिक्षण नाही!* मधून अनेक कटू सत्य अधोरेखित केले आहेत..
महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यातील १२५ गरीब दुर्गम गावांना भेटी देऊन सरांनी *दारिद्र्याची शोधयात्रा* मांडली आहे… वाचताना मन विषण्ण होऊन जाते.. रोजच्या जेवणात किती कॅलरीज असल्या म्हणजे ती व्यक्ती अथवा कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर मानता येईल, या मुद्द्यावर अर्थतज्ज्ञ वाद घालतात; पण पाड्या-पाड्यांवर जाऊन गरिबांच्या स्वयंपाकघरात, भांड्या कुंड्यांत डोकावून बघितल्यावर काय दिसले? हे सरांनी अनुभवले आहे…
गंभीर विषयांबरोबरच नर्मविनोदी लेखनात देखील सरांचा हातखंडा आहे, हे कॉमन मॅन या पुस्तकातून तसेच प्रासंगिका आणि इतर कवितांमधून दिसून येते… म्हणून तर खुद्द पु.ल. देशपांडे यांच्यासह कै. नरेंद्र दाभोलकर, कुमार केतकर, मेधा पाटकर, अरुण साधू यांसारख्या मान्यवरांनी देखील वेळोवेळी सरांचे कौतुक केलेले आहे… सर्व लेखन प्रकारांत सरांची मुशाफिरी आहे… (म्हणूनच तर विश्वास आहे… अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सर नक्कीच विराजमान होतील.)
*’बखर शिक्षणाची’, ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’, ‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’, ‘माझी शिक्षण परिक्रमा’, ‘ जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स’* ही पुस्तके मी अजून वाचलेली नाहीत, मात्र ही वाचन पर्वणी मी लवकरच अनुभवणार आहे… कार्यालयात असताना एखाद्या वृत्तवाहिनीवर जेव्हा कुलकर्णी सरांची मुलाखत सुरू असते, तेव्हा मी अभिमानाने सहकाऱ्यांना सांगतो की “हे सर आम्हाला शिक्षक होते, यांनी आम्हाला घडवलय…यांच्यामुळेच आम्ही जे काही आहोत ते आहोत..” अनेकांना त्यांचे विचार बंडखोर वाटतात, डाव्या विचारसरणीचे वाटतात, मात्र सत्य बोलणे आणि मांडणे हे डाव्या विचारसरणीचे मानले जात असेल, तर गोपाळ गणेश आगरकर यांनाही कम्युनिस्ट संबोधावे लागेल…!! (काल सरांना सुधारककार आगरकर पुरस्कार जाहीर होणे ही बाब म्हणूनच लक्षणीय ठरते..) *’इष्ट असेल ते बोलणार , साध्य असेल ते करणार ‘* हे ब्रीदवाक्य घेऊन उभी हयात सुधारक आगरकरांनी समाज सुधारणा विषयक परखड विचार मांडले… हेरंब कुलकर्णी सर तोच वसा घेऊन वाटचाल करत आहेत…म्हणून त्यांच्या नावाचा पुरस्कार सरांना मिळणे, ही त्या पुरस्काराची सार्थकता आहे…
आम्हाला अभिमान आहे… आम्ही हेरंब कुलकर्णी सरांचे विद्यार्थी आहोत…
अभिनंदन सर…
नागेश गायकवाड