समाज संत हरपला

महाराष्ट्रात जवळ जवळ 75 वर्ष वैष्णव संप्रदायाची सेवा करून समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य त्यांनी केले, बुरसटलेल्या रूढी परंपरांना बाजूला सारून समाज चैतन्यमय केले,, भावनेची भाषा भावनेला कळाली, विठुरायाशी एकरूप होऊन समाज सुधारण्याचा विडा त्यांनी उचलला, आयुष्यभर चारित्र्य संपन्न जीवन जगले, आपल्या जीवनात त्यांनी कोणाला कधी ही कमी लेखले नाही *या रे या रे लहान थोर* म्हणून सर्वांना जवळ केले अशा या महान संताविषयी दोन शब्द ……

 

खूप जवळचा अगदी हृदयाशी नाते असलेला मित्र जावावा आणि त्याच्यावर श्रद्धांजली वर लेख लिहिण्याचा दुर्दैवी प्रसंग एखाद्यावर यावा ,याच्यापेक्षा मोठे दुःख नाही *शंभर मेले तरी चालतील परंतु त्यांचा पोशिंदा जगलाच पाहिजे* वरकरणी हे वाक्य अनेकदा वाचलं होतं ;परंतु त्याची धग ,व्याप्ती, झळ ,वेदना, खोली ,गहिरेपणाची अनुभूती आल्याशिवाय या वाक्याचा अर्थ उमगला नव्हता ,आज बाबा महाराजांच्या जाण्याने मला तो समजला, अचानक ही बातमी प्रसारमाध्यमांकडून कळाली आणि मन विषन्न होऊन डोकं सुन्न झालं, काही सुचत नव्हतं अनेक जुन्या स्मृतींना उजाळा देत मन: पटला वरून अनेक प्रसंग भराभर चालत चित्राप्रमाणे सरकत होते,
त्यांची देहबोली सुमधूर आवाज आज कानात गुणगुणतो, फक्त दहावीपर्यंत शिकलेला व्यक्ती लाखो लोकांशी बोलतो ,पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त व वारकरी म्हणून समाजात त्यांची तीन पिढ्यापासूनची वारकरी परंपरा खरोखरच शोभून दिसते, माणसं शिक्षणानेच मोठे होतात, असं काही नाही त्या माणसात सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रगल्भ असली की त्यांच्यात समाजाला समजून घेण्याची विलक्षण जिद्द असते. सार्वजनिक जीवन जगत असताना त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांना मानले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांचे कीर्तन, प्रवचन झाले. *जो जे वांचील। तो ते लाहो।।* या पसायदानाच्या ओवी प्रमाणे त्यांनी कोणाचेही काम पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन न ठेवता त्यांना न्याय देण्याची भूमिका निभावली ,अफाट भक्तगण ,शिष्यगण गोळा केले, आजाद शत्रू म्हणून वारकरी संप्रदायात त्यांची हितचिंतक उल्लेख करतात. अंधश्रद्धेच्या वाटेने न जाता सदसद विवेक बुद्धीने ते आपल्या अभंगातून लाखो लोकांशी निरूपण करतात. अशा या महान कीर्तनकाराचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी झाला, त्यांचे मूळ नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते .संपूर्ण आयुष्य त्यांनी कीर्तन परंपरेला वाहिलेलं होतं. आपल्या रसाळ वाणीतून कोट्यावधी लोकांना त्यांनी खरा तो एकची धर्म शिकवला . त्यांच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची , 135 वर्षाची परंपरा आहे ,ते 12 वर्षाचे असतानाच मुंबई येथील मुंबई आकाशवाणी वर गाण्यास सुरुवात केली , तेव्हापासून त्यांच्या मनात परिवर्तन झाले ,अफाट प्रसिद्धी मिळाली, आणि मग कीर्तनामागून कीर्तन सुरू झाले , प्रपंच नेटका ठेवून त्यांनी समाजाला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केले ,26 मार्च 1954 ला त्यांचा विवाह दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला; काही काळ त्यांनी फर्निचरचा व्यवसाय केला नंतर ते कीर्तन करू लागले, संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्यांच्या मानकरी परंपरा त्यांच्या घराण्यात आजही आहेत. तीन पिढ्यांपासून त्यांच्या घराण्यात कीर्तनाची परंपरा चालू आहे. पंढरीचा पांडुरंग आणि वारकरी संप्रदाय यांच्याशी त्यांनी आपले नाते जोडले,वारकरी संप्रदायामध्ये ते एवढे एकरूप झाले की वारकरी संप्रदायाला त्यांनी अंधश्रद्धेतून बाहेर काढून त्यांनी लोकांमध्ये चैतन्य निर्माण केले,म्हणून लोकांनी त्यांना आनंदाने बाबा महाराज म्हणू लागले ,आणि हेच नाव पुढे बाबा महाराज सातारकर या नावानेच ते संपूर्ण जगाला परिचित झाले ,आज पर्यंत त्यांनी 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली ,तसेच लाखो लोकांना व्यसनमुक्त केले. व्यसनामुळे अनेक लोक देशोधडीला लागलेले आहेत, व्यसन हे माणसाला घातक असते, समाजातून ते बाहेर काढून टाकते, व्यसनाची नशा ही वाईट प्रवृत्तीकडे नेते म्हणून त्यांनी व्यसना बद्दल माहिती सांगून अनेक तरुणांना व्यसनापासून दूर ठेवले, समाजासाठी त्यांनी केलेले कार्य अमूल्य आहे.
*मोडलेल्या माणसाचे*
*दुःख ओले झेलताना*
*त्या अनाथाच्या उशाला*
*दीप लावू झोपताना*
*कोणती ना जात त्यांची*
*कोणता ना धर्म त्यांना*
*दुःख भिजले दोन अश्रू*
*माणसाचे माणसांना*
महाराष्ट्राच्या राज्यपालांचे हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार. जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 1983 मध्ये श्री चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था त्यांनी स्थापन केली, पांढरे शुभ्र धोतर, सदरा डोक्यावर बांधलेला फेटा कपाळावर लावलेले गोपीचंदन त्यामुळे हा जणू काही वैष्णव धर्माचा प्रसारक वाटावा ,असे विलोभनीय व हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजेच बाबा महाराज सातारकर यांनी अनेक भक्तगण गोळा केले. खरोखरच हे एक बहुश्रुत व्यक्तिमत्व होतं .स्वतःच्या शब्दावर त्यांचा विश्वास होता. मातीशी एकरूप असणार हे नातं सर्वाच्या मनाला दुःख देऊन गेलं. माणसं जोडणारा माणूस असे आपल्याला त्यांना म्हणता येते निर्मळ मनाचा मर्यादा पुरुषोत्तम, सर्वगुणसंपन्न ,पंढरीचा वारकरी, रेशीम बंध जोपासणारा, चैतन्याचा महामेरू, यांच्या आठवणी कायम आमच्या स्मरणात राहतील, पंढरपूर येथील मठात चालणारे त्यांचे आषाढी एकादशीचे कीर्तन जणू काही अमृताच्या धारा आहेत असा भास होत असे. मानवाला प्राचीन काळापासून आपल्या बौद्धिक क्षमतेने दुसऱ्या व्यक्तींना जिंकता येते ,काही लोक संशोधनातून तर काही लोक अनुभवातून आपले विचार प्रकट करतात तर काही लोक अल्प ज्ञानातून स्वतःच्या तर्कातून संशयाच्या आधारावर आपले विचार प्रकट करतात ,परंतु काही माणसे कारण नसताना आपली मते मांडून निरर्थक वाद घालतात काही लोक केवळ लेखन व भाषणावरच उदरनिर्वाह चालवतात या सर्व गोष्टी बाजूला सारून इष्ट ते बोलणार, सत्य ते सांगणार म्हणून महाराजांनी सर्वत्र ख्याती होती, प्राणीमात्रावर दया केली पाहिजे ,*अहंकार गेला ।तुका म्हणे देव झाला*।*मनुष्याने अहंकार सोडून द्यावे, आजपर्यंत अहंकाराने वाईटच घडले आहे, रावणाचा अहंकार वाईटा कडे घेऊन गेला, कंस राजा कृष्णाचा मामा असून अहंकारामुळे मृत्यूकडे गेला, मानवाच्या मनात आजही काही अंधश्रद्धा आहेत ,असे स्पष्टपणे बाबा महाराज सातारकर यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला रोखठोक उत्तरे देऊन, गर्व किती वाईट आहे हे पटवून दिले,आज मानव चंद्रावर मंगळावर पाऊल ठेवत आहे, 21 व्या शतकात जगत असताना बुरसटलेल्या गोष्टीच्या मागे लागणे योग्य नाही असे ते स्पष्ट सांगत असत, संपूर्ण आयुष्यात त्यांनी बुवाबाजी पासून दूर राहिले, कोणत्याही पद्धतीने कोणालाही ठकविले नाही ,बुवाबाजीचा इतिहास सर्वांना माहिती आहे, म्हणून काही आज्ञांनी वा अंधश्रद्धाळू लोकांना ते पटते व नंतर संसाराची राख रांगोळी होते हे आपल्या कीर्तनातून ते सांगतात. आज ते आपल्या देहाने निघून गेलेले असले तरीही आपल्या मनात ते कायम राहतील असे मला वाटते,
बाबा महाराज सातारकर यांचे 89 व्या वर्षी मुंबईच्या नेरूळ येथे प्राणज्योत मावळली, या जगात मिळेपर्यंत आणि गमावल्यानंतर प्रत्येक गोष्ट महत्त्वाची वाटते.
*गेले दिगंबर ईश्वर विभूति।।*
*राहिल्या त्या कीर्ती जगा माजी*। *वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी* ।।
*आता ऐसे कोणी होणे नाही ।*।वारकरी वैभव ह, भ ,प बाबा महाराज सातारकर यांना विठूमाऊली प्रतिष्ठान गोकुळवाडी कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

शब्दांकन
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत* संस्थापक: विठूमाऊली प्रतिष्ठान गोकुळवाडी. ता. मुखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *