“मराठवाडा मुक्ती दिन चिरायू हो” या घोषणेने सभागृह दुमदुमले.
अहमदपूर – मराठवाडा मुक्तीसंग्रमाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालय द्वारा निर्मित व सूर्योदय सांस्कृतिक कलामंच द्वारा प्रस्तुत “गाथा मुक्ती संग्रामाची” या नाटकाचा ७ आक्टों. रोजी अहमदपूरात प्रयोग झाला.
संस्कृती मंगल कार्यालयात सादर झालेल्या या नाटाकाचे लेखन सुप्रसिद्ध रंगकर्मी व विधिज्ञ अॅड.शैलेश गोजमगुंडे व डॉ. सतीश साळुंके यांनी केले आहे तर दिग्दर्शन शैलेश गोजमगुंडे यांचे आहे. या ऐतिहासिक नाटकाने मराठवाडा मुक्ती लढ्यातील जिवंत इतिहास सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली व मुक्ती लढ्यातील आठवणी जीवंत केल्या.
अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये व जल्लोषात सादर झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाला अहमदपूरकर रसिकांनी भरभरुन दाद दिली.
हाऊसफुल्ल झालेल्या सभागृहात नाट्यप्रयोगाचा शुभारंभ रंगदेवतेच्या अर्थात नटराज पूजनाने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आला.
यावेळी रंगमंचावर मराठवाडा मुक्ती संग्राम संयोजन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार शिवाजी पालेपाड, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, माजी सभापती अॅड. भारत चामे, भाजपाचे राजकुमार मजगे, संयोजन समितीचे सदस्य पुरुषोत्तम माने,संयोजन समितीचे सदस्य राम तत्तापुरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, उद्योजक आशिष गुणाले, डॉ. मधुसूदन चेरेकर, मोहीब कादरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या ऐतिहासिक नाटकातून रझाकारांनी मराठवाड्यातील भोळ्या भाबड्या जनतेवर कसा अमानुष अन्याय आणि अत्याचार केला पण त्यांच्या विरोधात सरदार वल्लभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदाभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे यांच्यासह शूरवीर मुक्तीसैनिकांनी प्राणाची बाजी लावल्यामुळेच 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जोखडातून आपला मराठवाडा मुक्त झाल्याचे अत्यंत रोमहर्षक आणि निखळ अभिनयातून 40 कलाकारांच्या संचाने दाखवून देत, रसिक प्रेक्षकांना दोन तास मंत्रमुग्ध करून सोडले.
यावेळी तहसिलदार शिवाजी पालेपाड, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे यांचे नाट्यप्रयोगाला शुभेच्छा देणारी भाषणे झाली.
प्रास्ताविक लेखक अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन संयोजन समितीचे सदस्य राम तत्तापूरे यांनी तर आभार संयोजन समितीचे सदस्य पुरुषोत्तम माने आणि मानले.
प्रारंभी संयोजन समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. शहरवासी यांच्या वतीने हा ऐतिहासिक नाटकाचे लेखन करणारे एडवोकेट शैलेश गोजमगुंडे यांचा डॉ. नरसिंह भिकाने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या नाट्य सोहळ्याला मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायण काळे, कार्यवाह द मा माने, मोहीब कादरी, देवेंद्र देवणीकर, गोविंद गिरी, प्राचार्य निळकंठ पाटील, प्रा अनिल चवळे, किलबिलचे संचालक ज्ञानोबा भोसले, चंद्रशेखर भालेराव, कपिल बिराजदार यांच्यासह नाट्यप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या सोहळ्याचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला हा नाट्य सोहळा यशस्वी करण्यासाठी मराठवाडा मुक्ती दिन संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व सूर्योदय सांस्कृतिक कला मंचच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.