तर ठाणे, नागपुरातील बळींसाठी कोण जबाबदार? अशोकराव चव्हाण यांनी हसन मुश्रिफांना सुनावले

 

नांदेड ( प्रतिनिधी )

स्थानिक आमदार म्हणून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्युंसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माझ्यावर दोषारोपण करणार असतील तर ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील बळींची जबाबदारी ते कोणावर निश्चित करणार आहेत, असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला आहे.

मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना आपल्यावरील जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी मंत्र्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, राज्याचे विद्वान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचा आमदार म्हणून या घटनेसाठी माझ्यावर दोषारोपण करणार असतील तर मग ठाण्यातील महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत झालेले १८ मृत्यू, नागपूरच्या शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी झालेले २३ मृत्यू, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात २४ तासांत झालेल्या १४ मृत्युंसाठी कोण जबाबदार आहे, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करावे.

नांदेडचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघात आहे. येथील काँग्रेस पक्षाचे स्थानिक आमदार मोहन हंबर्डे यांनी दि. २८ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात या रुग्णालयाच्या असुविधांबाबत सभागृहामध्ये सविस्तर माहिती दिली होती, याची आठवणही अशोकराव चव्हाण यांनी हसन मुश्रीफ यांना करून दिले. मात्र, त्याकडे राज्य सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले. त्याचवेळी दखल घेऊन योग्य पावले उचलली असती तर कदाचित नांदेडची दुर्दैवी घटना टळू शकली असती, असेही ते पुढे म्हणाले.

निश्चितच नांदेड हा माझा जिल्हा आहे. केवळ नांदेडच नव्हे तर राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृती होऊ नये, यासाठी मी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कोणतेही राजकारण न करता समन्वयाची भूमिका घेतली. आरोग्य सेवेतील उणिवा दूर करण्यासाठी अनेक विधायक सूचना केल्या. संबंधित खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कृपया राजकीय टीकाटिप्पणीचा पोरखेळ न करता हा विषय गांभीर्याने घ्यावा, वस्तुस्थिती स्वीकारावी आणि आरोग्य सेवेत सुधारणा करून रुग्णांची गैरसोय कशी दूर करता येईल, याकडे लक्ष देणे राज्याच्या हिताचे आहे, असे अशोकराव चव्हाण यांनी पुढे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *