भाऊच्या डब्याने ओलांडला नऊशे दिवसाचा पल्ला

 

कंधार ; प्रतिनिधी

जेष्ठ स्वतंत्र सेनानी, माजी खासदार व माजी आमदार दिवंगत डॉ. केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून १ मे २०२१ पासून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातलगासाठी सुरू करण्यात आलेल्या भाऊच्या डब्बा या उपक्रमाने नऊशे दिवसाचा पल्ला ओलांडला आहे. सामाजिक बांधिलकीचा हा वसा असाच अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
दिवंगत भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी नाहिरेवाल्यांसाठी संपूर्ण आयुष्य झिजविले. त्यांना न्याय मिळवून दिला. मन्याडखोऱ्यात शैक्षणिक दालने उघडून तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. मन्याडखोऱ्याला त्यांनी स्वाभिमान शिकवला. मर्दुमकी शिकवली. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा कानमंत्र दिला. उपेक्षित, शोषित समाज त्यांचा केंद्रबिंदू होता. त्यांचे विचार आजच्या काळाला दिशा देणारे आहेत. त्यांनी कधीच तत्वांशी तडजोड केली नाही. त्यांचा वसा पुढे चालविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून रुग्ण सेवा त्याचाच एक भाग असल्याचे प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी सांगितले.
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. धोंडगे यांनी कंधार व लोह्यात रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना व वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जेवणाची सोय व्हावी म्हणून “भाऊचा डब्बा” हा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. भाऊच्या डब्याने बघता बघता आठशे दिवसाचा पल्ला ओलांडला असून आजही हा उपक्रम अविरतपणे चालु आहे. कंधार, लोहा येथील रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना “भाऊचा डब्बा” आजही पुरविला जात आहे.
माजी खासदार व माजी आमदार दिवंगत डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी आपल्या हयातीत गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी व हितासाठी अहोरात्र प्रयत्न करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले होते. त्यांचाच वारसा पुढे चालू ठेवण्याचे कार्य त्यांचे सुपूत्र पुरुषोत्तम धोंडगे करीत असून त्यांनी गोरगरीब जनतेसाठी “भाऊचा डब्बा” या नावाने अन्नदानाचा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाने नुकताच नऊशे दिवसाचा पल्ला गाठला असून या माध्यमातून पुरुषोत्तम धोंडगे यांनी “जिथे कमी तिथे आम्ही” याची प्रचिती आणून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *