मोठ्या पडद्यावर सामना पाहण्यासाठी आलेल्या शेकडो क्रीडा रसिकांनी प्रचंड जल्लोषात केले भारताच्या विजयाचे स्वागत

 

क्षणाक्षणाला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचे पारडे बदलत असताना वैद्य हॉस्पिटल नांदेड येथे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी लावलेल्या मोठ्या पडद्यावर सामना पाहण्यासाठी आलेल्या शेकडो क्रीडा रसिकांनी प्रचंड जल्लोषात भारताच्या विजयाचे स्वागत केले.भाजप महानगर नांदेडतर्फे होणा-या या उपक्रमाचा शुभारंभ महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते करण्यात आला.

 

प्रक्षेपणाच्या वेळी मार्गदर्शन करताना दिलीप कंदकुर्ते यांनी क्रिकेट विश्वचषकाचे सामने मोठ्या पडद्यावर मोफत दाखविण्याचे हे विक्रमी १५ वे वर्ष असल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ.हंसराज वैद्य यांनी आपल्या भाषणातून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

 

 

यावेळी व्यासपीठावर महानगर सरचिटणीस शितल खांडील, दिलीपसिंघ सोडी,साहेबराव कदम, सोशल मीडिया चे राज यादव,डॉ.जुगल धुत,अनिल गाजुला,हिरामन देशमुख, गजानन उबाळे,महेंद्र तरटे यांची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

 

संचलन सुरेश लोट यांनी केले. डॉ. शितल भालके यांनी सामने दाखवण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रभुदास वाडेकर यांनी त्यांचे आभार मानले. शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचा आनंद लुटण्यासाठी क्रीडा रसिकांनी अर्धा तास आधीपासूनच प्रचंड गर्दी केल्यामुळे वैद्य हॉस्पिटलचे सभागृह खचाखच भरले होते. प्रक्षेपण अतिशय स्पष्ट व भव्य असल्यामुळे स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद लुटत भारतातर्फे घेतलेल्या सर्व बळींच्या प्रसंगी उपस्थितांनी दाद दिली.

 

 

रवींद्र जडेजा व इतर गोलंदाजांनी २०० च्या आत ऑस्ट्रेलियाला गुंडाळले. त्यामुळे एकतर्फी भारताचा विजय होईल असे वाटत होते .परंतु भारताचे तिन फलंदाज फ़क्त दोन धावात बाद झाल्यामुळे संपूर्ण सभागृहात सन्नाटा पसरला.के.एल.राहुल आणि विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीने सामन्याचा रुख बदलून विजयश्री टप्प्यात आली. प्रत्येक धावावर तरुण टाळ्या वाजून आनंद व्यक्त करत होते.

 

शेवटी के.एल.राहुल ने षटकार मारून विजय मिळाल्यानंतर प्रचंड घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. तिरंगे झेंडे हातात घेऊन अनेक जण उत्साहात भांगडा करत होते. सामना संपल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती, प्रदीपसिंह हजारी,राजेश पावडे करण जाधव, सदाशिव कंधारे, विलास जोगदंड, विजय वाडेकर यांनी परिश्रम घेतले.बुधवार दि.११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता भारत अफगानिस्तान हा सामना मोठ्या पडद्यावर मोफत दाखवण्यात येणार आहे.वैद्य हॉस्पिटल मध्ये आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे क्रिडाप्रेमी नागरिकांनी व तरूणांनी वेळेवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड.दिलीप ठाकूर व कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *