कौमुदी पौर्णिमा

 

तुही जागा मीही जागी
दोन हृदयातील अंतर मागते कोजागिरी…
भाळल्या का तारका तुझ्यावरी
या मनाचे त्या मनाला सांगते कोजागिरी…
भारतात शरद ऋतूतील आश्विन महिना आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच “कोजागरी पौर्णिमा” किंवा “शरद पौर्णिमा”. ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला “कौमुदी पौर्णिमा” असे देखील म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा ही “माडी पौर्णिमा” म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो.
भारतीय हिंदू, बौद्ध धर्म संस्कृतीतील हा महत्त्वाचा सण मानला जातो. हा दिवस सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्या दरम्यान येतो.
ही पौर्णिमा साजरी करण्यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे आहेत. तसेच आरोग्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. कृषी संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. अशा या संपन्नतेमध्ये म्हणजच शरद पौर्णिमेला शबरीचा जन्म झाला.
कोजागिरी पौर्णिमा ! म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति बुध्दिच्या दैवतांची आराधाना करावी. विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ! शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला असतो. काही भागात तर नवीन पिके हाताशी आलेली असतात.
रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्ठी करत,खेळ खेळत, आठवणीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून मसाला दूध बनवले जाते . त्यात चंद्राची शीतल प्रतिबिंब त्या दुधात पाहिल्या जाते आणि मग ते मधुर दुध प्राशन केले जाते.
चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो.या दिवशी आकाश सर्व बाजुंनी चांदण्यांनी सजलेल असतं म्हणून हिला वर्षातील सर्वात सुंदर रात्र देखील म्हंटल
कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत असं म्हणतात की, महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात “अमृतकलश’ घेऊन प्रत्येकालाच विचारते, की “को जागर्ति…? को… जागर्ति…?’ म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती “अमृत’ म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे पावसाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.
याव्यतिरिक्त दमा आणि अस्थमा या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरतो. दमा असणाऱ्यांनी त्यांचा वैद्यकीय डोस या मसालेदार दुधामध्ये टाकून चंद्राच्या प्रकाशात ठेवावा आणि त्यानंतर ते दूध द्यावे. हे दूध चंद्राच्या प्रकाशात असल्याने त्याचे गुणधर्म काही प्रमाणात बदलते आणि याचा फायदा निश्चितच होतो.
आजच्या रात्रीला चंद्रासह रहा रे
गगणात हसणारा तो चंद्रमा पहा रे
मधुर दुग्धशर्करात प्रतिबिंबात शोधा रे
कवेत घेऊन चांदणीला कोजागिरी करा रे

रुचिरा बेटकर,नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *