लोकस्वराज्य आंदोलन प्रथम दसरा मेळावा नांदेडात

नांदेड : लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने  मंगळवार दि. 24 ऑक्टोबर रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा मोंढा, नांदेड येथील प्रथम दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अतुल खंडगावकर यांनी दिली आहे.

 

या मेळाव्यात अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण करावे, बार्टीच्या धर्तीवर साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, मातंग समाज विभाग स्थापन करुन शासनाने या समाजासाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी, राज्यातील मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी कुठलीही नोंद न घेता पडुन आहेत. राज्य सरकारने मातंग समाजाला न्याय द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत.

 

 

यावेळी बोलताना प्रा. रामचंद्र भरांडे म्हणाले की, मातंग समाज मागे पडण्याचे कारण शिक्षणाच्या तसेच राजकारणाच्या अभावातही आहे. आत्मोन्नतीसाठी आंदोलने करावी लागतात, याचे भान दुर्दैवाने मातंग समाजाला नाही. शासनाने आता मातंग समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, शेती प्रश्न, घरकुल योजना, कर्ज, अनुदान अशा विकास योजनांचा त्यांना फायदा मिळवून दिला पाहिजे. ज्यांचे पोट भरले आहे, अशांनी आरक्षणाची सवलत मातंग बंधूंच्या वाट्याला कशी येईल याचाही विचार केला पाहिजे. दिवसेंदिवस गावगाड्यात मातंग समाजातील नागरिकांवर हल्ले होत आहेत, अनेकांना जीवे मारण्यात येत आहे, ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही, खरे तर मातंग समाजाच्या न्याय प्रश्नांकडे बुद्धाच्या करुणेतून पाहण्याची व तसे ते सोडवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. याचबरोबर मातंग समाजाने विशेषत: तरुणांनी हे जाणून घेतले पाहिजे की, शिक्षणाशिवाय कुठल्याही समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. माहिती तंत्रज्ञान व जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकायचे म्हणजे आधुनिक शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही. या अनुषंगाने शासनाने मातंग समाज स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीने सक्षम करण्याचा तसेच त्यांना शासकीय योजनांत सहभागी करून घेण्याचा जाणीवपूर्वक ठोस प्रयत्न करावा, मातंग समाजाच्या प्रश्नांकडे शासनाने जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले तर, त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील,असा इशाराही प्रा. भरांडे यांनी दिला आहे. या प्रथम दसरा मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष नितीन पोळ, प्रदेश सरचिटणीस नामदेव गायकवाड, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दादा पवार, व्ही.जी. डोईवाड, प्रा. पी. डी. गोणारकर, धोंडूपंत बनसोडे, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. दत्तराज गायकवाड, नागोराव कुडके, सचिन वाघमारे, अतुल खंडगावकर, हनमंत नामाकार, अॅड. सचिन बोईवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *