लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकाप,काँग्रेस, शिवसेना,शिवा संघटना,मन्याड फाउंडेशन,बी.आर. एस.यांच्या शेतकरी विकास पॅनलचचे निर्विवाद वर्चस्व …!
लोहा : प्रतिनिधी
शलोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धुळ चारली असुन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पॅनलला चारीमुंड्या चित केले आहे. एवढेच नव्हे तर २० वर्षांपासून एक हाती सत्ता असलेले खा.चिखलीकर यांचे साम्राज्य आमदार शिंदे , शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे व शेतकरी विकास पॅनलच्या युतीने खासदार चिखलीकर यांचे बाजार समिती वरील वर्चस्व संपुष्टात आणले आहे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शामसुंदर शिंदे व युतीच्या १८ पैकी १६ जागेवर शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का दिला आहे.
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार चिखलीकर यांच्या मुरब्बी राजकीय दिग्गज उमेदवारांना शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी धुळ चारली आहे. लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी खासदार चिखलीकर व आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले होते. कंधार बाजार समितीच्या निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर पराभावाला सामोरे जात लोहा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे , शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी स्वतः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळली आमदार शिंदे यांच्यासोबत शेतकरी विकास पॅनल युतीचे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार अमरनाथ राजुरकर, शिवसेना नेते तथा माजी आमदार रोहिदासराव चव्हाण,शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे,मन्याड फाउंडेशनचे एकनाथराव पवार, काँग्रेसचे लोहा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार,बी आर एस नेते विजय धोंडगे, कंधार बाजार समितीचे संचालक रोहित पाटील शिंदे यांनी लोहा बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती,गावोगावी जाऊन परिवर्तनाची गरज असल्याचे सांगून मतदारांचे मतपरिवर्तन केले होते.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे प्रविण पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे, मानिकराव मुकदम यांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरले होते. परंतु खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवाराबाबत मतदारसंघात अनेक वर्षापासून नाराजी असल्याने त्यांचे रुपांतर खासदार चिखलीकर यांच्या पॅनलच्या पराभवात झाले आहे.
सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून ७ पैकी ७ जागेवर आ. शामसुंदर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे चिरंजीव युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे,चंद्रसेन पाटील,स्वप्निल पाटील उमरेकर,भास्कर पाटील ढगे मारतळेकर,साहेबराव काळे,दत्ता दिघे, धोंडीबा पवार यांचा समावेश आहे. तर सर्वसाधारण महिला गटातून पुनम क्षीरसागर, सयंत्राबाई सर्जे,भटक्या विमुक्त मतदारसंघातून केशव तिडके, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जागेवर बसवेश्वर धोंडे हे विजयी झाले. सोसायटीच्या ११ पैकी ११ जागेवर आमदार श्यामसुंदर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले.
ग्रामपंचायत मतदारसंघातील चार पैकी चार जागा आमदार शामसुंदर शिंदे व शेतकरी विकास पॅनलने जिंकल्या आहेत. सर्वसाधारण दोन जागेवर सौ. लक्ष्मीबाई वाकडे, आप्पासाहेब पवार, अनुसुचित जाती मतदारसंघातून मधुकर डाकोरे, आर्थिक दुर्बल घटकातील मतदारसंघातून केरबा केंद्रे हे विजयी झाले आहेत. तर हमाल मापाडी मतदारसंघातून भाऊराव कंधारे हे विजयी झाले आहेत.तर व्यापारी मतदार संघातून चिखलीकर गटाचे केशवराव मुकदम व किरण वटमवार हे विजयी झाले आहेत.
चौकट;
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला असून
यात तालुक्याचे नेते कै. व्यंकटराव मुकदम यांचे चिरंजीव माणिकराव मुकदम, माजी सभापती शंकरराव ढगे, माजी सभापती सुभाष गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य उद्धव पाटील चितळीकर, मारोतराव बोरगांवकर, अंकुश कदम आदींना पराभावाला सामोरे जावे लागले आहे. आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे चिरंजीव विक्रांत दादा शिंदे यांच्या प्रथम राजकीय एंट्रीत विक्रांत शिंदे यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला आहे, विक्रांत शामसुंदर शिंदे यांनी खासदार चिखलीकर यांचे कट्टर समर्थक तथा मुरब्बी राजकीय नेते माणिकराव मुकदम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे, आमदार शामसुंदर शिंदे , शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शिंदे व शेतकरी विकास पॅनल युतीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पॅनलचा दारुण पराभव केल्याने खासदार चिखलीकर यांची लोहा कंधार मतदारसंघातील पक्कड संपुष्टात आल्याचे जाणकार नागरिकाकडून बोलल्या जात आहे, आ. शामसुंदर शिंदे व युतीच्या शेतकरी विकास पॅनलची लोहा कृषी बाजार समितीवर निर्विवाद सत्ता आल्याने नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.आमदार आमदार श्यामसुंदर शिंदे आशाताई शिंदे व युतीच्या शेतकरी विकास पॅनलचा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यामुळे लोहा शहरातून शेतकरी विकास पॅनलच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली होती, या रॅलीत आमदार श्यामसुंदर शिंदे आशाताई शिंदे यांच्यासह शेतकरी विकास पॅनल युतीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.