(लोहा; प्रतिनिधी )
लोहा कंधार तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज व मुळकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेशित केले होते.
हे पंचनामे करण्यासाठी गावचे तलाठी ,कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी बाधित सोयाबीन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सर्वेक्षिकामार्फत सात दिवसात सादर करण्याचे निर्देशही दिले होते, पण पिवळा मोझेक मुळे सोयाबीन बाधित पिकांच्या पंचनाम्याचे अहवाल वेळेत सादर न झाल्यामुळे लोहा कंधारचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन बाधित सोयाबीन पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल शासनाला तातडीने पाठवून पिवळा मोझेक रोगामुळे बाधित सोयाबीन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन केली आहे. यावेळी विशाल कौशल्य, सचिन कुदळकर, दत्ता शिंदे
दहीकळंबेकर ,अशोक बोधगिरे सह पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पिवळा मोझेक रोगामुळे लोहा कंधार तालुक्यातील बाधित सोयाबीन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली जाईल असे आश्वासन यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांना दिले आहे.